LIC IDBI Bank : एलआयसीकडून भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठा आयपीओ आणण्याची तयारी पूर्ण झाली आहे. शेअर बाजारात लिस्ट होण्यापूर्वी एलआयसी आणि केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एलआयसी आणि केंद्र सरकारने आयडीबीआय बँकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
एलआयसी आयपीओबाबतची माहिती देण्यासाठी एलआयसीच्यावतीने एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत एलआयसीचे अध्यक्ष एम. कुमार, व्यवस्थापकीय संचालक राज कुमार, सिद्धार्थ मोहंती, डिआयपीएएमचे (DIPAM) तुहिनकांता पांडे आणि वित्त खात्यातील अधिकारीदेखील उपस्थित होते. तुहिनकांता पांडे यांनी सांगितले की, आयडीबीआय बँकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आयडीबीआय बँकेत एलआयसीचा 51 टक्के वाटा आहे. त्यामुळे आता एलआयसीने पूर्णपणे माघार घेत समभाग विक्री केल्यानंतर बँक पूर्णपणे खासगी गुंतवणूकदारांच्या हाती जाणार आहे.
नोव्हेंबर 2018 मध्ये आयडीबीआय बँकेची आर्थिक स्थिती सुधरवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एलआयसीला बँकेतील अतिरिक्त इक्विटी शेअर्स घेण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर एलआयसीने 4743 कोटी रुपये गुंतवले होते. वर्ष 2019 मध्ये एलआयसीने 82.8 कोटी रुपयांचे इक्विटी शेअर्स खरेदी केले. त्यानंतर एलआयसीचे बँकेत 51 टक्के समभाग झाले होते. विजय मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्सने कर्ज बुडवल्याचा फटका आयडीबीआय बँकेला बसला होता.
एलआयसी आयपीओ बाबत काय म्हटले?
तुहिनकांत पांडे यांनी एलआयसी आयपीओबाबत म्हटले की, एलआयसीमध्ये सुरुवातीला 3.5 टक्के निर्गुंतवणूक करत आहोत. बाजार भांडवल अधिक असल्याने सेबीकडून एफपीओत काही सवलत देण्यात आली आहे. शेअर बाजारात अस्थिरता होती आणि त्यामुळे मार्च महिन्याऐवजी मे महिन्यात आयपीओ दाखल करत असल्याचे सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या: