LIC IPO Updates : भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठा आयपीओ असलेला एलआयसीचा आयपीओ शेअर बाजारात दाखल होणार आहे. या आयपीओद्वारे केंद्र सरकार 3.5 टक्के शेअर्स बाजारात आणणार आहे. एलआयसीची ही निर्गुंतवणूक म्हणजे ‘एलआयसी २.०’ असल्याचे प्रतिपादन एलआयसीचे अध्यक्ष एम. कुमार यांनी केले. 


एलआयसीच्या आयपीओ बाबत माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला अध्यक्ष एम. कुमार, व्यवस्थापकीय संचालक राज कुमार, सिद्धार्थ मोहंती, डिआयपीएएमचे (DIPAM) तुहिनकांता पांडे आणि वित्त खात्यातील अधिकारीदेखील उपस्थित होते. 


एलआयसीच्या प्रति समभागाची (शेअर) किंमत रुपये 902 ते 949 रुपये असणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. शेअर बाजारातून सरकार 21 हजार कोटी रुपये उभे करणार आहे. या आयपीओद्वारे एलआयसीचा 3.5 टक्के समभाग खुल्या बाजारात आणला जाणार आहे. 


एलआयसीच्या पॉलिसीधारकांना आयपीओ किंमतीवर प्रति समभाग 60 रुपये किंवा 6 टक्क्यांची सूट मिळणार आहे. तर, कर्मचारी, रिटेल गुंतवणूकदारांना प्रति समभाग जवळपास ५ टक्के किंवा ४५ रुपयांची सवलत मिळणार आहे.  


कधी येणार आयपीओ?


एलआयसीचा आयपीओ 4 मे रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. आयपीओसाठी 9 मेपर्यंत अर्ज करता येणार आहे. ॲंकर बॅंडसाठी 2 मे पासून भागविक्री सुरु होणार असल्याची माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली.  


DIPAM चे सचिव तुहीनकांता पांडे यांनी सांगितले की, सरकारकडून एलआयसीचा भागविक्री बाजारात आणण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले. एलआयसीचा हा शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ आहे.  एलआयसीचा आयपीओ ही सुरुवात असून गुंतवणुकदारांसाठी ही मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले. गुंतवणुकीसाठी एलआयसी प्रयत्न करत होती. आता एलआयसी स्वतः गुंतवणूकदारांसाठी एक संधी निर्माण होते असल्याचे त्यांनी सांगितले. 


 


इतर महत्त्वाच्या बातम्या: