मुंबई: देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनी असलेल्या एलआयसीच्या (Life Insurance Corporation of India-LIC) आयपीओची प्राईस बॅन्ड ठरली आहे. हा आयपीओ बाजारात 4 मे ते 9 मे या कालावधीत येणार असून त्याची किंमत ही प्रति शेअर 902 ते 949 इतकी असणार असल्याची माहिती आहे. एलआयसी पॉलिसीधारकांना आयपीओच्या किंमतीवर 60 रुपयांची सूटही मिळणार आहे. एबीपी लाईव्हच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
केंद्र सरकार एलआयसीचा 3.5 टक्के हिस्सा बाजारात विक्री करणार असून त्या माध्यमातून 21 हजार कोटी रुपये उभा करणार आहे. एलआयसी पॉलिसीधारकांना आयपीओ किंमतीवर 60 रुपये तर कर्मचारी आणि रिटेल गुंतवणूकदारांना 45 रुपयांची सूट मिळणार आहे.
एलआयसीने या आधी फेब्रुवारीमध्ये यासंबंधीचा ड्राफ्ट सेबीकडे जमा केला होता. केंद्र सरकार सुरुवातीला एलआयसीचा 5 टक्के हिस्सा विकणार होतं, पण नंतर यामध्ये घट करण्यात येऊन ते 3.5 टक्क्यांवर आणण्यात आलं. एलआयसीच्या बोर्डने 23 एप्रिलला या गोष्टीसाठी मंजुरी दिली होती. त्यामुळे कंपनीनेच भागभांडवल हे सहा लाख कोटी रुपये इतकं होणार आहे. आता एलआयसीच्या या आयपीओच्या माध्यमातून 21 हजार कोटी रुपये उभं करण्यात येणार आहेत.
एलआयसीचे व्यवस्थापन आणि इन्व्हेस्टमेंट बँकर्सकडून देशभरात सहा मोठ्या शहरांमध्ये रोडशो आयोजित करण्यात येणार आहे. त्यामध्ये मुंबई, नवी दिल्ली, बंगळुरू, अहमदाबाद, राजकोट आणि कोलकाता या शहरांचा समावेश आहे. या शहरांमधील गुंतवणूकदारांशीही यावेळी चर्चा करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: