(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jalgaon Gold Rate : पितृ पक्ष राहिला बाजूला, जळगावात सोने खरेदीसाठी झुंबड, दर पाहून तुम्हीही म्हणाल....
Jalgaon News : जळगावच्या सुवर्ण नगरीत कधी नव्हे ते पितृ पक्षातही सोने खरेदीसाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
जळगाव : उशिरा का होईना जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात झालेला दमदार पाऊस (Rain), त्यात सोन्याच्या दरात (Gold Rate) दोन दिवसात झालेली बाराशे रुपयांची घसरण आणि जोडून आलेल्या चार दिवस सुट्ट्या (Holidays) असा योग जुळून आला आहे. यामुळे जळगावच्या सुवर्ण नगरीत कधी नव्हे ते पितृ पक्षातही (Pitru Paksha 2023) सोने खरेदीसाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. बँक बाजार या वेबसाईटनुसार जळगावात आज सोन्याचा दर 57 हजार 360 रुपये आहे.
पितृ पक्ष सुरु झाला की जळगावच्या सुवर्ण नगरी नेहमीच सामसूम पाहायला मिळते. यंदा मात्र याच्या अगदी विरुद्ध चित्र पाहायला मिळत आहे. पितृपक्षात ही सोने खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.
पितृ पक्षात सोनं खरेदीची प्रमुख कारणे कोणती?
ही गर्दी होण्यामागे प्रामुख्याने तीन कारणे सांगितले जात आहेत. यामध्ये गेल्या महिन्याभरात पावसाने दडी मारल्याने शेतकरी आणि व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र गेल्या पंधरा दिवसात संपूर्ण जिल्हाभरात समाधानकारक पाऊस झाला आहे. परिणामी खरीपसह रब्बी हंगाम शेतकऱ्यांच्या हातात येणार असल्याने व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहेत. या सोबतच जागतिक पातळीवर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून जळगावच्या सुवर्णनगरीतही गेल्या तीन दिवसात बाराशे रुपयांची घसरण झाल्याने ग्राहकांना याचा फायदा फायदा होणार आहे. शिवाय सलग चार दिवस सुट्ट्या मिळाल्याने अनेक ग्राहकांनी पितृ पक्ष असतानाही सोने खरेदीचा अनोखा मुहूर्त शोधला असल्याचं पाहायला मिळत आहे.
यंदा ग्राहकांमध्ये 30 ते 40 टक्के वाढ
यंदा पितृ पक्ष असला तरी सोन्याच्या दरात तीन दिवसात झालेली घसरण आणि सलग चार दिवस जोडून सुट्या आल्याने ग्राहकांनी सोने खरेदीसाठी गर्दी केली आहे. पितृ पक्षात दरवर्षी नेहमीच ग्राहकांची कमी असते, यंदा मात्र मागील वर्षाच्या तुलनेत ग्राहकांमध्ये तीस ते चाळीस टक्के वाढ झाली असल्याचं म्हटलं आहे.
सोनं कधीही खरेदी केलं तरी फायदेशीरच : ग्राहक
सध्या पितृ पक्ष असला तरी सोन्याच्या दरात झालेली घसरण आणि सलग जोडून सुट्ट्या आल्याने आम्हाला पितृ पक्षाचा हा योग फायदेशीर ठरला आहे. कारण सोने हे कधीही खरेदी केले तरी ते फायदेशीर आणि शुभच ठरत असते, त्यामुळे आम्ही आज सोने खरेदी करत असल्याच्या प्रतिक्रिया ग्राहकांनी दिल्या आहेत.
हेही वाचा
Gold Rate : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दिवाळीपूर्वी दरात होणार मोठी घसरण; वाचा सविस्तर