Income Tax Return Update : आयकर विवरण दाखल (Income Tax Return Filing) करण्याची मुदत सोमवारी, 31 जुलै 2023 रोजी संपली. यंदाच्या वर्षात आयकर विवरण दाखल करणाऱ्यांच्या संख्येत विक्रमाी वाढ झाली आहे.  31 जुलै 2023 पर्यंत एकूण 6.77 कोटी करदात्यांनी आयकर रिटर्न भरले आहेत. आयकर विभागाने ही माहिती दिली आहे. मूल्यांकन वर्ष 2023-24 मध्ये एकूण 6.77 कोटी ITR दाखल करण्यात आले होते तर 2022-23 मध्ये 31 जुलै 2022 पर्यंत एकूण 5.83 कोटी ITR दाखल करण्यात आले होते. याचाच अर्थ 2022-23 च्या मूल्यांकन वर्षाच्या तुलनेत 2023-24 मध्ये 16.1 टक्के अधिक आयकर रिटर्न भरले गेले आहेत.


एकाच दिवसात 64 लाख ITR दाखल


आयकर विभागाने सांगितले की, 31 जुलै 2023 रोजी एकाच दिवसात 64.33 लाख आयकर रिटर्न भरले गेले. 53.67 लाख जणांनी पहिल्यांदाच आयकर रिटर्न दाखल केले आहेत. टॅक्सबेसच्या संख्येत चांगली वाढ झाली असल्याचे हे संकेत असल्याचे म्हटले जात आहे. 







कर विभागाने सांगितले की, 6.77 कोटी आयकर रिटर्नपैकी 49.18 टक्के किंवा 3.33 कोटी करदात्यांनी आयटीआर-1 फॉर्मद्वारे रिटर्न भरले आहेत. 81.12 लाख किंवा 11.97 टक्के करदात्यांनी ITR-2 द्वारे रिटर्न भरले आहेत. 75.40 लाख किंवा 11.13 टक्के करदात्यांनी आयटीआर-3 द्वारे आयकर रिटर्न भरले आहेत. ITR-4 द्वारे 1.81 कोटी किंवा 26.77 टक्के रिटर्न भरले गेले आहेत. 6.40 लाख किंवा 0.94 टक्के करदाते आहेत ज्यांनी ITR 5 ते 7 द्वारे रिटर्न भरले आहेत. 


आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या संख्येने करदात्यांनी त्यांच्या अॅन्यूअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट (AIS) आणि फायनान्शिअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट (TIS) नुसार, आर्थिक व्यवहार पाहून आयकर रिटर्न भरले आहेत. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, 5.63 कोटी आयटीआर ई-व्हेरिफिकेशन झाले आहेत. आयकर विभागाने करदात्यांना पुढील 30 दिवसांत आयटीआर व्हेरिफाय करण्याचे आवाहन केले आहे.


ITR भरला नाही, त्यांच्या समोर पर्याय काय?


ज्यांना 31 जुलै 2023 पर्यंत आयटीआर दाखल करता आला नाही. त्यांना आता, 31 डिसेंबर 2023 पर्यंत आयटीआर दाखल करण्याची संधी आहे. मात्र त्यांना 5 हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. ज्यांचे करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना 1000 रुपये दंड भरावा लागणार आहे.