Income Tax Filing : आयकर विवरण दाखल (Income Tax Return) करण्याची मुदत संपण्यास आता काही तासांचा अवधी शिल्लक आहे. मूल्यांकन वर्ष 2023-24 (AY2023-24) साठी शेवटच्या दिवशी आयकर भरणाऱ्यांची संख्या मागील काही दिवसांच्यात तुलनेत वाढली असल्याचे दिसून आले. ITR दाखल करण्याची आज अंतिम मुदत होती. ही अंतिम मुदत वाढवली जाणार नसल्याचे केंद्र सरकारने याआधीच जाहीर केले होते. त्यामुळे उद्यापासून (1 ऑगस्ट 2023) दंडाच्या रक्कमेसह आयकर विवरण दाखल करता येणार आहे.
आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 31 जुलै 2023 रोजी, सायंकाळी 6 वाजेपर्यंत 6.50 कोटींहून अधिक ITR दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुमारे 36.91 लाख ITR दाखल झाले आहेत.
ई-फायलिंग पोर्टलवर 1.78 कोटीहून अधिक यशस्वी लॉगिन झाले असल्याचे आयकर विभागाने म्हटले.
आयटीआर फाइलिंग, कर भरणा आणि इतर संबंधित सेवांसाठी करदात्यांना मदत करण्यासाठी, हेल्पडेस्क 24x7 आधारावर कार्यरत आहे आणि आम्ही कॉल्स, लाइव्ह चॅट्स, वेबएक्स सेशन्स आणि सोशल मीडियाद्वारे करदात्यांना मदत करत असल्याचे आयकर विभागाने म्हटले.
हा मोठा टप्पा गाठण्यात आम्हाला मदत केल्याबद्दल आम्ही करदाते आणि कर व्यावसायिकांचे आभार मानत असल्याचे आयकर विभागाने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले. ज्यांनी AY 2023-24 साठी ITR भरला नाही अशा सर्वांना त्यांचा ITR दाखल करण्याचे आवाहन आयकर विभागाने केले.
कर परतावा मिळाला का?
अनेकांनी आयकर विवरण दाखल केल्यानंतर त्यांना कर परतावा देण्यास सुरुवात झाली आहे. त्याच वेळी अनेक कर परताव्यासाठी प्रतीक्षा करत आहेत.
कर परताव्याबाबतची स्थिती कशी पाहणार?
- आयकर विभागाच्या विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या- incometax.gov.in/iec/foportal/
-क्विक लिंक्स सेक्शन अंतर्गत आयटीआर स्टेटस लिंकवर क्लिक करा
- "चेक रिफंड स्टेटस" पर्यायावर क्लिक करा.
- नवीन वेबपृष्ठावर, योग्य स्थायी खाते क्रमांक (PAN) प्रविष्ट करा आणि मूल्यांकन वर्ष (AY) निवडा.
- आता, ITR परताव्याची स्थिती पाहण्यासाठी "सबमिट" किंवा "स्थिती तपासा" बटणावर क्लिक करा.
परतावा मिळाल्यानंतरही ITR मध्ये करू शकता बदल
आयकर विभागाने करचोरी विरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत आयकर रिटर्न भरताना करदात्यांनी आयकर विवरणात त्यांच्या उत्पन्नाची योग्य माहिती दिली पाहिजे याची काळजी घेतली जाते. अनेक वेळा करदाते बँक खात्यातील ठेवींच्या व्याज उत्पन्नाबद्दल योग्य माहिती देऊ शकत नाहीत किंवा चुकीच्या कपातीचा दावा करू शकत नाहीत. जर तुमच्यासोबतही असे घडले असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. इतकेच नाही तर आयकर विभागाकडून कमी परतावा मिळाल्यास त्याविरुद्ध अपील करण्याचीही तरतूद आहे.
सुधारित विवरणपत्र 139(5) अंतर्गत भरा
आयकर कायद्यांतर्गत आयकर रिटर्न भरल्यानंतरही तुम्ही तुमचा आयटीआर पुन्हा दुरुस्त करू शकता. आयकर कायद्याच्या कलम 139(5) अंतर्गत, करदाते सुधारित आयकर रिटर्न भरून आयटीआरमध्ये झालेल्या चुका सुधारू शकतात. या कायद्यानुसार, आयटीआर भरल्यानंतर, जर करदात्याला असे वाटत असेल की त्याने काही बाबी जाहीर केल्या नाहीत अथवा चूक झाली आहे. तर, तो सुधारित आयकर विवरण दाखल करू शकतो.
प्रोसेसिंग-रिफंड मिळाल्यानंतरही सुधारित आयकर रिटर्न भरण्यास मुभा
करदात्यांना ही दिलासा देणारी बाब आहे की त्यांच्या आयकर रिटर्नवर प्रक्रिया झाली असली तरी ते कलम 139(5) अंतर्गत ऑनलाइन रिव्हाइज रिटर्न भरू शकतात. करदात्याच्या आयटीआरची प्रक्रिया केली गेली आहे आणि त्याला परतावा जारी केला गेला आहे, अशा प्रकरणांमध्ये, रिफंड मिळाल्यानंतरही, आयटीआर दुरुस्त करण्यासाठी करदाता सुधारित रिटर्न दाखल करू शकतो.