2000 Rupees Notes : रिझर्व्ह बँकेने चलनातून दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून (2000 Rupees Notes) मागे घेण्याची घोषणा मे महिन्यात केली. त्यानंतर बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सप्टेंबर महिना अखेरपर्यंत मुदत असून आता अखेरचे 60 दिवस शिल्लक राहिले आहेत. 31 जुलै पर्यंत दोन हजार रुपयांच्या चलनातील 88 टक्के नोटा बँकेकडे जमा झाल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. 


आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, 19 मे 2023 पर्यंत 3.56 लाख कोटी रुपयांच्या मूल्याच्या 2000 रुपयांच्या नोटा चलनात होत्या. 31 जुलै 2023 पर्यंत 3.14 लाख कोटी रुपये मूल्यांच्या 2000 रुपयांच्या नोटा बँकांमध्ये परत आल्या आहेत. आता फक्त 42,000 कोटी रुपयांच्या नोटा चलनात उरल्या आहेत. 2000 रुपयाच्या नोटा जमा करण्याची किंवा बदलण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 ही शेवटची तारीख आहे.


19 मे 2023 रोजी आरबीआयने 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. 31 मार्च 2023 पर्यंत 2,000 रुपयांच्या नोटांच्या चलनात एकूण 3.62 लाख कोटी रुपये होते. 19 मे 2023 रोजी घटून 3.56 लाख कोटी रुपये झाले. 


RBI ने सांगितले की, बँकांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, 31 जुलै 2023 पर्यंत एकूण 3.14 लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनातून बँकिंग प्रणालीत परत आल्या आहेत. आता फक्त 42 हजार कोटी रुपयांच्या नोटा चलनात उरल्या असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. 19 मे 2023 रोजी आरबीआयच्या 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या घोषणेपासून आतापर्यंत 88 टक्के नोटा परत आल्या आहेत.


आरबीआयने सांगितले की, परत आलेल्या 2000 रुपयांच्या नोटांपैकी 87 टक्के नोटा बँक खात्यात जमा झाल्या आहेत. तर 13 टक्के 2000 रुपयांच्या नोटा या इतर नोटांसोबत बदलण्यात आल्या आहेत.


सर्वसामान्यांना आवाहन करताना आरबीआयने सांगितले की, त्यांच्याकडे आता 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी दोन महिने शिल्लक आहेत. शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी, लोकांनी 30 सप्टेंबर 2023 पूर्वी नोटा जमा किंवा बदलण्याचे आवाहन आरबीआयने केले आहे. 


2000 रुपयांची नोट बदलण्यासाठी मुदतवाढ मिळणार? 


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार रुपयांची नोट (Rs. 2000 Currency note) चलनातून मागे घेणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर बँकांमधून दोन हजार रुपयांची नोट बदलण्यास सुरुवात झाली आहे. नोट बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 ही शेवटची मुदत आहे. ही मुदत वाढवून देण्याबाबत चर्चा सुरू असताना केंद्र सरकारने यावर भूमिका स्पष्ट केली आहे. दोन हजार रुपयांची बदली करून घेण्याच्या प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.