ITR Filing : आयटी रिटर्न्स दाखल करण्याचा अखेरचा दिवस; आयकर विभागाकडून अद्याप मुदतवाढ नाही
Income Tax Return (ITR) Filing Deadline by 31 December : आर्थिक वर्ष 2020-21 मधील आयकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी 31 डिसेंबर 2021 ही शेवटची तारीख आहे.
ITR Filing Last Date : आयकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी आता शेवटचे काही तास शिल्लक राहिले आहेत. आर्थिक वर्ष 2020-21 साठी आयकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी शेवटची तारीख आज म्हणजेच, 31 डिसेंबर आहे. 31 डिसेंबरनंतर आयकर विवरणपत्र (IT Return) दाखल करणाऱ्यांना दंड भरावा लागणार आहे.
आयकर विवरणपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या आठवड्यात लाखो लोकांनी विवरणपत्र दाखल केले असल्याची माहिती आयकर विभागाने अधिकृत ट्विटर हँडलवरुन दिली आहे. आयकर विभागाच्या माहितीनुसार, 30 डिसेंबर 2021 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत 24.39 लाख आयकर विवरणपत्र दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी 29 डिसेंबर 2021 रोजी 23,24,253 आयकर विवरणपत्र दाखल करण्यात आले होते. 28 डिसेंबर 2021 रोजी 18,89,057 आयकर विवरणपत्र दाखल करण्यात आले आहे. याआधी 27 डिसेंबर रोजी 15.49 लाख आयकर विवरणपत्र दाखल झाले होते. तसेच आतापर्यंत एकूण 5.34 कोटी आयकर विवरणपत्र दाखल करण्यात आले आहेत.
31 डिसेंबर 2021 नंतर दंड भरावा लागणार
आम्ही तुम्हाला सांगतो की, जर तुम्ही आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 नंतर मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी रिटर्न भरले असेल तर तुम्हाला 5,000 रुपये दंड भरावा लागेल. आणि जर तुम्ही 31 मार्च 2022 नंतर मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी इन्कम टॅक्स रिटर्न भरला तर 10,000 रुपये दंड भरावा लागेल. त्यामुळे, जर तुम्हाला दंड भरणं टाळायचं असेल, तर तुम्ही 31 डिसेंबर 2022 पूर्वी तुमचं आयटी रिटर्न भरलं पाहिजे.
दंडाची नेमकी तरतूद काय आहे?
आयकर अधिनियम 1961 मध्ये कलम 234-F समाविष्ट करण्यात आले आहे. हे कलम 1 एप्रिल 2018 पासून लागू झाले आहे. यामध्ये नियोजित मुदतीत आयकर न भरल्यास दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी ITR
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी लोकांनी आयकर विवरणपत्र भरले आहेत. आयकर विभागानं दिलेल्या माहितीनुसार, 2019-20 या आर्थिक वर्षासाठी एकूण 5.95 कोटी ITR दाखल करण्यात आले होते. मुदत संपेपर्यंत मागील वर्षाचा आकडा ओलांडला जाऊ शकतो.
आयटी रिटर्न भरण्यासाठी टिप्स
आयटी रिटर्न कसं भरायचं हा आपल्यासमोर मोठा प्रश्न असतो. मात्र आपण थोडी जरी माहिती घेतली, तरी आयटी रिटर्न भरणं किती सोपं आहे हे आपल्याला कळेल. आपण नवा मोबाईल घेतल्यानंतर त्यातील फंक्शन्स कसे ऑपरेट करायचे हे आपल्याला माहित नसतं. मात्र आपण एकदा त्यामध्ये लक्ष घातलं की सगळं समजायला लागतं, तसंच आयटी रिटर्नच्या बाबतीतही लागू आहे. आयटी रिटर्न भरण्यासाठी टिप्स इथे क्लिक करा.
टॅक्स भरताना कोणती काळजी घ्याल?
टॅक्सची अचूक माहिती द्या
आयटी रिटर्न्स भरताना टॅक्सची पूर्ण माहिती देणं गरजेचं आहे. यातून अॅडव्हान्स टॅक्स, टीडीएसची माहिती सरकारला द्यावी लागते. जर कमी टॅक्स भरला तर आयटी रिटर्न्समध्ये टॅक्स भरण्याची संधी मिळेल. तसंच जास्त टॅक्स जमा झाला असेल तर रिफंड मागितला जाऊ शकतो.
वर्ष आणि फॉरमॅट तपासून घ्या
आयटी रिटर्न्स भरताना मूल्यनिर्धारण वर्ष आणि त्याचा फॉरमॅट नीट तपासून घ्या. कारण वेगवेगळ्या टॅक्सपेअर्ससाठी फॉरमॅटही वेगळा असतो. तसंच प्रत्येक वर्षी हा फॉरमॅट बदललाही जातो. म्हणूनच तुमचा फॉरमॅट नीट तपासून घेणं गरजेचं आहे.
मिळालेल्या व्याजाचाही उल्लेख करा
तुमच्या सेव्हिंग बँक अकाऊंटवर आणि फिक्स डिपॉझिटवर जे व्याज मिळालं असेल त्याचाही उल्लेख फॉर्ममध्ये करा. व्याजातून मिळालेली रक्कम तुमच्या ग्रॉस इनकममध्ये अॅड करणं गरजेचं आहे. तुमची बँक स्टेटमेंट्स तपासली तर ही व्याजाची रक्कम जाणून घेण्यासाठी मदत होऊ शकेल.
मिळालेल्या व्याजाचाही उल्लेख करा
तुमच्या सेव्हिंग बँक अकाऊंटवर आणि फिक्स डिपॉझिटवर जे व्याज मिळालं असेल त्याचाही उल्लेख फॉर्ममध्ये करा. व्याजातून मिळालेली रक्कम तुमच्या ग्रॉस इनकममध्ये अॅड करणं गरजेचं आहे. तुमची बँक स्टेटमेंट्स तपासली तर ही व्याजाची रक्कम जाणून घेण्यासाठी मदत होऊ शकेल.
अचूक बँक डिटेल्स
आयटी रिटर्न्स भरताना अचूक बँक डेटल्स पुरवणं हेदेखील फार महत्वाचं आहे. चुकीची बँक डिटेल्स दिल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता. ही सर्व काळजी घेतली तर तुम्हाला आयटी रिटर्न्स भरताना येणाऱ्या अडचणींवर मात करणं सोपं होईल.
आयकर विभागाचा दिलासा
आयकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. ज्या करदात्यांनी आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये आयकर विवरणपत्राचे आतापर्यंत ई-व्हेरिफिकेशन केले नाही, असे करदाते ही प्रक्रिया 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत पूर्ण करू शकतात. आयकर विभागाच्या या निर्णयामुळे अनेक करदात्यांना दिलासा मिळणार आहे.
नियमांनुसार, डिजीटल स्वाक्षरीशिवाय, इलेक्ट्रॉनिक्स स्वरुपात आयकर विवरणपत्र दाखल करण्यावर त्याचा आधार ओटीपी, नेटबँकिंग, डिमॅट खात्याद्वारे पाठवण्यात आलेला कोड व्हेरिफाय करावा लागतो. हे ई-व्हेरिफिकेशन आयकर दाखल केल्यानंतर 120 दिवसांमध्ये करावे लागते. त्याशिवाय करदाते बंगळुरूमध्ये सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर (सीपीसी) कार्यालयात आयटीआर कार्यालयात एक प्रत पाठवून व्हेरिफिकेशन करता येऊ शकते. ही व्हेरिफिकेशन प्रक्रिया जोपर्यंत पूर्ण होत नाही. तो पर्यंत आयकर विवरण दाखल केले नाही, असे म्हटले जाते.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा