मुंबई : प्रिमियम एनर्जीज, बजाज हाऊसिंग फायनान्स, यूनिकॉमर्स, पीएनजी यासह विविध कंपन्यांच्या आयपीओनं गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स दिले आहेत. त्यामुळं नवगुंतवणूकदारांचा ओढा आयपीओकडे वाढला आहे. आतापर्यंत या वर्षी 64 कंपन्यांकडून आयपीओ लाँच करण्यात आले आहेत. त्यातून त्यांनी 64 हजार कोटी रुपयांची उभारणी केली आहे. आयपीओच्या माध्यमातून तुम्ही पण जर पैसे कमावण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात घेण्याची गरज आहे.
केआरएन हिट एक्सेंजर या कंपनीला 340 कोटी रुपयांची उभारणी करायची होती. या कंपनीचा आयपीओ 212 पट सबस्क्राइब करण्यात आला. गुंतवणूकदारांनी तब्बल 51 हजार कोटी रुपयांची बोली या आयपीओसाठी लावली. आगामी काळात ओयो, स्विगी, ह्युंदाई, एनटीपीसी ग्रीन यासह विविध कंपन्यांचे आयपीओ शेअर बाजारात येणार आहेत. त्यामुळं पैसे गुंतवण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.
आयपीओत पैसे लावण्यापूर्वी काय करावं?
अनेकदा गुंतवणूकदारांना नियमित गुंतवणुकीपेक्षा अधिक जादा नुकसान आयपीओमध्ये होण्याची शक्यत असते. जे उत्साही गुंतवणूकदार असतात ते मित्रांची कमाई पाहून वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचा प्रयत्न करतात, त्यांना नुकसानाचा सामना करावा लागू शकतो. आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी कंपनीचं बाजारमूल्य, भविष्य काय आहे, कंपनी कोणत्या क्षेत्रात आहे. तिथं किती स्पर्धा आहे,त्यास्थितीत कंपनी टिकाव धरेल का याचा विचार केला पाहिजे.
कंपनीचं व्यवस्थापन, कंपनीच्या आर्थिक स्थितीचा मुलभूत अभ्यास देखील असणं आवश्यक आहे. कंपनीच्या आयपीओचं ग्रे मार्केटमधील प्रिमियम देखील पाहिला पाहिजे. अखेरच्या दिवशी आयपीओला कसा प्रतिसाद मिळाला हे पाहून पैसे लावता येऊ शकतात. नवे गुंतवणूकदार, मित्र किंवा यूट्यूब चॅनेलवरील सल्ले पाहून आयपीओत पैसे लावू नये.
विक्रम सोलार, आदित्य इन्फोटेक, वृंदा कन्स्ट्रक्शन्स, अजाक्स इंजिनिअरिंग, विक्रान इंजिनिअरिंग, राही इन्फ्राटेक, मिडवेस्ट, विनी कॉर्पोरेशन, संभव स्टील ट्यूब्स, जारो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मॅनेजमेंट अँड रिसर्च, ऑल टाइम प्लास्टिक्स लिमिटेड, स्कोडा ट्यूब्स यांनी अर्ज केले आहेत. या कंपन्यांचे आयपीओ आगामी काळात येऊ शकतात.
इतर बातम्या :
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)