बीड : महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशानं पुरवणी अर्थसंकल्प जाहीर करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरु केलेली आहे. या योजनेचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील हप्ता 10 ऑक्टोबरपर्यंत मिळणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रितपणे महिलांना मिळतील. लाडकी बहीण योजनेचे 3 हजार रुपये महिलांना दिवाळी बोनस म्हणून मिळणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील परळीतील सभेत बोलताना घोषणा केली आहे.
लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते एकत्र मिळणार
लाडकी बहीण योजनेसाठी पहिल्यांदा 3 हजार रुपये दिले आहेत. आता सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये मिळाले आहेत. आज मी तुम्हाला सांगतो, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत, भाऊबीजेची ओवाळणी बहिणींच्या खात्यात जाणार आहे, हा शब्द तुम्हाला देतो. बहिणींनी काही काळजी करु नये, असं अजित पवार यांनी म्हटलं. लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात टाकणार आहे. आताच मी अदिती तटकरे यांच्यासोबत बोललो आहे. तिनं सांगितलं इतके हजार कोटी लागतील, तुमची सभा झाल्यानंतर मुंबईला जाणार आहे. उद्या सुट्टी असेल, जे पैसे लागतील त्याची तरतूद करणार आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं.
लाडकी बहीण योजनेच्या तीन हप्त्यांचे पैसे जमा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा पुरवणी अर्थसंकल्प मांडला गेला त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्या योजनेनुसार जुलै महिन्यापासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात करण्यात आली होती. जुलै महिन्यात अर्ज दाखल करणाऱ्या महिलांना 17 ऑगस्ट रोजी दोन महिन्यांचे पैसे पाठवण्यात आले होते. ऑगस्ट महिन्यात ज्या महिलांनी अर्ज दाखल केले होते त्यांना 31 ऑगस्टला तीन हजार रुपये देण्यात आले. सप्टेंबर महिन्यात अर्ज दाखल करणाऱ्या महिलांना देखील 29 सप्टेंबरला पैसे देण्यात आले. आतापर्यंत तीन महिन्यांचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्रित देणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केल्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज सादर करणाऱ्या महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3 हजार रुपये 10 ऑक्टोबरपर्यंत मिळणार आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्याच्या महिला व बाल विकास विभागाकडून चालवली जाते.
इतर बातम्या: