Mobikwik IPO मुंबई: भारताच्या शेअर बाजारातील नियामक संस्था असलेल्या सेबीनं काही कंपन्यांच्या आयपीओला मंजुरी दिली असल्याची माहिती आहे. स्विगी, ह्युंदाई पाठोपाट मोबिव्क्विकच्या आयपीओला मंजुरी दिली आहे. त्यामुळं आगामी काळात गुंतवणूकदारांना आयपीओच्या माध्यमातून पैसे कमवण्याची मोठी संधी आहे. मोबिक्विक ही संस्था डिजीटल पेमेंट सर्व्हिस क्षेत्रात कार्यरत आहे. या कंपनीचा आयपीओ लवकरच येणार आहे. या आयपीओ द्वारे कंपनी 700 कोटी रुपये उभारण्याची योजना आहे. या कंपनीच्या शेअर्सची दर्शनी किंमत 2 रुपये निश्चित करण्यात आली आहे.  


मोबिक्विक आयपीओद्वारे 700 कोटी उभारणार


मोबिक्विक कंपनीनं सेबीला दिलेल्या ड्राफ्ट पेपर्सनुसार पूर्णपणे नवे शेअर्स जारी केले जाणार आहेत. 700 कोटींपैकी 250 कोटी रुपये वित्तीय सेवा व्यवसायांवर खर्च केले जाणार आहेत. पेमेंट सर्व्हिस व्यवसायाच्या विस्तारासाठी 135 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहेत. याशिवाय काही पैसे पेमेंट उपकरणं आणि एआय तंत्रज्ञानासाठी वापरले जाणार आहेत.  


 
मोबिक्विक डिजीटल पेमेंट प्लॅटफॉर्म कंपनी आहे. या कंपनीकडे 14 कोटीपेक्षा अधिक यूजर्स आहेत. मोबिक्विकनं ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस 4 जानेवारीला जारी करण्यात आला होता. या कंपनीत एकही शेअर ऑफर फॉर सेलसाठी नाही. यामुळं आयपीओतून जी रक्कम उभी केली जाईल ती  पूर्णपणे कंपनीला मिळणार आहे. कंपनीच्या गुंतवणूकदारांनामध्ये अबुधाबी इन्वेस्टमेंट अथॉरिटी, बजाज फायनान्स, सिकोइया कॅपिटल आणि  Peak XV Partners सारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.


कंपनीची आर्थिक स्थिती


Mobikwik  ही डिजीटल पेमेंट सेवा पुरवणारी कंपनी आहे. या कंपनीनं त्यांची सेवा 2009 मध्ये सुरु केली होती. पेटीएम, गुगल आणि फोनपे या त्यांच्या स्पर्धक कंपन्या आहेत. कंपनीची सुरुवात बिपीन प्रीत सिंह आणि उपासना टाकू यांनी केली होती. 2023 मध्ये कंपनीला 83.8 कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं तर 2024 मध्ये कंपनीला 14.1 कोटी रुपयांचा फायदा झाला होता.  


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


इतर बातम्या :


Hyundai India IPO:पैसे तयार ठेवा, ह्युंदाईचा सर्वात मोठा आयपीओ येणार,एलआयसीचं रेकॉर्ड मोडणार, सेबीकडून प्रस्ताव मंजूर