PM Modi Mann ki Baat: यंदाच्या वर्षात भारताने सर्वच क्षेत्रात आपल्या क्षमतेचं दमदार दर्शन घडवलं आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की बात' या कार्यक्रमात म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या वर्षातील अखेरच्या मन की बात या कार्यक्रमात जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी यंदाच्या वर्षात भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था झाल्याचं सांगितलं. 


या वर्षी भारताने स्वातंत्र्य प्राप्तीची 75 वर्षे पूर्ण केली आणि या वर्षी अमृतकाळ सुरू झाला. या वर्षी देशाच्या विकासाला नवा वेग प्राप्त झाला, सर्व देशवासीयांनी एकापेक्षा एक कामे केली. 2022 या वर्षातील चौफेर यशाने आज जगभरात भारतासाठी एक विशेष स्थान निर्माण केले आहे. यंदाच्या वर्षात भारतीय अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर पोचली. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा 220 कोटी डोसचा टप्पा भारताने पार केला. भारताची निर्यात 40 कोटी डॉलर्स पर्यंत पोहोचली. तसंच पूर्णपणे स्वदेशनिर्मित विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत याच वर्षी नौदलात दाखल झाली, या महत्त्वाच्या कामगिरीचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात केला. G 20 देशांच्या संघटनेचं अध्यक्षपदही भारताला याच वर्षात मिळाल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.  


‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ या भावनेच्या विस्तारामुळे 2022 हे वर्ष कायमचे लक्षात राहणार आहे. देशातील लोकांनी एकता आणि एकजुट साजरी करण्यासाठी अद्भूत कार्यक्रमांचे आयोजन केले. मग ती गुजरातमधली माधवपुर जत्रा असो, जिथे रुक्मिणी विवाह आणि भगवान श्रीकृष्णाचे ईशान्य क्षेत्राशी असलेले संबंध साजरे केले जातात, किंवा काशी-तमिळ संगमम असो, या सर्व पर्वांमध्ये सुद्धा एकतेचे अनेक रंग दिसून आले. 2022 या वर्षात देशवासियांनी आणखी एका अमर इतिहासाची नोंद केली आहे, ऑगस्ट महिन्यात राबविण्यात आलेली ‘हर घर तिरंगा’ मोहिम कोण विसरू शकेल? देशवासियांच्या तना-मनावर रोमांच फुलवणारे ते क्षण होते. स्वातंत्र्य प्राप्तीच्या 75 वर्षांनिमित्त आयोजित या मोहिमेमुळे अवघा देश तिरंगामय झाला. 6 कोटी पेक्षा जास्त लोकांनी तिरंग्यासोबत काढलेले सेल्फी पाठवले. स्वातंत्र्य प्राप्तीचा हा अमृत महोत्सव आता पुढच्या वर्षीसुद्धा असाच साजरा होत राहिल –अमृतकाळाची भक्कम पायाभरणी करत राहिल, असे पंतप्रधान म्हणाले. 


आधुनिक विज्ञानाच्या निकषांवर अपुऱ्या पडत असल्याने आयुर्वेद आणि योगासारख्या भारतीय पारंपरिक उपचार पद्धती जगात आजवर मागे पडत होत्या मात्र आता स्तनांच्या कर्करोगावर योग साधनेचा उपयोग होत असल्याचं सिद्ध झालं आहे असं ते म्हणाले. कर्करोग उपचारांसाठी नावाजलेल्या मुंबईच्या टाटा कर्करोग रुग्णालयाने केलेल्या संशोधनात हे ढळून आलं असून त्याबाबतचा शोधनिबंध अमेरिकेत झालेल्या परिषदेत मांडण्यात आला अशी माहिती मोदी यांनी दिली. 


आणखी वाचा:


PM Modi Mann Ki Baat: 2022मध्ये देशाला मिळाली गती, लोकांनी रचला इतिहास; मन की बातमधून मोदींकडून देशवासियांच्या पाठीवर शाबासकीची थाप