PM Modi Mann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मन की बात (Mann Ki Baat) कार्यक्रमाला संबोधित करत आहेत. आज मन की बातचा या वर्षातील शेवटचा म्हणजेच, 96वा एपिसोड आहे. मन की बातच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदी भारताच्या प्रगतीबद्दल बोलले आणि G-20 गटाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्याबद्दल अभिमानही व्यक्त केला.
पंतप्रधान बोलताना म्हणाले की, "2022 मध्ये देशातील लोकांची ताकद, त्यांचं सहकार्य, त्यांचा दृढनिश्चय, त्यांचा यशाचा विस्तार इतका होता की 'मन की बात'मध्ये सर्वांना समाविष्ट करणं खरंच कठीण होईल. 2022 हे वर्ष अनेक प्रकारे खूप प्रेरणादायी, आश्चर्यकारक ठरलं आहे. यावर्षी भारतानं आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण केली आणि यावर्षी अमृतकाळ सुरू झाला. यावर्षी देशाला नवी गती मिळाली, सर्व देशवासियांनी अनेक खास गोष्टी केल्या.
आपण सावध राहिलो तर सुरक्षित राहू : पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना कोरोनाबाबत सावध केले. ते म्हणाले, 'जगातील अनेक देशांमध्ये कोरोना वाढत असल्याचेही तुम्ही पाहत आहात. म्हणूनच मास्क आणि हात धुणे यासारख्या खबरदारीची अधिक काळजी घेतली पाहिजे. आपण सावध राहिलो तर आपणही सुरक्षित राहू आणि आपल्या आनंदात कोणताही अडथळा येणार नाही.
योगाभ्यास आणि आयुर्वेदाचे महत्त्व कोरोना काळात दिसून आलं
गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या जागतिक आयुर्वेद परिषदेबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, "मी त्यात सहभागी झालो होतो. यामध्ये 40 हून अधिक देशांचे प्रतिनिधी आले होते. यामध्ये 550 हून अधिक शोधनिबंध सादर करण्यात आले. या जागतिक महामारीच्या काळात आपण सर्वजण ज्या प्रकारे योग आणि आयुर्वेदाचे सामर्थ्य पाहत आहोत. त्याबाबतचं प्रामाणिक संशोधन अत्यंत महत्त्वाचे ठरेल." ते पुढे बोलताना म्हणाले की, "भारतासह जगभरातील सुमारे 215 कंपन्यांनी गोवा आयुर्वेद अधिवेशनात सहभागी होऊन त्यांची उत्पादनं प्रदर्शित केली. चार दिवस चाललेल्या या आयुर्वेद एक्स्पोमध्ये एक लाखाहून अधिक लोकांनी आयुर्वेदाशी संबंधित त्यांचे अनुभव सांगितले."
आरोग्या क्षेत्रातील अनेक आव्हानांवर केली मात
कोरोनाबाबत पुन्हा वाढत्या भीतीच्या पार्श्वभूमीवर पीएम मोदी म्हणाले की, "गेल्या काही वर्षांत आपण आरोग्य क्षेत्राशी संबंधित अनेक मोठ्या आव्हानांवर मात केली. याचं संपूर्ण श्रेय आपले वैद्यकीय तज्ञ, शास्त्रज्ञ आणि देशवासीयांच्या इच्छाशक्तीला जातं. मी तुम्हाला आवाहन करतो की, तुमच्याकडे योगाभ्यास, आयुर्वेद आणि आमच्या पारंपारिक वैद्यकीय पद्धतींशी संबंधित अशा प्रयत्नांबद्दल काही माहिती असेल तर ती सोशल मीडियावर शेअर करा."
लोकांनी एकतेचा उत्सव साजरा केला : पंतप्रधान मोदी
पीएम मोदी पुढे बोलताना म्हणाले की, "गुजरातमधील माधवपूरचा मेळा असतो जिथे रुक्मिणी विवाहाचा उत्सव साजरा केला जातो किंवा काशी-तमिळ संगम, या सणांमध्ये एकतेचे अनेक रंग दिसले. या सर्वांसोबतच 2022 हे वर्ष आणखी एका गोष्टीसाठी लक्षात राहील ते म्हणजे, 'एक भारत-श्रेष्ठ भारत' या भावनेचा विस्तार. देशातील जनतेनं अनेक प्रकारे एकतेचा उत्सव साजरा केलाय.
तिरंगा मोहिमेनं प्रत्येक घरात इतिहास घडवला
"2022 मध्ये देशवासियांनी आणखी एक अजरामर इतिहास लिहिला, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. ऑगस्ट महिन्यातील 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) मोहीम कोण विसरू शकेल. हाच तो क्षण होता, जेव्हा देशातील प्रत्येक घरात देशाचा तिरंगा डौलानं फडकत होता. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या या मोहीमेत संपूर्ण देश तिरंगामय झाला होता. 60 दशलक्षाहून अधिक लोकांनी तिरंग्यासोबत सेल्फी पाठवले. स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव पुढील वर्षीही असाच सुरू राहील आणि अमृतकाळाचा पाया आणखी मजबूत करेल.", असंही मोदी म्हणाले.
G-20 ला देण्यात आलेल्या जबाबदारीबद्दल पंतप्रधानांकडून अभिमान व्यक्त
G-20 वर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "यावर्षी भारताला G-20 गटाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आहे. याविषयी मी मागच्या वेळीही सविस्तर चर्चा केली होती. 2023 मध्ये आपल्याला G-20 च्या उत्साहाला एका नव्या उंचीवर नेऊन या कार्यक्रमाला जनआंदोलन बनवायचं आहे. पंतप्रधान म्हणाले की, माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज जगभरात ख्रिसमसचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. येशू ख्रिस्तांचं जीवन आणि शिकवण लक्षात ठेवण्याचा हा दिवस. मी तुम्हा सर्वांना नाताळच्या खूप खूप शुभेच्छा देतो.