(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मे महिन्यात जीएसटी वसुलीचा रेकॉर्ड, चौथ्यांदा वसुली आकडा 1.40 लाख कोटीच्या पुढे
GST Collection : गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत या वर्षी मे महिन्यात GST संकलन 44 टक्क्यांनी वाढले आहे.
मुंबई: मे महिन्यात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी)चे संकलन 1.41 लाख कोटी रुपये झाले आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर चौथ्यांदा वसुलीचा आकडा 1.40 लाख कोटींच्या पुढे गेला आहे. मार्च 2022 पासून सतत जीएसटी संकलन या पातळीच्या पलीकडे राहिले आहे. दरम्यान एप्रिल 2022 च्या तुलनेत हे प्रमाण 16 टक्के कमी आहे.
एप्रिल 2022 मध्ये जीएसटी संकलन प्रथमच 1.67 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आणि एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. तर मार्च महिन्यात 1.42 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या महिन्यात म्हणजेच मे महिन्यात 1.40.885 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले आहे. एप्रिलच्या तुलनेत हे प्रमाण 26 हजार कोटींनी कमी आहे. एप्रिलमध्ये जीएसटीच्या रूपाने सरकारच्या तिजोरीत एकूण 1,67,540 कोटी रुपये आले.
संकलनात 44 टक्के वाढ
गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत या वर्षी मे महिन्यात GST संकलन 44 टक्क्यांनी वाढले आहे. मे 2021 मध्ये 1.02 लाख कोटींचे जीएसटी संकलन झाले. 2021-22 या आर्थिक वर्षात सरासरी जीएसटी संकलन 1.23 लाख कोटी रुपये होते. मे 2022 मध्ये 22.72 लाख कोटी रुपयांची एकूण 7.14 कोटी ई-वे बिले प्राप्त झाली आहेत. यामध्ये कोणतीही वाढ किंवा घट झाल्यास त्याचा परिणाम जीएसटी वसुलीवर होतो.
मे महिन्यात नेहमीच टंचाई
अर्थ मंत्रालयाने एका निवेदनाच्या माहितीनुसार मे महिन्यातील संकलन एप्रिल महिन्यापेक्षा नेहमीच कमी नोंदवले गेले आहे. एप्रिल हा आर्थिक वर्षाचा प्रारंभ असतो आणि मे कलेक्शन एप्रिलच्या रिटर्नशी जोडलेले असते. परंतू मे 2022 मध्ये एकूण जीएसटी संकलन 1.40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे हे आनंददायी असल्याचं मंत्रालयाने म्हटले आहे.
मे महिन्याच्या एकूण जीएसटी संकलनात 25,036 कोटी रुपये केंद्रीय जीएसटी अंतर्गत आणि 32,001 कोटी रुपये राज्य जीएसटी अंतर्गत आहेत. तर एकात्मिक जीएसटी 73,345 कोटी रुपये आहे. 10,502 कोटी नुकसान भरपाई उपकराचा भाग आहे.