मुंबई : लग्नांचा हंगाम संपताच सोने आणि चांदीच्या दरांमधील तेजी कमी झाली आहे. सर्राफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 324 रुपयांची घसरण झाली आहे. 10 ग्रॅम सोन्याचा दर 76584 रुपयांवर पोहचला आहे. चांदीच्या दरात 514 रुपयांची घसरण झाली. चांदीचा दर आज बाजार सुरु झाला तेव्हा  89001 रुपयांवर होता. हे दर आयबीएनं जारी केले असून जे जीएसटीशिवायचे आहेत. त्यामुळं देशातील विविध शहरात सोने आणि चांदीच्या दरात 1 हजार ते 2 हजार रुपयांचा फरक असू शकतो. 


देशभरात 23 कॅरेट सोन्याचा दर 323 रुपयांनी घसरुन 10 ग्रॅम सोन्याचा दर 76277 रुपयांवर पोहोचला आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 297 रुपयांनी घसरुन  10 ग्रॅमसाठी 70151 वर पोहोचला आहे. 18 कॅरेट सोन्याचा  10  ग्रॅमचा दर  243 रुपयांनी घसरुन 57438 रुपयांवरआला.  तर, 14 कॅरेट सोन्याचा दर 189 रुपयांनी घसरुन 44802 रुपयांवर आला.


सोने खरेदी करताना काय काळजी घ्यावी?


तुम्ही ज्या दिवशी सोने खरेदी करणार असाल त्याचा दर इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटवर पाहू शकता. तिथं 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेटचा दर पाहायला मिळतो. 
  
सोने खरेदी करताना वजनाची देखील माहिती घ्या. वजनामध्ये फरक पडल्यास किंमत देखील बदलते. ज्वेलर्सकडून वजनाबाबत प्रमाणपत्र मागू शकता. 


हॉलमार्क वालं सोनं खरेदी करताना बिलाची मूळ प्रत घ्या. त्यामध्ये प्रत्येक माहिती नोंदवून घ्या. ज्यामध्ये किंमत, वजन, कॅरेट आणि हॉलमार्किंग शुल्काची नोंद असणं आवश्यक आहे. 


सोने दागिण्याच्या निर्मिती याबाबत कोणतेही सरकारी दिशा निर्देश नाहीत. ज्वेलर्स त्यांच्या हिशोबानं  2 टक्के ते  20 टक्क्यांपर्यंत खर्च वसूल करु शकतात. मेकिंग चार्जवर ज्वेलर्सकडून काही प्रमाणात सूट देखील दिली जाते. 


सोने दरात घसरण का? 


लग्नसराई संपल्यानंतर सोन्याची मागणी घटली हे एक कारण देखील दर घसरण्यामागं आहे. याशिवाय अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हची बैठक काही दिवसांमध्ये होणार आहे. त्या बैठकीत व्याज दरांसंदर्भात निर्णय होणार आहे. त्याशिवाय जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून सोने खरेदी करण्यात येत असल्याचं देखील पाहायला मिळालं. काल देखील सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. 


इतर बातम्या : 



IPO Update :मोबिक्विकचा आयपीओ अलॉट झाला नाही, निराश होऊ नका, 'या' आयपीओचा GMP पोहोचला 108 रुपयांवर