>> अमेय चुंभळे, ABP माझा प्रतिनिधी
सर्व प्रवासचाहते आणि कारप्रेमींना सलाम! मी नुकतीच राजस्थानची 'रोड ट्रिप' करून आलो. मुंबई-अहमदाबाद-जैसलमेर-जयपूर-पुष्कर-अहमदाबाद-मुंबई असा या ट्रिपचा मार्ग होता.
फोक्सवॅगन पोलो या कारमधून 11 दिवसांत एकूण 3 हजार 610 किमी प्रवास केला. संपूर्ण प्रवास ड्रायव्हिंग मी स्वतः केलं. या प्रवासात ड्रायव्हिंगबद्दल काही गोष्टी नव्यानं जाणवल्या. तर काही बाबी माहीत होत्या, त्या अधिक अधोरेखित झाल्या. या सर्व गोष्टी तुमच्याशी इथं शेअर करतोय.
1. पोहोचण्याची घाई नको
भारतातील ड्रायव्हिंग संस्कृती अशी आहे, की सर्वांना पोहोचण्याची विनाकारण घाई असते. रोड ट्रिप ही कुठे पोहोचण्यासाठी नसते, प्रवासाचा आनंद घेण्यासाठी असते. सतत कुणाच्या तरी पुढे जाण्यासाठी प्रवास करू नका. त्यानं अपघाताचा धोका तर वाढतोच, मात्र मानसिक ताणही वाढतो. डोकं शांत ठेवा, घाई असणाऱ्यांना पुढे जाऊ द्या. आपण एफ-१ रेसमध्ये नाही, आनंद घेण्यासाठी ट्रिपवर जातोय हे स्वतःला सांगत राहा.
2. शेवटच्या लेनमध्ये जाणं टाळा
हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा. अनेकदा असं होतं की पहिल्या दोन ते तीन लेन ट्रक किंवा ट्रेलरनं अडवलेल्या असतात. त्यामुळे शेवटच्या लेनमधून ओव्हरटेक करण्याचा मोह होतो. मात्र हा मोह टाळा. कारण शेवटच्या लेनमध्ये रिक्षा, दुचाकी, ट्रॅक्टर, पादचारी, चुकीच्या दिशेनं येणारी वाहनं आणि रेस्टॉरंट्समधून बाहेर पडणारी वाहनं असतात. त्यामुळे ट्रकच्या मागे थोडा वेळ गेला तरी चालेल, मात्र जीव धोक्यात घालून शेवटच्या लेनमधून पुढे जाऊ नका.
3. 'क्लस्टर'चा भाग बनू नका
महामार्गांवर अनेकदा चार ते पाच गाड्या अवजड वाहनांना एकत्र ओव्हरटेक करताना दिसतात. ओव्हरटेकिंगच्या नादात अजाणतेपणानं हा समूह किंवा 'क्लस्टर' बनतो. आपण त्याचा भाग अजिबात बनता कामा नये. याचं कारण - 'क्लस्टर'मधील पहिल्या कारनं जर अचानक ब्रेक दाबला, तर मागच्या सर्व गाड्या एकमेकांवर आदळतात. तुमच्या पुढे किंवा मागे क्लस्टर बनताना आढळला, तर गाडीचा वेग कमी करा, आणि त्या 'क्लस्टर'मधील सर्वांना खुशाल पुढे जाऊ द्या.
4. 'पाठलाग'वेड्यांना आधी जाऊ द्या
काही कारचालकांना अनन्यसाधारण घाई असते. सतत जोखीम पत्करत, कट मारत, रांग तोडत ते ओव्हरटेक करत करत तुमच्या कारमागे येऊन पोहोचतात. त्यांना आडकाठी करू नका. परिस्थिती पाहून योग्य क्षणी त्यांना पुढे जाण्याचा मार्ग मोकळा करू द्या. हे 'पाठलाग'वेडे जितका वेळ तुमच्या मागे असतील, त्या सर्व क्षणी तुम्हालाही धोका आहे हे लक्षात असू द्या.
5. परराज्यात 'पंगे' घेऊ नका
रस्त्यावर कारचालकांमध्ये अनेकदा वाद होतात. तुमचेही झाले असतील. हे वाद टाळले पाहिजेत, आणि तुम्ही दुसऱ्या राज्यात असाल तर अधिकच सावध राहिलेलं बरं. कारण दुसऱ्याच्या चुकीमुळे जरी वाद झाला, तर तिथं तुमची बाजू घेणारं कुणीही नसेल, हे लक्षात ठेवा. तिथले पोलीसही तुमच्या बाजूनं राहतील याचीही खात्री नाही. हा भ्याडपणाचा सल्ला नाही, तर तुमच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी मनापासून शेअर केलेला एक मुद्दा आहे.
6. झोप आली तर थांबा आणि डुलकी घ्या
'मी सहा तास न थांबता गाडी चालवली' अशा फुशारक्या मारण्याची सवय काहींना असते. सलग कार चालवण्याचा कुठलाही विक्रम आपल्याला करायचा नाही. त्यामुळे दर एक ते दीड तासानं छोटा ब्रेक घ्या, चहा-कॉफी घ्या, रिलॅक्स व्हा. कारण सतत कार चालवून मेंदू क्षीणतो, ज्यामुळे सतर्कता (अलर्टनेस) कमी होते.
7. जेवणाचे थांबे टाळू नका
गंतव्यस्थान लवकर गाठण्याच्या नादात अनेकदा जेवणाचा ब्रेक पुढे-पुढे ढकलण्याचा मोह होऊ शकतो. तसं करू नका. कार चालवणं हे कष्टाचं काम असल्यानं त्यात शरिराची बरीच ऊर्जा खर्च होते. वेळेत जेवण घेतलं नाही तर चिडचिड होते, डोकं दुखू लागतं, वैताग येतो... या सगळ्यामुळे अपघातांचा धोका वाढतो. आणि हो, 'चांगलं दिसणारं' हॉटेल शोधण्याचा नादात वेळ घालवू नका. भूक लागल्यावर खाऊन घ्या, कारण तुमच्या मनासारखं हॉटेल मिळेलच याची कुठलीही शाश्वती नाही.
8. इंधन वेळोवेळी भरत राहा
इंधनाची टाकी अर्ध्यावर गेली की लगेच इंधन भरलेलं कधीही चांगलं. कारण एकदा पेट्रोल पंप गेला की पुढचा ३० ते ४० किलोमीटरनं येणं, हे यंदाच्या वाळवंटातील रोड ट्रिपमध्ये अनेकदा घडलं. वाटेत वाहतूक कोंडी होते, घाट असेल तर इंधन अधिक खर्च होतं, असे अनेक मुद्दे असतात. त्यामुळे टाकी 'रिझर्व'वर जाण्याची वाट पाहू नका.
9. रात्रीचा प्रवास टाळा
रोड ट्रिपचं नियोजनच असं करा की त्यात रात्रीचा प्रवास नसेल. गंतव्यस्थान ५०० किमीहून अधिक लांब असेल तर त्या प्रवासाचं दोन दिवसांत विभाजन करा. वेळ आणि पैशाकडे न पाहता, रात्रीपुरतं हॉटेल बुक करा, पुरेशी झोप घेऊन सकाळी पुन्हा प्रवास सुरू करा. सर्वाधिक अपघात हे रात्री एक ते पाच या वेळेत होतात, हे आकडेवारीवरून अनेकदा सिद्ध झालं आहे.
आपला भारत देश हा अतिशय सुंदर आणि आकारनं मोठा आहे. त्यामुळे रोड ट्रिप्ससाठी ठिकाणींची काहीच कमतरता नाही. या ट्रिप्स करताना वरील मुद्दे ध्यानात ठेवा, आणि प्रवासात सुरक्षित राहा!
वाचा आणखी एक ब्लॉग :