मुंबई : भारतीय शेअर बाजारात या आठवड्यात 9 आयपीओ सबस्क्रीप्शनसाठी खुले होणार आहेत. वन मोबिक्विक सिस्टीम्सच्या आयपीओला 550 पट सबस्क्राइब करण्यात आलं होतं. अनेक गुंतवणूकदारांना मोबिक्विकच्या आयपीओमध्ये शेअर अलॉट झाले नाहीत त्यांना चांगली संधी आहे. DAM कॅपिटल अ‍ॅडवायजर्स लिमिटेडचा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी 19 डिसेंबरपासून खुला होत आहे. ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून 840.25 कोटी रुपयांची उभारणी करण्याचा प्रयत्न आहे. 


DAM कॅपिटल अ‍ॅडवायजर्स लिमिटेड कंपनी आयपीओच्या माध्यमातून 2.97 कोटी शेअर जारी करणार आहे. या आयपीओसाठी 19 डिसेंबर ते  23 डिसेंबरपर्यंत बोली लावता येणार आहे. तर, 24 डिसेंबरला शेअर अलॉट केले जातील, अशी माहिती आहे. तर, गुंतवणूकदारांच्या डीमॅट खात्यात 26 डिसेंबरला शेअर क्रेडिट केले जातील. हा आयपीओ  27 डिसेंबरला बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होईल. 



DAM कॅपिटल अ‍ॅडवायजर्स लिमिटेडचा आयपीओचा किंमतपट्टा 269 ते  283 रुपयांदरम्यान निश्चित केला आहे. एका लॉटमध्ये 53 शेअर्स असतील. या आयपीओला सबस्क्राइब करण्यासाठी किमान 14999 रुपयांची गुंतवणक करावी लागेल. DAM कॅपिटल अ‍ॅडवायजर्स लिमिटेड ही भारतातील इन्वेस्टमेंट बँक म्हणून ओळखली जाते. 


GMP कितीवर पोहोचला?


DAM कॅपिटल अ‍ॅडवायजर्स लिमिटेडच्या आयपीओला जीएमपीवर देखील  चांगला प्रतिसाद असल्याचं दिसून येतं. आयपीओ 19 डिसेंबरला खुला होणार असला तरी आता पासूनच जीएमपी 38 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या जीएमपी 108 रुपयांवर असल्याची माहिती इन्वेस्टर गेन या वेबसाईटवर दाखवण्यात आली आहे. 


DAM कॅपिटल अ‍ॅडवायजर्स लिमिटेड या कंपनीच्या नफ्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी वाढ झाल्याचं पाहायला मिळतं. यया कंपनीला  2024 मध्ये  70.52 कोटी नफा झालेला दिसून येतो. 2022 मध्ये कंपनीचा नफा 21.90 कोटी तर 2023 मध्ये  8.67 कोटी नफा होता. कंपनीचा यंदाचा महसूल 180.04 कोटी रुपये असल्याचं देखील समोर आलं आहे.


प्री अप्लायला सुरुवात


DAM कॅपिटल अ‍ॅडवायजर्स लिमिटेड या कंपनीच्या आयपीओसाठी प्री अप्लायला सुरुवात झाली आहे. रिटेल गुंतवणूकदार आजपासून प्री अप्लाय करु शकतात. या कंपनीच्या आयपीओचं रजिस्ट्रार म्हणून लिंक इनटाइम  इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काम करणार आहे. 


DAM कॅपिटल अ‍ॅडवायजर्स लिमिटेड शिवाय आणखी काही कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होत आहेत. यामध्ये ट्रान्सरेल लाइट, ममता मशिनरी, कॉनकॉर्ड इनवायरो सिस्टीम्स या कंपन्यांचे आयपीओ देखील 19 डिसेंबरला गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. 


इतर बातम्या :



 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)