मुंबई : सध्या सगळीकडे निवडणुकीचे (Loksabha Election) वातावरण आहे. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी वेगवेगळ्या पक्षाचे नेते जोमात प्रचार करत आहेत. यावेळी जनता भाजपला नाकारणार आहे, असा दावा विरोधक करतात. तर आम्हीच पुन्हा एकदा सत्तेत येऊ असे सत्ताधारी भाजपकडून (BJP) सांगितले जाते. दरम्यान, एकीकडे निवडणुकीची धूम चालू असताना विरोधक कधी-कधी ईव्हीएमलाही (EVM) विरोध करताना दिसतात. पण ही ईव्हीएमची मशीन कोण तयार करतं? या कंपन्या कोणत्या आहेत? ईव्हीएम तयार करून या कंपन्यांनी आतापर्यंत किती पैसे कमवले आहेत? याची तुम्हाला कल्पना आहे का?
दोन कंपन्यांवर ईव्हीएम तयार करण्याची जबाबदारी
ईव्हीएम तयार करण्याची जबाबदारी ही दोन कंपन्यांवर आहे. या दोन्ही कंपन्या सरकारच्याच मालकीच्या आहेत. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स असे या दोन्ही कंपन्यांची नावे आहेत. यातील भारत इलेक्ट्रॉनिक्स ही कंपनी भारतीय शेअर बाजारावर सूचिबद्ध आहे. या कंपनीच्या एका शेअरचे मूल्य हे 236.50 रुपये आहे. पाच वर्षांपूर्वी या कंपनीत ज्या लोकांनी पैसे गुंतवलेले आहेत, त्यांनी आज चांगलेच पैसे कमवलेले आहेत. '
कंपनीने दिले 702 टक्के रिटर्न्स
पाच वर्षांपूर्वी म्हणजेच 2019 साली लोकसभेची निवडणूक झाली होती. त्यावेळी भारत इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीच्या एका शेअरचे मूल्य हे अवघे 29.38 रुपये होते. 2023 सालाच्या सुरुवातीला या कंपनीच्या शेअरमध्ये चांगलीच तेजी पाहायला मिळाली. गेल्या पाच वर्षांत या कंपनीने साधारण 702 टक्के रिटर्न्स दिले आहेत. खास गोष्ट म्हणजे गेल्या पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरच्या मूल्यात सातत्याने वाढ झाल्याचेच पाहायला मिळालेले आहे. या दोन कंपन्या संपूर्ण भारतात ईव्हीएम मशीन्स पुरवतात. यासह परदेशातही या कंपन्यांकडून ईव्हीएम मशीन्सची निर्यात केली जाते.
1982 सालापासून ईव्हीएम मशीनची चर्चा
तसं पाहायचं झालं तर ईव्हीएम मशीनचा इतिहास जुना आहे. 1982 सालापासून निवडणुकीतील धांदल कमी व्हावी यासाठी ईव्हीएम मशीनसारख्या यंत्रणेवर विचार केला जातत होता. या साली केरळमधील परावूर या विधानसभा जागेसाठी पहिल्यांदा ईव्हीएम मशीनचे ट्रायल घेण्यात आले.
2004 साली लोकसभा निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन
ईव्हीएममध्ये कालांतराने अनेक सुधारणा होत गेल्या. त्यांनातर 2001 साली तमिळनाडू, केरळ, पुद्दूचेरी, पश्चिम बंगाल या राज्यांत विधानसभा निवडणुकीवेळी ईव्हीएम मशीनचा वापर करण्यात आला. याआधी 1998 सालीदेखील लोकसभा निवडणुकीसाठी काही बुथ्सवर ईव्हीएम मशीन लावण्यात आली होती. 2004 साली पहिल्यांदाचा संपूर्ण लोकसभा निवडणूक ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून घेण्यात आली. 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक जागेसाठी ईव्हीएम मशीनसह व्हीव्हीपॅट मशीनही लावण्यात आली.
हेही वाचा :
तुम्ही गुंतवलेल्या पैशांचं LIC नेमकं करते तरी काय? उत्तर वाचून विश्वास बसणार नाही!
पीएफ खात्यातून पैसे काढत असाल तर आधी बदललेला 'हा' नियम वाचा, होऊ शकतो मोठा फायदा!
SIP च्या माध्यमातून तुम्हीही होऊ शकता करोडपती! फक्त 'या' सूत्राचं पालन करा!