Sushama Andhare on Sangli Loksabha : महाविकास आघाडीकडून आज सर्वाधिक हाय व्होल्टेज लढत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे, पुण्यातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हे यांचे उमेदवारी अर्ज विराट शक्तीप्रदर्शनाने दाखल केले. तिन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्यानंतर महाविकास आघाडीची सभा पार पडली. या सभेमध्ये बोलताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर कडाडून हल्लाबोल केला.  


मोदी साहेब मी 70 हजार कोटींचा घोटाळा केलाय, ते म्हणाले या या..


शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या सभेमध्ये बोलताना भाजपवर कडाडून हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, की जाहिराती या खोट्या गोष्टींची केल्या जातात. जंगली रमी पे आ जाओ ना, ही काय चांगल्यासाठी जाहिरात आहे का? आता मोदींची गॅरेंटी खरी असेल का मग? मोदी साहेब मी 70 हजार कोटींचा घोटाळा केलाय, ते म्हणाले या या मी तुम्हाला उपमुख्यमंत्री बनवतो. हीच ती मोदींची गॅरंटी, असे म्हणत त्यांनी अजित पवारांवरही तोफ डागली.  


सांगली लोकसभेचा तिढा मिटविण्यासाठी भर सभेत विनंती


दरम्यान, सुषमा अंधारे यांनी सभेला संबोधित करताना व्यासपीठावरच असलेल्या विश्वजित कदम यांना साद घातली. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगलीचा तिढा सोडवण्याची विनंती केली. कदम यांना उद्देशून त्या म्हणाल्या, की विश्वजित भैया आम्ही शिवसेनेची सगळी माणसं चांगली आहोत. आम्ही राज्यभर सर्वत्र महाविकास आघाडीचा प्रचार करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेतून हद्दपार करण्यासाठी एकत्र येऊ असे सांगत प्रश्न अप्रत्यक्षरीत्या सांगली लोकसभेचा तिढा मिटविण्यासाठी भर सभेमध्ये विनंती केली. 


विश्वजित कदम काय म्हणाले?


सुषमा अंधारे यांनी केलेल्या विनंतीचा मुद्दा पकडत विश्वजित कदम यांनीही उत्तर दिले. ते म्हणाले की, सुषमाताई तुम्ही म्हणाले चिडू नका. माझी पहिली निष्ठा काँग्रेस पक्षाशी अन मग मविआसोबत आहे. त्यामुळं कुटुंबातील एखादा व्यक्ती नाराज असेल तर त्यांची नाराजी ही दूर करणे माझं कर्तव्य आहे.


दुसरीकडे, सांगलीच्या लोकसभा जागेवरून महाविकास आघाडीमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. या जागेवर काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेले चंद्रहार पाटील अडचणीत असल्याची चर्चा आहे.  सांगलीमध्ये महायुतीमध्ये सुद्धा संजय पाटील यांच्या उमेदवारीवरून नाराजीचा खेळ रंगला आहे. भाजपच्या दोन माजी आमदारांनी राजीनामा देत पक्षालाच रामराम केला आहे. त्यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अजूनही सांगलीच्या जागेवरून सुरू असलेलं घमासान थांबलेलं नाही.   


इतर महत्वाच्या बातम्या