मुंबई : निवृत्तीनंतर आर्थिक चणचण भासू नये यासाठी कर्मचारी 'कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना'नेच्या (ईपीएफओ) खात्यामध्ये प्रतिमहिना ठराविक रक्कम जमा करत करतात. कर्मचाऱ्यांना हीच रक्कम निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन म्हणून दिले जाते. कर्मचाऱ्याने कामाची संस्था बदलल्यावर त्याने जमा केलेली रक्कम (PF) नव्या संस्थेकडे वर्ग करावी लागायची. आता मात्र ईपीएफओने आपल्या नियमांत बदल केला असून कर्मचाऱ्यांना आपला पीएफ ट्रान्सफर करावा लागणार नाही. या नियमामुळे देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांचा त्रास कमी होणार आहे. 


कर्मचाऱ्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागायचा?


कर्मचाऱ्याने आपल्या कामाची संस्था बदलल्यावर त्याने ईपीएफओ खात्यात जमा केलेली पीएफ रक्कम नव्या संस्थेच्या पीएफ खात्यात वर्ग करावी लागायची. त्यासाठी कर्मचाऱ्यांना वेगळा फॉर्म-31 भरावा लागायचा. यूनिव्हर्सल अकाऊंट नंबर (यूएएन) असूनदेखील कर्मचाऱ्यांना त्यासाठी वेगवेगळ्या कागदपत्रांची पूर्तता करू फॉर्म भरावा लागायचा. ही सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर जुन्या संस्थेतील पीएफ रक्कम कर्मचाऱ्याच्या नव्या संस्थेच्या पीएफ खात्यात वर्ग केली जायची. ही प्रक्रिया पार पाडताना कर्मचाऱ्यांकडून अनेक चुका व्हायच्या. प्रक्रियेची पूर्ण माहिती नसल्यामुळे यात बराच वेळ जायचा. आता मात्र ईपीएफओने घेतलेल्या या नव्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची डोकेदुखी संपणार आहे. जुन्या संस्थेतील पीएफ रक्कम नव्या संस्थेच्या खात्यात वर्ग करण्यासाठी आता कर्मचाऱ्यांना वेगळी प्रक्रिया पार पाडावी लागणार नाही. 


ईपीएफओने नेमका काय निर्णय घेतला आहे? 


कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या नियमांत महत्त्वाचा बदल केला आहे. आता नव्या नियमानुसार कर्मचाऱ्याने कामाच्या संस्थेत बदल केल्यास जुन्या संस्थेच्या पीएफ खात्यातील पैसे नव्या संस्थेच्या पीएफ खात्यात आपोआप ट्रान्सफर होणार आहेत. म्हणजेच कर्मचाऱ्याला आता फॉर्म-३१ भरण्याची गरज नाही. ईपीएफओच्या या निर्णयामुळे पीएफ ट्रान्सफर करून घेताना कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडणार नाही.


ईपीएफओ नेमकं काय करते?


दरम्यान, ईपीएफओच्या नियमानुसार कर्मचाऱ्याला भविष्य निर्वाह निधी म्हणून त्याच्या पगारातील 12 टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा करावी लागते. एवढीच रक्कम संबंधित संस्थादेखील कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा करत असते. याच पीएफ खात्यात जमा झालेली रक्कम कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर पेन्शन म्हणून दिली जाते. 


यूएएन नंबरची गरज काय? 


कर्मचारी आपल्या नोकरीदरम्यान अनेक संस्था बदलतात. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांची अनेक पीएफ खाती असतात. ही सर्व पीएफ खाती यूएएन नंबरच्या माध्यमातून एकत्र जोडली जातात. यूएएन नंबर असेल तर कर्मचाऱ्याला त्याची याआधीच्या संस्थेतील सर्व पीएफ खाती पाहता येता. याच क्रमांच्या मदतीने कर्मचारी त्याचे यूएएन कार्ड आणि पीएफचे पासबूकही डाऊनलोड करू शकतो.


हेही वाचा :


'पिंक टॅक्स' म्हणजे काय रे भाऊ? महिलांना कसं लुटलं जातं? वाचा...


सोनं रोजच खातंय भाव! पण का? सोन्याचा दर कसा ठरवतात? समजून घ्या सोप्या शब्दांत!