मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा दर (Gold Rate In India) सातत्याने वाढत आहेत. भारतात सध्या लग्नसराई आहे. या काळात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. सोन्याच्या रुपात गुंतवणूक करणाऱ्यांना सोन्याचे वाढलेले दर हे पुरक ठरतात. मात्र लग्नसराईच्या निमित्ताने सोने खरेदी करणाऱ्यांना मात्र हा चढा दर सध्या डोकेदुखी ठरतोय. सोन्याचा भाव (Gold Rate Update) का वाढतोय? सोन्याचा दर कसा ठरवला जातो? असे प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे या सर्व प्रश्नांनी उत्तरे सोप्या भाषेत जाणून घेऊ या..
सोन्याचा भाव कसा ठरतो?
सोन्याचा भाव ठरवण्यास अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. यातील प्रमुख आणि ठळक बाब म्हणजे सोन्याचे होणारे उत्पादन आणि या धातुची बाजारात मागणी. सोने हा तसा मौल्यवान धातू आहे. त्यामुळे त्याचे उत्पादन कमी असताना मागणी वाढल्यास त्याचा भाव आपोआपच वाढतो. दुसरी बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर लंडनमध्ये रोज सोन्याचा दर ठरवला जातो. सोन्याचा दर ठरवण्याची जबाबदारी ही लंडन बुलियन मार्केट असोशिएशनकडे (LBMA) आहे. इतर आंतरराष्ट्रीय संघटनांच्या मदतीने ही संस्था सोन्याचा दर ठरवते. त्यानुसार हा दर प्रत्येक देशात बदलतो. सोन्याचा हा दर दिवसातून दोन वेळा म्हणजेच लंडनच्या वेळेनुसार सकाळी साडे दहा आणि दुपारी तीन वाजता निश्चित केला जातो.
डॉलर महागला की भारतात सोने महागते
लंडनमध्ये ठरवलेल्या सोन्याच्या दरानुसार मग जगभरात सोन्याचा दर निश्चित केला जातो. ही संस्था सोन्याचा दर युरो, पाऊंड आणि डॉलरमध्ये निश्चित करते. त्यानुसार मग प्रत्येक देशात हा दर बदलतो. भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलर महागला तर सोन्याचा दरही महागतो. म्हणजेच भारतीय चलन रुपयाचे अवमुल्यन झाले की सोन्याचे दर वाढलेले दिसतात. गेल्या काही वर्षांचा अभ्यास केल्यास भारतीय रुपयाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य वाढत गेलेले आहे. त्यामुळे सोन्याचा दहरी वाढलेलाच आहे. महागाई, सोन्याचा साठा, त्याची मागणी या बाबीदेखील सोन्याचा भाव ठरवला जातो.
दहा वर्षांत सोने 140 टक्क्यांनी महागले
आकडेवारीत सांगायचे झाल्यास 1 एप्रिल 2014 रोजी सोन्याचा भाव हा 1300 डॉलर्स प्रतिऔस होता. तेव्हा भारतात सोन्याचा भाव हा 29 हजार रुपये प्रतितोळा होता. हाच भाव आता 1 एप्रिल 2024 रोजी 2260 डॉलर्स प्रतिऔस झाला आहे. त्यामुळे या दिवशी भारतातील सोन्याचा दर हा 69 हजार रुपये होता. डॉलरच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास दहा वर्षांच्या तुलनेत सोन्याचा भाव 74 टक्क्यांनी वाढला. तर हाच भाव भारतीय चलनाच्या तुलनेत 140 टक्क्यांनी वाढलेला आहे.
हे ही वाचा :
दहावी पास, पोस्टर्स लावून पोट भरलं, आता 4 हजार कोटींच्या उद्योगाचे मालक ; चंदुभाई विरानी कोण आहेत?
पुढचा आठवडा तुम्हाला करू शकतो मालामाल, 'हे' तीन IPO होणार खुले!
'या' पाच बँका देतात FD वर भरघोस व्याज, एका वर्षासाठी पैसे गुंतवल्यास होणार मोठा फायदा!