EPF Withdrawal : गुड न्यूज, पीएफ खात्यातून पैसे काढणं सोपं होणार, 1 लाखांपर्यंत रक्कम यूपीआयद्वारे काढता येणार, EPFO 3.0 लवकरच लाँच होणार
EPF Withdrawal : देशातील कोट्यवधी पगारदारासांठी महत्त्वाची अपडेट आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओ लवकरच नवी प्रणाली लागू करणार आहे.

नवी दिल्ली : देशातील कोट्यवधी पगारदारांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना लवकरच मोठे बदल करणार आहे. लवकरच ईपीएएफओ 3.0 लाँच केलं जाणार आहे. ज्यामुळं कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफ खात्यातून पैसे काढणं सोपं होणार आहे. पीएफ खात्यातील पैसे काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना किंवा सदस्यांना ऑनलाईन प्रोसेसची आवश्यकता लागणार नाही. ते एटीएम आणि यूपीआयद्वारे थेट आपल्या पीएफ खात्यातून 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकतात.
एटीएम आणि यूपीआयद्वारे पैसे काढता येणार
EPFO 3.0 नुसार पीएफ खात्यातून पैसे काढण्याची प्रक्रिया सोपी होणार आहे. पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी सध्या ऑनलाईन पोर्टलवर फॉर्म भरावा लागतो. त्यानंतर रक्कम मिळण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागते. मात्र, नवी व्यवस्था लागू झाल्यानंतर बँकेच्या एटीएमद्वारे किंवा मोबाईलमधील यूपीआय ॲपद्वारे लगचेच पीएफ रक्कम काढता येईल.
पीएफ ट्रान्सफर प्रक्रिया ऑटोमेटिक होणार
सध्या कर्मचाऱ्यांनी नोकरी बदलल्यास त्यांना पीएफला नव्या खात्यात ट्रान्सफर करण्यासाठी अर्ज करावा लागतो. EPFO 3.0 लागू झाल्यानंतर ही प्रोसेस ऑटोमेटिक होईल. नवी कंपनी जॉईन केल्यानंतर लवकरच नव्या नियोक्त्याकडील पीएफ खात्याशी सध्याचं खातं लिंक होईल, किंवा रक्कम ट्रान्सफर होईल.
ईपीएफओच्या सध्याच्या अधिकृत वेबसाईट आणि ॲपला अधिक यूजर फ्रेंडली केलं जाईल. यामुळं शिल्लक रक्कम तपासणं, क्लेम स्टेटस आणि इतर सुविधांचा वापर करणं सोपं होईल. EPFO 3.0 लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भातील सेवा डिजिटल आणि पारदर्शक करण्याचं नियोजन आहे.
कर्मचाऱ्यांना आधार लिंक करण्यामध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकदा केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना अडचणींचा सामना करावा लागतो. नव्या व्यवस्थेत डिजीटल वेरिफिकेशन प्रक्रिया सोपी केली जाईल.EPFO 3.0 मध्ये पीएफ शिल्लक रक्कम रिअल टाईम अपडेट केली जाईल.
सध्या पीएफ खात्यातून पैसे काढायचे असल्यास काही पर्यायांचा वापर करता येतो. पीएफ खात्यातून ॲडव्हान्स म्हणून रक्कम काढायाची असल्यास घर खरेदी, घरासाठी जागा खरेदी, लग्न, मुलांचं शिक्षण किंवा आजारपण इत्यादी कारणांसाठी पैसे काढता येतात. यासाठी वेगवेगळे नियम आहेत. पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी यूएएन पोर्टलच्या मेंबर पोर्टलवरुन लॉगीन करुन क्लेम फॉर्म भरुन द्यावा लागतो.























