Union Budget 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आज काही तासांतच संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प (Budget 2023) सादर करणार आहेत. प्रत्येकजण या अर्थसंकल्पाची आतुरतेने वाट पाहत आहे. जगभरात निर्माण झालेल्या मंदीच्या आणि छाटणीच्या सावटात अर्थमंत्र्यांकडून वेगवेगळ्या वर्गातील लोकांच्या वेगवेगळ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पातून कोणच्या अपेक्षा पूर्ण होणार? आणि कोणच्या अपेक्षांवर पाणी फिरणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


अर्थमंत्री अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा करू शकतात, असं बोललं जात आहे. पण अर्थसंकल्पाबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सर्वांना माहीत नाहीत. तुम्ही कधी विचार केलाय का? भारताचा पहिला अर्थसंकल्प कधी आणि कुठे सादर झाला होता? भारताचा पहिला अर्थसंकल्प दुसऱ्या देशात सादर झाला होता. 


भारताचा पहिला अर्थसंकल्प दुसऱ्या देशात सादर झाला


स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी सादर झाला असला तरी भारताच्या पहिल्या अर्थसंकल्पाबद्दल बोलायचं झालं तर त्याची सुरुवात ब्रिटिश काळात झाली होती. भारताचा पहिला अर्थसंकल्प ब्रिटनमध्ये 7 एप्रिल 1860 रोजी सादर करण्यात आला आणि त्याच दिवशी तो मंजुरही करण्यात आला होता. पहिला अर्थसंकल्प फायनान्स मेंबर जेम्स विल्सन यांनी सादर केला होता. 


अर्थमंत्री केसी नियोगी यांना कधीही अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली नाही


स्वतंत्र भारताच्या अर्थसंकल्पाबाबत बोलायचं झालं तर, आतापर्यंत एकच अर्थमंत्री असे आहेत की, ज्यांना एकदाही अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळालेली नाही. ते अर्थमंत्री म्हणजे, केसी नियोगी (Kshitish Chandra Neogy) होते. ते एकमेव व्यक्ती आहेत, जे अर्थमंत्री राहिले पण अर्थसंकल्प मांडू शकले नाहीत. खरं तर 1948 मध्ये त्यांनी केवळ 35 दिवस अर्थमंत्रीपद भूषवलं होतं. त्यांच्यानंतर जॉन मथाई (John Matthai) यांना भारताचे तिसरे अर्थमंत्री बनवण्यात आलं. त्यानंतर मथाई यांनीच देशाचा अर्थसंकल्प सादर केला.


'या' अर्थमंत्र्यांनी सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर केला


स्वतंत्र भारतात सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. मोरारजी देसाई यांनी अर्थमंत्री म्हणून दहा वेळा देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये आठ सर्वसाधारण आणि दोन अंतरिम अर्थसंकल्पांचा समावेश आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Budget 2023: देशात एकदा सादर झालंय 'ब्लॅक बजेट'; याचा नेमका अर्थ काय अन् का सादर करतात?