Budget 2022 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. "या अर्थसंकल्पातून नवीन काहीच देण्यात आले नाही. शिवाय देशाची दिशाभूल करण्यासाठी या अर्थसंकल्पातून पुढील 25 वर्षांच्या विकासाचे नवे गाजर दाखवण्यात आल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे. 


अशोक चव्हाण म्हणाले, " या आधी केंद्र सरकारने अनेक घोषणा केल्या आहेत. परंतु, त्या घोषणांची अद्याप अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देणार, देशात शंभर स्मार्ट सिटी उभारणार, 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था, महागाईवर नियंत्रण, प्रत्येक बेघराला घर, ‘मेक इन इंडिया’तून उत्पादन क्षेत्राचा सकल राष्ट्रीय उत्पादनातील वाटा 25 टक्क्यांवर नेणार, अशा अनेक घोषणा केंद्र सरकारने केल्या होत्या. परंतु, यातील एकही घोषणा अद्याप पूर्ण झालेली नाही "


"यंदाचा अर्थसंकल्प पोकळ"
यंदाचा अर्थसंकल्प पोकळ असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे. "यंदाच्या अर्थसंकल्पाला भाजपचे अनेत नेते ऐतिहासिक अर्थसंकल्प म्हणत आहेत. परंतु, यंदाचे अर्थसंकल्पीय भाषण गेल्या अनेक वर्षातील सर्वात लहान भाषण आहे. केंद्र सरकारकडे भरीव काही नाही, असते तर अर्थसंकल्पीय भाषणातून ते सांगितले असते. परंतु, सांगण्यासारखे काहीच नसल्याने हे भाषण संक्षिप्त झाले असावे. शेतकरी, बेरोजगार, नोकरदार, लहान-मोठे व्यावसायिक व उद्योजक आणि गरिबांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पातून काहीच देण्यात आले नाही. त्यामुळे हा एक पोकळ अर्थसंकल्प ठरला आहे, असा हल्लाबोल अशोक चव्हाण यांनी केला.  


अशोक चव्हाण म्हणाले,  "केंद्र सरकार दावा करत आहे की, देशाच्या अर्थव्यवस्थेचा 8 ते 9 टक्क्यांच्या वेगाने विकास होत आहे. जानेवारी 2022 मध्ये 1 लाख 40 हजार कोटींचे विक्रमी जीएसटी संकलन झाले. जर हे खरे असेल तर देशाच्या या वाढत्या उत्पन्नाचा अर्थसंकल्पातून सर्वसामान्य नागरिकांना थेट भरीव आर्थिक लाभ का मिळाला नाही? याचे उत्तर केंद्र सरकारने दिले पाहिजे.  


महत्वाच्या बातम्या