Budget 2022 PM Modi Reaction : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी अर्थसंकल्प सादर केला. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मागील काही अर्थसंकल्पीय भाषणाच्या तुलनेत यंदाचे भाषण हे कमी कालावधीचे भाषण ठरले आहे. अर्थसंकल्पीय भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. आज जाहीर झालेला अर्थसंकल्प हा 100 वर्षातील सर्वात मोठ्या महामारीमध्ये विकासाचा नवीन विश्वास घेऊन आला आहे, असं वक्तव्य यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पावर व्यक्त केलं. 


अर्थसंकल्पाचं सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. या अर्थसंकल्पातून तरुणांच्या अपेक्षा पूर्ण होणार आहेत. अर्थसंकल्पातील उपाययोजनांमुळे सीमा भागातील गावांना फायदा होईल. पूर्वोत्तर भारतातील नद्यांच्या किनारी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन मिळेल.  एमएसपी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आतापर्यंत 2 लाख कोटींचं हस्तांतरण होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि त्यांच्या पूर्ण टीमचं अभिनंदन केलं आहे. 


100 वर्षातील सर्वात भयंकर संकटकाळामध्ये हा अर्थसंकल्प विकासाचा नवीन विश्वास घेऊन आलाय. हा अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेला मजबूती देण्यासोबतच सर्वसामान्यांना अनेक नवीन संधी उपलब्ध करुन देणारा आहे. या अर्थसंकल्पामुळे गुंतवणूक वाढेल, Infrastructure वाढेल, नोकऱ्या वाढतील.   






लोकसभेत अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान म्हणाले की आधिक पायाभूत सुविधा, अधिक गुंतवणूक, अधिक विकास आणि आणखी रोजगार यासाठी सर्व संधींनी युक्त असा हा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प हरित-रोजगार निर्माण करेल. फक्त सध्याचे प्रश्न सोडवण्यासोबतच युवावर्गाच्या उज्वल भविष्याची हमी हा अर्थसंकल्प देतो असे त्यांनी नमूद केले.


शेतकऱ्यांसाठी ड्रोन, वंदेभारत रेल्वेगाडी, डिजिटल चलन, 5G सेवा, राष्ट्रीय डिजिटल आरोग्यसेवा याद्वारे प्रत्येक क्षेत्रात आधुनिकतेची कास आणि तंत्रज्ञान यामुळे आपल्या युवावर्गाला, मध्यमवर्गाला, गरीब, दलित आणि मागासवर्गीयांसाठी अगदी उपयुक्त असा हा अर्थसंकल्प, असे वर्णन पंतप्रधानांनी केले आहे.


गरीबांचे कल्याण हा या अर्थसंकल्पाच्या अनेक वैशिष्ठ्यांपैकी महत्वाचे वैशिष्टय.  प्रत्येक गरीब कुटुंबाला पक्के घर,शौचालय, नळाचे पाणी, गॅस जोडणी हे या अर्थसंकल्पाचे उद्दिष्ट आणि त्याच वेळी ते आधुनिक इंटरनेट जोडणी देण्याचेही उद्दिष्ट बाळगते.देशात प्रथमच हिमाचल, उत्तराखंड, जम्मू काश्मीर आणि ईशान्येकडील प्रदेशांसाठी ‘पर्वतमाला’ योजना सुरू करण्यात येत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. या योजनेमुळे डोंगराळ भागात दळणवळणाची आधुनिक साधने व्यवस्थापन होतील, असे पंतप्रधान म्हणाले.