Ajit Pawar  : "विरोधकांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे. शिवाय अर्थसंकल्प फसवा असल्याचा आरोप करण्यात आला. परंतु, महाविकास आघाडीच्या अर्थसंकल्पातून सर्वच घटकांना न्याय देण्यात आला आहे. अर्थसंकल्पावर विरोधकंनी केलेले सर्व आरोप खोटे आहेत. विरोधकांनी टीका करण्यापेक्षा वस्तूस्थिती सांगावी, असे आवाहन अर्थमंत्री अजित पवार यांनी केले आहे. 


अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. परंतु, विरोधकांकडून हा अर्थसंकल्प फसवा असून यामध्ये केंद्राच्याच सर्व योजना राबवल्याचा आरोप करण्यात आला आहे. विरोधकांच्या या आरोपांना अजित पवार यांनी आज विधानसभेत उत्तर दिले. 


अजित पवार म्हणाले, या अर्थसंकल्पातून महसूलात तूट कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. केंद्राच्या आणि राज्याच्या योजना एकत्र करून त्या पुढे चालवल्या जात असतात. प्रथम केंद्राकडून एखादी योजना सुरू करण्यात येते आणि काही वर्षानंतर ती योजना राज्याकडे चालवण्यासाठी दिली जाते. विरोधकांनाही याची माहिती आहे. परंतु, करायचा म्हणून विरोध केला जात आहे. अनेकांनी अर्थसंकल्पाचं कौतुक केलं आहे. परंतु, विरोधकांनी अर्थसंकल्पावर खोटे आरोप केले. विरोधकांनी टीका करण्यापेक्षा राज्यातील वस्तूस्थिती सांगावी."
 
"गेल्या वर्षीच्या आर्थीक वर्षात राज्यावर 65 हजार कोटींचे कर्ज होते. परंतु, ते कर्ज या वर्षी 90 हजार कोटींवर पोहोचले आहे. गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोना महामारीचे संकट आहे. राज्यही या संकटाचा सामाना करत आहे. विविध नैसर्गिक आपत्ती आणि कोरोनामुळे राज्यावर कर्जाचा भार वाढला आहे. केंद्राकडून 26 हजार 400 कोटी रुपये राज्याला येणं बाकी आहे. राज्याला राज्याचा हिस्सा मिळाला पाहीजे. परंतु, तो देण्यात आला नाही. केंद्राकडून मिळणारे जीएसटीचे पैसे यापुढे बंद होतील अशी शक्यता अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली आहे.


"महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत. यातील राष्ट्रवादीला जास्त निधी दिला जातो आणि शिवसेना काँग्रेसला कमी निधी दिला जातो, असा विरोधकांनी आरोप केला आहे. परंतु, हा निधी कोणत्याही एका वैयक्तीक पक्षाचा  नसतो. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 23 पक्षाचं सरकार चालवलं आहे. यात विविध पक्षाचे मंत्री होते. तसंच आमचंही तीन पक्षाचं सरकार आहे. निधी देत असताना पक्ष पाहिला जात नाही," अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.      


"कोरोनाला हलक्यात घेऊ नका"  
दरम्यान, अजित पवार यांनी कोरोनाला अजूनही हलक्यात घेऊ नये असे म्हटले आहे. " ज्या चीनमधून कोरोनाला सुरूवात झाली, तेथे आज 15 शहरे लॉकडाऊन करण्यात आली आहेत. दोन वर्षे कोरोनाचं सावट होतं. परंतु, आपण जास्तीत जास्त लसीकरण करण्याचा प्रयत्न केला. जेथे लसीकरणाला प्रतिसाद मिळत नाही तेथे आपण लोकप्रतिनिधी म्हणून समजावून सांगणे आवश्यक आहे. अजूनही कोरोना संपलेला नाही. त्यामुळे कोरोनाला हलक्यात घेऊ नका, असे आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले आहे. 


महत्वाच्या बातम्या


राज्यातील सहकारी साखर कारखाना विक्री गैरव्यवहार प्रकरण विधानसभेत गाजलं, अजित पवार-देवेंद्र फडणवीस आमनेसामने


Ajit Pawar: टाळी एका हातानं वाजत नाही, दोन्ही बाजूंकडून चुकतंय- अजित पवार


Ajit Pawar : राजकीय नेत्यांनी आरोप प्रत्यारोप बंद करुन विकासाला महत्व द्यावं : अजित पवार