Pune: महाविकास आघाडी सरकार बदल्यांमध्ये महाघोटाळा करत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. याच प्रकरणी मुंबई पोलिसांनी आज देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन दोन तास चौकशी केली. ज्यामुळं महाराष्ट्रातील राजकारणात थिणगी पडली. तर, केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून सातत्यानं केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. या संपूर्ण परिस्थितीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. ऐकमेकांना संपवण्यासाठी आपल्या हातातील यंत्रणांचा उपयोग केला जतोय. परंतु, टाळी एका हातानं वाजत नसून दोन्ही बाजूंकडून चुकत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
अजित पवार पुण्या दौऱ्यावर असून त्यांनी आज शहरातील विविध विकासकामांचं उद्घाटन केलंय. त्यावेळी त्यांनी राज्य विरुद्ध केंद्र यांच्यातील एकूण परिस्थितीवर भाष्य केलंय. दरम्यान, अजित पवारम्हणाले की, "राजकारणात एकमेकांचा राग केला नाही पाहिजे. एकमेकांना संपविण्यासाठी आपल्या हातातील यंत्रणांचा उपयोग केला जातोय. हे चुकीचे आहे. आपण ज्यांच्याबद्दल बोलतोय त्यांच्याबद्दल बोलण्याची आपली योग्यता आहे का याचाही विचार केला जात नाही. टाळी एका हाताने वाजत नाही. दोन्ही बाजूकडून चुकतंय असं माझं मत आहे".
तसेच "आम्ही ओबीसी आरक्षणासाठी आयोग निर्माण केलाय. तो निर्णय न्यायालयात टिकेल का माहित नाही. पण या चार पाच महिन्यात या आयोगाने इमपीरिकल डेटा गोळा करावा. लोक विचारतायत की निवडणूका कधी होणार. निवडणूका दोन- तीन- चार महिने पुढे गेल्यात. मध्यंतरी अफवा उठली की दोनचा प्रभाग होणार. पण आगामी महापालिका निवडणुकांमधे तिनचाच प्रभाग असेल, असंही त्यांनी म्हटलंय.
पुणे शहरातील विविध विकासकामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमादरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार चेतन तुपे आदी उपस्थित होते.
हे देखील वाचा-
- संजय राऊतांच्या ईडी चौकशीवर राज ठाकरेंचं अप्रत्यक्ष वक्तव्य, म्हणाले...
- राजकीय अभिनिवेशातूनच कारवाई, दबावात आणण्याचा प्रयत्न; आम्ही सगळे पुरावे सीबीआयला देऊ : देवेंद्र फडणवीस
- Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीसांना दिलेल्या नोटिशीनंतर भाजप आक्रमक, राज्यभर आंदोलनं, नोटीशीची होळी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha