BSNL Revival Plan: केंद्रीय मंत्रिमंडळाकडून BSNLसाठी 89,000 कोटी रुपयांच्या पुनरुज्जीवन पॅकेजला मंजुरी
BSNL Revival Plan: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलसाठी तिसऱ्या मदत पॅकेजला मंजुरी देण्यात आली आहे.
BSNL Revival Plan: केंद्रीय मंत्रिमंडळाकडून (Union Cabinet) बीएसएनएलसाठी (BSNL) 89,000 कोटी रुपयांच्या पुनरुज्जीवन (Revival Package) पॅकेजला मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे. पॅकेजचा वापर BSNL च्या 4G आणि 5G सेवा वाढवण्यासाठी केला जाईल, असं सांगितलं जात आहे. केंद्र सरकारचा असा विश्वास आहे की, दूरसंचार क्षेत्रातील सरकारी PSU ची त्याच्या धोरणात्मक महत्त्वामुळे भरभराट झाले पाहिजे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलसाठी तिसऱ्या मदत पॅकेजला मंजुरी देण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीएसएनएलला सुमारे 89,047 कोटी रुपये मिळतील. या वृत्तानंतर सरकारी कंपनी आयटीआयचा शेअर 5 टक्क्यांनी वधारला आहे.
बीएसएनएलला सरकारकडून एकूण 1.64 लाख कोटी रुपयांचे पॅकेज मिळालं आहे. कंपनीच्या पुनरुज्जीवनासाठी सरकारनं या पॅकेजची तीन भागांत विभागणी केली आहे. BSNL च्या 4G आणि 5G सेवांसाठी हे पॅकेज मंजूर झाल्याचं बोललं जात आहे.
सरकारनं कंपनीला 700 मेगाहर्ट्झ बँडमध्ये स्पेक्ट्रमचे वाटप केलं आहे. या स्पेक्ट्रमची किंमत सुमारे 39,000 कोटी रुपये आहे. सेवांमध्ये सुधारणा, बॅलेंसशीट मजबूत करणं आणि फायबर नेटवर्कचा विस्तार यांचा कंपनीला देण्यात येणाऱ्या मदत पॅकेजमध्ये समावेश आहे. बीएसएनएलची 33 हजार कोटी रुपयांची थकबाकी इक्विटीमध्ये रूपांतरित करण्यात आली आहे. यासह, कंपनीनं त्याच रकमेच्या (33,000 कोटी रुपये) बँकेच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी बाँड जारी केले आहेत.
आयटीआयच्या शेअरमध्ये तेजी
केंद्रीय मंत्रिमंडळाकडून बीएसएनएलसाठी तिसरं मदत पॅकेज जाहीर होताच शेअर मार्केटमध्येही त्याचे पडसाद पाहायला मिळाले आहेत. आयटीआयच्या शेअरमध्ये 5 टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून आलं. हा शेअर 114 रुपयांच्या पुढे गेला. एका महिन्यात 8 टक्के, तीन महिन्यात 20 टक्के आणि एका वर्षात या शेअर्समध्ये 25 टक्क्यांची वाढ झाली आहे.
आयटीआय ही सरकारी कंपनी आहे. या कंपनीला बीएसएनएलकडून मोठ्या ऑर्डर मिळतात. सध्या आयटीआयमध्ये सरकारचा 90 टक्के हिस्सा आहे. गेल्या 2 तिमाहींपासून DII म्हणजेच देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या शेअरमध्ये कोणताही बदल झालेला नाही. तो 7.71 टक्क्यांवर कायम आहे.
2022 मध्येही जाहीर झालेलं मदत पॅकेज
विशेष म्हणजे, बीएसएनएलसाठी केंद्रानं जाहीर केलेले हे पहिलं पुनरुज्जीवन पॅकेज नाही. यापूर्वी, गेल्या वर्षीच जुलै 2022 मध्येही, सरकारनं दूरसंचार PSUs अधिक फायदेशीर संस्थांमध्ये बदलण्याच्या उद्देशानं 4G आणि 5G सेवा प्रदान करण्यासाठी पॅकेज जाहीर केलं होतं. ज्यामध्ये BSNL च्या ऑप्टिकल फायबर नेटवर्कच्या विस्तारावर आणि BSNL च्या सेवांचा दर्जा सुधारण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं होतं.