Madhuri Dixit : सध्या बाजार आयपीओंसाठी (IPO) पुरक आहे. बजाज हाऊसिंग फायनान्स, पीएन गाडगीळ, प्रिमियम एनर्जीज यासारख्या कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना आयपीओच्या माध्यमातून दमदार रिटर्न्स दिले आहेत. यातील काही कंपन्यांच्या आयपीओंनी गुंतवणूकदारांना थेट दुप्पट पैसे दिले आहेत. असे असताना आता भारतातील कोट्यवधी गुंतवणूकदारांचे लक्ष आयपीओ मार्केटवर केंद्रीत झालं आहे. यामध्ये सिनेसृष्टीतील कलाकारदेखील सुटू शकले नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने भविष्यात आयपीओ येणाऱ्या अशाच एका कंपनीत कोट्यवधी रुपये गुंतवले आहेत. 


स्विगीचा आयपीओ लवकरच येणार


फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म कंपनी स्विगी या कंपनीचा आयपीओ (Swiggy IPO) लवकरच येणार आहे. याच आयपीओची सध्या भांडवली बाजारात चर्चा आहे. 11,000 कोटी रुपयांचा हा आपयीओ साधारण या वर्षाच्या शेवटपर्यंत येण्याची शक्यता आहे. याच कंपनीने माधुरी दीक्षितचेही लक्ष वेधले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आयपीओ येण्याधीच या कंपनीत माधुरी दीक्षितने कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. 


345 रुपये प्रति शेअरच्या हिशोबाने व्यवहार


मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार माधुरी दीक्षितने 345 रुपये प्रति शेअरच्या हिशोबाने स्विगी कंपनीत गुंतवणूक केली आहे. माधुरी दीक्षितने हा व्यवहार इनोव8 (Innov8) या कंपनीचे संस्थापक रितेश मालिक (Ritesh Malik) यांच्या सोबतीने सेकंडरी मार्केटच्या माध्यमातून केला आहे. इनोव8 ही एक को-वर्किंग स्पेस कंपनी आहे. या कंपनीला ओयोने (Oyo) खरेदी केले होते. माधुरी दीक्षित आणि रितेश मालिक यांनी साधारण तीन कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत. या दोघांनीही त्यासाठी दीड-दीड कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. माधुरी दीक्षित सामान्यत: त्यांचे पती डॉक्टर श्रीराम नेने (Shriram Nene) यांना सोबत घेऊन गुंतवणूक करते. 


सेकंडरी ट्रांजेक्शन व्यवहार म्हणजे नेमकं काय? 


सेकंडरी ट्रान्जेक्शन व्यवहारात कंपनीचा थेट संबंध, हस्तक्षेप नसतो. एखादी व्यक्ती अन्य व्यक्तीला संबंधित कंपनीचे शेअर्स परस्पर विकत असते. याच व्यवहाराला सेकंडरी ट्रांजेक्शन म्हटले जाते.  


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा :


अमेरिकेच्या फेडरल बँकेचा महत्त्वाचा निर्णय, व्याजदरात मोठी कपात; भारतातही कर्ज स्वस्त होणार का?


NTPC IPO : शेअर मार्केटमध्ये आयपीओचा बोलबाला, आता NTPC मैदानात उतरणार, 10 हजार कोटी उभारणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी