ACC Ambuja : एसीसी-अंबुजा सिमेंट प्लांटला टाळं; 10 हजार कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ
Ambuja ACC Factory Stop Work : एसीसी सिमेंट (ACC Cement) आणि अंबुजा सिमेंट (Ambuja Cement) यांनी त्यांचे कारखाने बंद केल्याने सुमारे 10,000 कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
ACC Ambuja Cement Factory Stopped Work : एसीसी सिमेंट (ACC Cement) आणि अंबुजा सिमेंटचे (Amjuja Cement) कारखाने बंद केल्याने सुमारे 10,000 कर्मचारी आणि त्यांचं कुटुंब संकटात सापडलं आहे. हिमाचल प्रदेशातील बर्माना येथील एसीसी सिमेंट आणि दरलाघाट येथील अंबुजा यांनी बुधवारी त्यांचे प्लांट बंद केले. दोन्ही कंपन्यांनी कर्मचारी आणि कामगारांना गुरुवारपासून कामावर न येण्याचे आदेश जारी केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपन्यांनी मागणी कमी असल्याचं कारण देत प्लांटला टाळं ठोकलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बर्माना येथील एसीसी प्लांटचे प्रमुख अमिताभ सिंह यांनी आदेश जारी करत परिस्थिती सुधारेपर्यंत व्यवस्थापनाने कर्मचार्यांना कामावर परत न येण्यास सांगितलं आहे. तसेच कर्मचाऱ्यांना पुढील आदेशांची प्रतीक्षा करण्यास सांगितलं आहे.
सिमेंट प्लांट आणि वाहतूकदारांमध्ये वाद
रिपोर्टनुसार, प्लांट बंद होण्याचं कारण वेगळं आहे. सिमेंट प्लांट आणि वाहतूकदार यांच्यामध्ये वाद सुरु आहे. सिमेंट प्लांटचा वाहतूकदारांशी करारासंदर्भात वाद सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. या कारणामुळे सिमेंट प्लांट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे अंबुजा सिमेटच्या पाचही ट्रक युनियनने या प्रश्नाबाबत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. बर्माना कारखान्यातील टाळेबंदीचा परिणाम लहान दुकानदारांपासून ते ट्रक वाहतुकीवर अवलंबून असलेल्या बर्माना ते स्वारघाटपर्यंतच्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर होणार आहे. एसीसी सिमेंटच्या युनिटमध्येही 4000 ट्रक कार्यरत होते, त्यांच्यावर पोट भरणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही संकट कोसळलं आहे.
10 हजार कर्मचारांवर उपासमारीची वेळ
सध्या सिमेंट कंपन्या आणि वाहतूकदार यांच्यातील समन्वय सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र यामध्ये सुधारणा होताना दिसत नाही. बर्माना एसीसी सिमेंट उद्योग जिल्ह्याच्या तसेच राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. हिमाचल प्रदेश तसेच शेजारील सीमावर्ती राज्यांतील मोठ्या संख्येने कुटुंबं या सिमेंट प्लांटवर अवलंबून आहेत. त्यामुळे सुमारे 10,000 हजार छोटे-मोठे कर्मचारी आणि कामगारांसोबत त्यांचं कुटुंब यामुळे संकटात सापडलं आहे.
दरम्यान, एसीसी सिमेंटच्या प्लांटमध्ये ट्रक ड्रायव्हर आणि ऑपरेटर आणि त्यांच्याशी संबंधित मेकॅनिक व्यतिरिक्त, 300 कर्मचारी, तर 900 कंत्राटी कर्मचारी आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून एसीसीचं गाग्गल युनिटच्या तोट्यात असल्याची चर्चा सुरू होती. सध्या एसीसी सिमेंट आणि अंबुजा सिमेंट हे दोन्ही प्लांट सध्या अदानी समुहाच्या मालकीचे आहेत.