रामायण (Ramayan) हे महाकाव्य म्हणजे भारतीय पुराणकथांचा आत्मा आहे. रामायणाचे महत्त्व केवळ एक धार्मिक ग्रंथ म्हणून मर्यादित नाही, तर आपल्या रोजच्या जगण्यात मार्गदर्शक ठरतील असे संदेश रामायणाच्या प्रत्येक पानावर सापडतात. रामायण हे काव्य प्रामुख्याने प्रभू श्रीरामांचा जीवनप्रवास उलगडून सांगतं. प्रभू श्रीरामांचा एक राजपुत्र ते सम्राट हा जो प्रवास झाला त्यातून सदाचार, कर्तव्य आणि नैतिकता यांचा वस्तुपाठ मिळतो. प्रतिष्ठा आणि मूल्य यांचा संदेश देणाऱ्या या काव्यात काही चटकन लक्षात न येणारे पण प्रचंड ताकदीचे आर्थिक नियोजनाचे संदेश दडले आहेत. हे संदेश आजच्या काळातही वैयक्तिक पातळीवरील आर्थिक नियोजन करताना तितकेच कालसुसंगत आहेत. प्रभू श्रीरामांच्या जीवनातून मिळालेले आजच्या काळात मार्गदर्शक ठरतील असे 3 महत्त्वाचे आर्थिक संदेश कोणते, हे आपण या लेखातून समजून घेणार आहोत.


1. स्व-नियंत्रण आणि शिस्तीचे महत्त्व


स्व-नियंत्रण आणि शिस्त हे प्रभू श्रीरामांच्या अंगी असलेले दोन अत्यंत महत्त्वाचे गुण. वैयक्तिक आर्थिक नियोजन करताना हे दोन्ही गुण महत्त्वाचे ठरतात. रामायणाच्या कथेतील अनेक प्रसंगांमध्ये हे दिसून येतं, की प्रभू श्रीरामांनी घेतलेले निर्णय हे भावनांच्या आवेगातून किंवा झटपट लाभ मिळवण्याच्या हेतूने घतेलेले नसून ते कर्तव्याच्या आणि सदाचाराच्या प्रेरणेतून घेतलेले आहेत. जीवनाकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन आर्थिक नियोजनाच्या बाबतीत लागू करता येतो. भावनेच्या भरात केलेला खर्च किंवा दूरदृष्टी न ठेवता घेतलेले आर्थिक निर्णय, या दोन्हींचे वाईट दीर्घकालीन परिणाम भोगावे लागू शकतात.


संदेश : खर्च आणि बचत करण्याची शिस्त लावून घेणे ही अत्यंत मूलभूत आवश्यक गोष्ट आहे. प्रभू श्रीरामांनी ज्याप्रमाणे दूरदृष्टी आणि कर्तव्यबुद्धीने आपला मार्ग निवडला, त्याप्रमाणे प्रत्येकाने आपल्या क्षणभंगुर इच्छा बाजूला ठेवून ठरवलेल्या आर्थिक उद्दिष्ट्यांप्रमाणे नियोजन करायला हवे. खर्च करण्याआधी आपल्या उत्पन्नातून काही रक्कम बचत म्हणून बाजूला काढून ठेवणे, स्थैर्य आणि वाढीची हमी देणाऱ्या गुंतवणुकीच्या दीर्घकालीन पर्यायांमध्ये गुंतवणूक करणे, अनावश्यक कर्ज टाळणे, अशा अनेक कृतींमधून हे साध्य करता येईल. आर्थिक नियोजन करताना प्रभू श्रीरामांच्या शिस्तीचा आणि स्व-नियंत्रणाचा आदर्श घेतल्यास त्यातून समृद्ध आणि सुरक्षित भवितव्य आकार घेईल यात शंका नाही.


2. मर्यादा ओळखून राहण्याचा गुण


रामायणाच्या संपूर्ण कथेत, वनवासात असताना प्रभू श्रीराम प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या मर्यादा ओळखून राहिल्याचं दिसून येतं. म्हणूनच प्रभू श्रीरामांना 'मर्यादापुरुषोत्तम' असेही म्हणतात. राजपुत्र असूनही किती साधे जगता येऊ शकते हे सांगताना सर्व सुखसुविधांपासून दूर राहण्याचा आदर्श त्यांनी घालून दिला. आनंद आणि समाधान यांचा भौतिक संपत्तीशी काहीही संबंध नसतो ही शिकवण त्यांनी आपल्या जगण्यातून दिली.


संदेश : प्रभू श्रीरामांच्या जीवनचरित्राचा हा पैलू आर्थिक शहाणपणाचं आणि आपल्या मर्यादांच्या कक्षेत राहण्याचं महत्त्व अधोरेखित करतो. सहज कर्ज मिळण्याच्या आणि उपभोगवादाच्या आजच्या काळात आपल्या आर्थिक कुवतीच्या बाहेरचं जीवन जगण्याच्या हव्यासाला बळी पडण्याची शक्यता वाढली आहे. त्यातून आर्थिक अस्थिरता आणि कर्जबाजारीपणाही वाढण्याची शक्यता असते. प्रभू श्रीरामांनी शिकवलेल्या साधेपणाचा आदर्श घेतल्यास आपल्या इच्छा कोणत्या आणि आपल्या गरजा कोणत्या हे ओळखून आवश्यक तेवढाच खर्च करणं आणि कर्जाच्या सापळ्यापासून दूर राहणं प्रत्येकाला शक्य होईल. या विचाराने आर्थिक नियोजन केल्यास केवळ आर्थिक स्थैर्यच नव्हे तर समाधान आणि मनःशांती या दोन्ही गोष्टी साध्य करता येतात.


3. दानशूरता आणि समाजासाठी संपत्तीचं महत्त्व


रामायणातील आणखी एक महत्त्वाचा संदेश म्हणजे प्रभू श्रीरामांनी वेळोवेळी दाखवलेली दानशूरता. संपत्ती हे समाजाची सेवा करण्याचं साधन आहे हा संदेश आपल्याला प्रभू श्रीरामांच्या जीवनातून मिळतो. अयोध्येचं रामराज्य हे त्याच्या वैभवासाठी ओळखलं जातं. त्या राज्यात संपत्तीचा वापर हा लोकांच्या कल्याणासाठी केला जात असे. खरी संपत्ती तीच, जिचा लोककल्याणासाठी वापर करता येतो, हे तत्त्व रामराज्याच्या संकल्पनेत अधोरेखित केलं गेलं आहे.


संदेश : आधुनिक संदर्भात रामराज्याचा आदर्श घ्यायचा झाल्यास, केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी संपत्तीचा संचय न करता त्यासोबत येणारी सामाजिक जबाबदारी महत्त्वाची असते हे समजून घ्यावं लागेल. संपत्ती दान करणं, विधायक कार्यात पैशांची गुंतवणूक करणं आणि समाजकल्याणाच्या कामांमध्ये आर्थिक मदत करणं, या मार्गांनी आपण आपल्या संपत्तीचा वापर समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी करू शकतो. महत्त्वाचं म्हणजे हा दृष्टिकोन आपल्याला केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हे तर समाजात काहीतरी योगदान देण्यासाठी आर्थिक यश मिळवायला हवं यासाठी प्रेरित करतो. असं केल्यास भौतिक संपत्तीचा वापर हा समाजाच्या भल्यासाठी करता येतो, या प्रभू श्रीरामांच्या कर्तव्यतत्परतेचा वारसा जपणं प्रत्येकाला शक्य होईल. प्रभू श्रीरामांची व्यक्तिरेखा केंद्रस्थानी असलेलं रामायण हे महाकाव्य हा ज्ञानाचा मोठा खजिना आहे. त्यातून फक्त अध्यात्मिकच नव्हे तर दैनंदिन जीवनात उपयोगी येतील असे अनेक संदेश मिळतात.


संपत्तीचं व्यवस्थापन करतानाही हे संदेश उपयुक्त ठरतात. स्व-नियंत्रण आणि शिस्त, मर्यादेत राहण्याची वृत्ती आणि समाजाचं भलं करण्यासाठी संपत्तीचा वापर करणं हे केवळ नैतिक संदेश नाहीत तर सुदृढ आर्थिक आरोग्य आणि सामाजिक समृद्धीचे मूलभूत स्तंभ आहेत. आर्थिक क्षेत्र हे प्रचंड गुंतागुंतीने भरलेलं आहे. त्यात वावरत असताना प्रभू श्रीरामांच्या जीवनप्रवासातून मिळालेले हे संदेश आर्थिक ज्ञान आणि समाधान मिळवण्याच्या मार्गातले दीपस्तंभ आहेत. या संदेशांना आपल्या जगण्यात स्थान दिल्यास केवळ वैयक्तिक आर्थिक यशच नव्हे तर व्यापक अर्थाने रामराज्याच्या संकल्पनेत अभिप्रेत असलेली समाजाची सर्वंकष समृद्धी साध्य होईल.


हेही वाचा :


SIP च्या माध्यमातून तुम्हीही होऊ शकता करोडपती! फक्त 'या' सूत्राचं पालन करा!


मैदानात धावांची कमाई, गुंतवणुकीतही सिक्सर! धोनी भाईने पुण्यातल्या 'या' कंपनीत टाकले पैसे!


हिऱ्याच्या आकाराचा आलिशान बंगला, महागड्या गाड्या, शेतकरीपुत्र हजारो कोटींचा मालक कसा झाला?