लॉकडाउन तिसऱ्या टप्प्यात वाढेल अशी सगळ्यांचीच मानसिकता होती आणि तसंच घडलं सुद्धा. केंद्र सरकारने 17 मे पर्यंत देशभरात लॉकडाउन वाढविला. कारण लोकांना माहिती आहे की कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधून केलेल्या संवादात राज्यातील काही भागात अटी शर्तीसह लॉकडाउन संदर्भात मोकळीक देण्याचे संकेत दिले आहेत. 3 मे रोजी लॉकडाउन लागू करून 40 दिवस पूर्ण होणार आहेत, त्यात आता आणखी 14 दिवसांची भर पडली आहे. तरीही टप्याटप्पयाने अर्थचक्र रुळावर आणण्यासाठी राज्य सरकारतर्फे काही प्रयत्न निश्चित केले जाणार आहेत. मात्र, लॉकडाउन शिथिलता म्हणजे नागरिकांनी धुमशान घालणे अपेक्षित नव्हे हे सगळ्यांनीच लक्षात ठेवले पाहिजे. त्याचवेळी लॉकडाउनचा हा तिसरा टप्पा शेवटचा ठरावा या दृष्टीने सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजे.


अनेक सर्व सामान्य नागरिकांना लॉकडाउन उठवा असा वाटत असले तरी सावधपणाने आपण पावलं टाकत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. या मोकळीक देण्याकरिता काही नियम आखण्यात आले असून यामध्ये प्रामुख्याने ऑरेंज आणि ग्रीन झोनचा विचार केला जाणार आहे. मात्र, रेड झोनमध्ये कुठल्याही प्रकारची शिथिलता मात्र करण्यात येणार नाही. विशेष देशात कुठल्याही प्रकारची रेल्वे सेवा, विमान सेवा, चालू केली जाणार नसून शाळा, महाविद्यालय, मॉल्स आणि चित्रपटगृह संपूर्ण देशात बंद राहणार आहेत. आपल्या राज्यात 14 जिल्हे रेड झोन, 16 जिल्हे ऑरेंज झोन तर 6 जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत.


महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजारांपेक्षा पुढे गेला असून दिवसागणिक मृतांची संख्या वाढत आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणारे सर्वजण त्यांचं काम करत आहे. आरोग्य यंत्रणा रस्त्यावर उतरली असून नागरिकांचं सर्वेक्षणाचा काम करीत आहे. कोरोनाला कशापद्धतीने दूर ठेवता येईल यासाठी प्रशासन आटोकाट प्रयत्न करीत आहे. संपूर्ण देशामध्ये कोरोनाबाधितांची संख्या ही महाराष्ट्रात जरी जास्त असली तरी काही जिल्ह्यामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला नसून किंवा फारच कमी रुग्ण आढळल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांना ग्रीन झोनमध्ये टाकण्यात आले आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते या दोन टप्प्यातील ह्या लॉकडाउनमुळे महाराष्ट्राला कोरोनाला आळा घालण्यात बऱ्यापैकी यश निर्माण झाले आहे.


केंद्रीय गृह सचिव प्रीती सुदान यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या स्थितीचा आढावा घेऊन देशभरातील जिल्ह्याचे वर्गीकरण रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये केले आहे. त्याप्रमाणे कोणत्या राज्यातील कोणते जिल्हे कोणत्या झोन मध्ये आहेत याची माहित देण्यात आली आहे.


मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा, धुळे, अकोला, जळगाव, मुंबई उपनगर हे जिल्हे रेड झोन मध्ये येत असून या जिल्ह्यमधील लॉकडाउन शिथिलता करणे परवडणारे नाही. तर ऑरेंज झोन मध्ये येणाऱ्या ह्या जिल्ह्यात रायगड, अहमदनगर, अमरावती, बुलडाणा, नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, नांदेड, चंद्रपूर, परभणी, सांगली, लातूर, भंडारा, बीड यांचा समावेश असून या जिल्ह्यात कशा पद्धीतीने कामकाज सुरु करता येईल का? याचा विचार शासन दरबारी सुरु आहे. त्याचप्रमाणे ग्रीन झोनमध्ये येणारे या जिल्ह्यांमध्ये उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यांचा समावेश असून 3 मे नंतर येथील अटी शर्ती कमी करून शिथिलता कशी आणता येईल याचा विचार केला जात आहे.


खऱ्या अर्थाने आता नागरिकांनी सजग आणि सावधगिरी बाळगण्याची गरज असून आता पर्यंत जे नियम पाळले आहेत त्याचा अवलंब कायम केला पाहिजे. लॉकडाउन मधील काही झोन मधील शिथिलता म्हणजे कोरोना संपलेला नाही. कारण कोरोना आजार हा संसर्गजन्य रोग आहे, जर घाई गडबड गोधंळ झाला आणि लोकांनी नियम पायदळी तुडवलेत तर शासनाला पुन्हा केलेली शिथिलता मागे घ्यावी लागेल असं कुठलंही कृत्य नागरिकांकडून होणार नाही याची दक्षता प्रत्येकालाच घ्यावी लागेल. कोरोनाचा संकट पाहता ते असं एका महिन्यात जाणार नाही निश्चितच त्याला काही काळ लागणार आहे. आपल्या जिल्ह्यात कोरोना नाही म्हणजे आपण कसंही वागला तर चालेल ही प्रवृत्ती बळावणं घातक आहे. राज्याच्या राजधानीत कोरोनाबाधितांचा आकडा मोठा आहे तो कमी व्हायला काही काळ लागणार आहे. त्यासाठी तेथील आरोग्य यंत्रणा दिवस रात्र काम करीत आहे हे सगळ्यांनी येथे ध्यानात घेतलं पाहिजे.


आपल्याकडे देशातील काही राज्ये आहेत ही कोरोनाला अटकाव करण्यात बऱ्यापैकी यशस्वी झाली आहेत. त्याचप्रमाणे लवकरच महाराष्ट्र या संकटातून बाहेर पडेल याकरिता सर्वानी मिळून प्रयत्न केले पाहिजे. ज्या पद्धतीने राज्यातील नागरिकांनी आतापर्यंत ४० दिवस पाळलेल्या संयमाच फळ वाया जाऊ द्यायचं नसेल तर नागरिकांनी विशेष खबरदारी घेणं जास्त गरजेचं आहे, आणखी 14 दिवस त्यांनी सरकारला सहकार्य केलं पाहिजे. आपल्या सुरक्षित आरोग्याकरिता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. कारण काही लोकांच्या चुकांमुळे या सर्व मेहनतीवर पाणी फिरण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. आपल्या शासनाने लॉकडाउनमध्ये काही शिथिलता आणली असेल तर ती काही प्रमाणात व्यवसाय उद्योगधंदे चालू व्हावेत याकरिता केली ती व्यवस्था आहे हे विसरून चालणार नाही. आजही आपल्या आजूबाजूंच्या जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आहे, आपल्या त्यांना कशी मदत करता येईल याचा पण विचार केला गेला पहिजे.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग