Madhu Kambikar Passes Away: मधु कांबीकर : भैरवी संपली, पण घुंगरांचा नाद आठवणींत राहील!

Madhu Kambikar Passes Away at 73: 27 नोव्हेंबर 2016 चा दिवस होता. मुंबईतील माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात रसिकांची अभूतपूर्व गर्दी झाली होती. सभागृह खचाखच भरले होते. मराठी रंगभूमी, पुणे आणि गोपीनाथ सावकार प्रतिष्ठान यांच्या वतीने 'लावण्य संगीत' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वयाची त्रेसष्ट वर्षे पूर्ण केलेल्या मधु कांबीकर, तब्बल एका तपानंतर म्हणजे 12 वर्षांनंतर पुन्हा एकदा रंगमंचावर लावणी सादर करणार होत्या. त्यासाठी काही दिवसांपासून त्यांच्या तालमी सुरू होत्या. वयाच्या या टप्प्यावर पुन्हा रंगमंचावर उतरायचे म्हणजे केवळ नृत्याच्या हालचाली पुन्हा आत्मसात करायच्या नव्हत्या; शरीराला पूर्वीची लय आठवून द्यायची होती आणि मनालाही जुन्या आत्मविश्वासाची सोबत मिळवून द्यायची होती. त्या संध्याकाळी त्यांच्या मनात उत्सुकता (Marathi Actress) असेल, आनंद असेल आणि इतक्या वर्षांनंतर पुन्हा आपल्याच कलेसमोर उभे राहण्याची धाकधूकही असेल. त्यामुळे प्रेक्षकांपेक्षा जास्त अधीरता मधु कांबीकर यांच्या मनी दाटली होती!
कार्यक्रम सुरू झाला. मधु कांबीकर (Madhu Kambikar) यांनी दोन नृत्ये सादर केली. त्यानंतर त्या भैरवीसाठी रंगमंचावर आल्या. सादरीकरण सुरू असतानाच त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. कोणतीही दुसरी व्यक्ती असती तर तिने तिथेच सादरीकरण थांबवले असते. मात्र, मधु कांबीकर यांच्यातील जिद्दी कलाकार मागे हटला नाही. त्यांनी कमालीच्या संयमाने आणि जिद्दीने आपली 'भैरवी' पूर्ण केली आणि प्रेक्षकांची दाद मिळवली. विलक्षण जिद्दीने आपला नृत्याविष्कार पूर्ण करुन त्या कशाबशा मेकअप रूममध्ये पोहोचल्या; तिथे त्या अचानक बेशुद्ध होऊन कोसळल्या. त्यांना तातडीने परळ येथील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मेंदूशी संबंधित गंभीर त्रास आणि पक्षाघाताची लक्षणे आढळल्याने अतिदक्षता विभागात उपचार सुरू झाले. सुरुवातीच्या वृत्तांनुसार त्यांचा उजवा हात बधिर झाला होता; काही वृत्तांतांत मेंदूत रक्तस्राव झाल्याचे आणि शरीराच्या एका बाजूवर परिणाम झाल्याचे निदर्शनास आले. पुढच्या काळात त्यांच्या हालचाली आणि बोलण्याच्या क्षमतेवर दीर्घकालीन परिणाम झाल्याचे समोर आले. दरम्यान त्यांच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली.
त्या घटनेनंतर मधूताईंचे सार्वजनिक कलाजीवन जवळजवळ थांबले. ज्या पायांनी लावणीच्या तालावर असंख्य रसिकांना मंत्रमुग्ध केले होते, त्या पायांना आता पूर्वीसारखी साथ देता येत नव्हती. ज्या आवाजातून व्यक्तिरेखा जिवंत होत, तो आवाजही पूर्वीसारखा उमटत नव्हता. गतवर्षीच्या एका लेखात त्यांच्या स्नुषा शीतल जाधव यांनी, घरात चित्रपट सुरू असताना मधूताईंच्या चेहऱ्यावर कधी हसू तर कधी डोळ्यांत पाणी उमटत असल्याची आठवण सांगितली तेव्हा थोडेसे हायसे वाटले. त्या मृत्यूच्या दारातून सुखरूप परतल्या खऱ्या, पण नियतीने त्यांच्याकडून त्यांचे चालणे, बोलणे आणि सर्वात प्रिय असलेली कला हिरावून घेतली होती. आपली वाचा गेल्याचे त्यांना दुःख नव्हते मात्र आपण आता नाचू शकत नाही की चालू शकत नाही याची त्यांना अतिव खंत होती! त्या बाभूळकाट्याने त्यांना आयुष्यभर सललं असेल!
मधु कांबीकर यांच्या आयुष्याचा हा अध्याय समजून घेण्यासाठी त्यांच्या कलाप्रवासाच्या सुरुवातीपर्यंत मागे जावे लागते. 28 जुलै 1953 च्या दिवशी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातल्या माळेगाव इथला त्यांचा जन्म. त्यांचे मूळ नाव मधु वामन जाधव. त्यांचे बालपण कांबी या गावात गेले. त्या कोल्हाटी समाजातून नृत्यकलेत दाखल झाल्या. महाराष्ट्राच्या लोककलांचे जतन करणाऱ्या, विशेषतः तमाशा आणि लावणीशी ऐतिहासिक नाते असलेल्या समाजाची रसरशीत नाळ त्यांनी एक कलावंत म्हणून कधी तुटू दिली नाही! बालपणापासून नाटक, नृत्य आणि लोककलांच्या वातावरणात त्या रमल्या. त्यांचे वडीलही कलाकार होते आणि ते त्यांना कार्यक्रमांना घेऊन जात. शाळेत मात्र त्यांचे मन फारसे रमले नाही; परंतु कलेच्या बाबतीत मात्र त्यांची शिकण्याची वृत्ती विलक्षण होती.
वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी पुण्यात कथ्थकचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. पुढे चौदाव्या वर्षी गुरू, पांडुरंग घोटीकर आणि लावणीसम्राज्ञी लक्ष्मीबाई कोल्हापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली लावणीचे धडे गिरवले. त्यांच्या नृत्यातील तयारी ही केवळ सहज आलेल्या अंगविक्षेपांवर अवलंबून नव्हती; त्यामागे शिक्षण, तालमी आणि परंपरेची जाण होती. लोककलावंत म्हणून त्या नाव कमावू लागल्या, तेव्हा समाजातील काही स्तरांकडून त्यांच्याकडे दुय्यम नजरेने पाहिले जात होते. लावणीचा संबंध केवळ करमणूक, शृंगार किंवा तमाशातील स्त्रीच्या शरीराशी जोडणाऱ्या समाजात, त्या कलेला अभ्यासाची आणि कौशल्याची प्रतिष्ठा देण्यासाठी मधूताईंना सतत स्वतःची गुणवत्ता सिद्ध करावी लागली. त्यांचा पुढचा प्रवास हा या संघर्षावर मात करण्याचाही प्रवास होता.
चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी त्यांनी नाटकांतूनही काम केले. प्रभाकर पणशीकर यांनी त्यांना अनिल बर्वे लिखित ‘पुत्रकामेष्टी’ या नाटकात काम करण्याची संधी दिली. या भूमिकेसाठी त्यांना नाट्यदर्पणचा विशेष लक्षवेधी अभिनेत्री पुरस्कार मिळाला. लोककलावंत म्हणून त्यांच्याकडे पाहणाऱ्या काहींच्या पूर्वग्रहांचा सामना करत, त्यांनी रंगभूमीवर स्वतःचे स्थान निर्माण केले. पुढे मराठी चित्रपटांत काम करण्याचा मार्ग खुला झाला. त्यांच्या अभिनयाची ताकद केवळ नृत्यात नव्हती; ग्रामीण स्त्रीचे बोलणे, चालणे, तिच्या आयुष्याचा संघर्ष आणि तिच्या ममत्वाची खोली त्या पडद्यावर आणू शकत होत्या. ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी आपल्या ‘लमाण’ या आत्मकथनात मधु कांबीकर या उत्तम नर्तिकेबरोबरच उत्तम अभिनेत्री असल्याचे नमूद केले, ही त्यांच्या अभिनयक्षमतेची महत्त्वपूर्ण पावती होय.
‘शापित’ या चित्रपटाने त्यांना मराठी चित्रपटसृष्टीत ठळक ओळख मिळवून दिली. राजदत्त दिग्दर्शित या चित्रपटात त्यांनी ‘बिजली’ ही व्यक्तिरेखा साकारली. ग्रामीण, वेठबिगारीच्या जीवनात अडकलेल्या स्त्रीचे दुःख, तिच्यावर होणारे अत्याचार, तिच्या मनातील रोष आणि अखेरीस उभे राहण्याची ताकद, या सगळ्यांचा पट त्यांनी अभिनयातून उलगडला. मधूताईंनी त्या भूमिकेतील देहबोली आणि ग्रामीण भाषेचा बाज अतिशय सहजतेने उभा केला. या चित्रपटातील कामासाठी त्यांना राज्यस्तरीय गौरव आणि फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला.
त्यानंतर त्यांनी अनेक मराठी चित्रपटांतून विविध प्रकारच्या भूमिका केल्या. ‘हेच माझं माहेर’, ‘रानपाखरे’, ‘देवापुढे माणूस’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘एक होता विदूषक’, ‘रावसाहेब’, ‘झपाटलेला’ आणि ‘डेबू’ यांसारख्या चित्रपटांतील त्यांची कामे आजही स्मरणात आहेत. दादा कोंडके यांच्यासोबतच्या चित्रपटांत त्यांनी विनोदी आणि लोकाभिमुख कथानकांत सहज वावर दाखवला, तर ‘एक होता विदूषक’सारख्या चित्रपटातून पारंपरिक लावणीची लय आणि अदा व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी शंभराहून अधिक चित्रपटांमध्ये काम केल्याची नोंद आहे. त्यांचे योगदान नायिका किंवा आईच्या भूमिका करण्यापुरते मर्यादित नव्हते; ग्रामीण स्त्री, लोककलावंत, कणखर माता आणि आयुष्याने झिजवलेली सामान्य स्त्री अशी विविध रूपे त्यांनी पडद्यावर जिवंत केली.
मधूताईंच्या कलेचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांनी लावणीला केवळ चित्रपटातील नृत्य म्हणून पाहिले नाही. तिचा इतिहास, तिची परंपरा, तिच्या रचनांतील भाषिक आणि सांस्कृतिक अर्थ यांची त्यांना ओढ होती. 1996 मध्ये त्यांनी ‘मधुप्रीतम’ ही संस्था सुरू केली. ‘सखी माझी लावणी’ या कार्यक्रमातून त्यांनी पारंपरिक लावणीचा इतिहास आणि तिचे विविध प्रकार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. लावणीच्या लिखित स्वरूपातील नोंदी जमवून तमाशाच्या इतिहासाची मांडणी करण्याचे कामही त्यांनी केले. यासाठी त्यांना आपल्या तमाशा फडातील कलाकारांचे सहकार्य लाभले. एक कलाकार म्हणून मिळवलेल्या लोकप्रियतेचा उपयोग कलेच्या संवर्धनासाठी केला.
ही बाब विशेष महत्त्वाची आहे. कारण लोककलेचे कौतुक करणे आणि लोककलेचा वारसा जतन करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एखादी लावणी लोकप्रिय होते, तिचे चित्रपटांत रूपांतर होते, तिच्यावर टाळ्या पडतात; पण तिच्या मागची परंपरा, तिच्या शब्दांतील इतिहास आणि कलाकारांनी जपलेली शिस्त विस्मृतीत जाऊ शकते. मधूताईंनी ‘सखी माझी लावणी’च्या माध्यमातून त्या परंपरेला नवे व्यासपीठ देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी लावणीच्या बदलत्या सादरीकरणावर स्वतःची मतेही मांडली होती. त्यांच्या दृष्टीने लावणी ही केवळ बाह्य आकर्षणाची गोष्ट नव्हती; तिच्या मागे गायन, ताल, भाषा, साहित्य आणि अभिनयाची समृद्ध परंपरा होती. ही जाणीव त्यांच्या कलाविषयक बांधिलकीची खूण होती.
2018 मध्ये मधु कांबीकर यांना झी चित्र गौरवचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना तो पुरस्कार स्वतः स्वीकारता आला नाही. त्यांच्या स्नुषा शीतल जाधव यांनी त्यांच्या वतीने तो स्वीकारला. हा पुरस्कार त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीची आणि मराठी चित्रपटसृष्टीतील योगदानाची दखल होता. त्या वेळी त्यांना रंगमंचावर उभे राहून पुरस्कार स्वीकारता न येणे ही त्यांच्या चाहत्यांसाठी वेदनादायी गोष्ट होती. ज्या कलावंताने आयुष्यभर आपल्या कलेतून इतरांना आनंद दिला, तिच्या कार्याची दखल तिच्या आजारपणात घेतली गेली, ही बाबही महत्त्वाची आहे. 'शापित', 'झपाटलेला', 'बिनकामाचा नवरा' अशा गाजलेल्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची जादू दाखवणाऱ्या मधु कांबीकर यांनी प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान मिळवले. केवळ रुपेरी पडदाच नव्हे, तर महाराष्ट्राची लोककला असलेल्या लावणीला त्यांनी अभिजात प्रतिष्ठा मिळवून दिली. परंतु, ज्या रंगमंचाने त्यांना नाव, पैसा आणि प्रसिद्धी दिली, त्याच रंगमंचावर त्यांच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायी प्रसंग घडल्याने त्यांना ओळखणारी मंडळी आणि त्यांचे चाहते, गेली काही वर्षे हळहळ व्यक्त करत होते.
मधु कांबीकर यांच्या कलेचे मोल त्यांच्या नृत्याच्या चपळतेतच नव्हते; तर त्या नृत्यामागच्या जाणिवेत होते. त्या लोककलेतून आलेल्या होत्या, पण लोककलेच्या चौकटीत बंदिस्त राहिल्या नाहीत. त्या चित्रपटांत गेल्या, त्यांनी नाटकांत काम केले, त्या दूरदर्शनवर दिसल्या आणि तरीही लावणीच्या परंपरेशी नाते टिकवून राहिल्या. त्यांच्या कारकिर्दीतून दिसते की, लोककलावंताची प्रतिभा योग्य संधी मिळाल्यास मुख्य प्रवाहातील अभिनयाला समृद्ध करू शकते. त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धातील आजारपण ही मोठी शोकांतिका आहे; मात्र त्यातून त्यांच्या कलेचे मूल्य कमी होत नाही.
त्यांच्या घुंगरांचा नाद थांबलाय, पण त्या नादाला आकार देणारी त्यांची कला लोपली नाही. ‘शापित’मधील बिजलीच्या डोळ्यांतून दिसणारी वेदना, ‘एक होता विदूषक’मधील लावणीची अदा, ‘झपाटलेला’मधील आईची भूमिका आणि ‘सखी माझी लावणी’च्या माध्यमातून जपलेली परंपरा, या सगळ्यांत मधु कांबीकर आजही सचेत आहेत. रंगमंचावर घडलेल्या त्या एका दुर्दैवी घटनेने त्यांचे सार्वजनिक जीवन बदलले; पण त्यांच्या कलेने मराठी सांस्कृतिक स्मृतींमधली त्यांचे स्थान चिरंतन राखलेय. त्यांचे 'मधुरंग' हे आत्मचरित्र, याची ग्वाही देते!
एका सच्च्या कलाकारासाठी रंगमंचावर काम करता करता आजारी पडणे, घायाळ होणे हा कलेवरील निष्ठेचा परमोच्च बिंदू असू शकतो, पण तोच प्रसंग त्यांच्या आयुष्याची अखेरची वर्षे इतकी वेदनादायी करेल अशी कल्पना देखील करवत नाही! अभिनय आणि नृत्याच्या जोरावर प्रेक्षकांना अनुभव समृद्ध करणाऱ्या या अभिनेत्रीचा हा प्रदीर्घ शारीरिक आणि मानसिक संघर्ष अत्यंत दुःखद आणि चटका लावून जाणारा आहे. त्यांच्या निधनवृत्ताने दुःख होणे साहजिक आहे. मात्र अशा काही घटना घडल्यावर वाटतं की, सुरेश भटांच्या काव्यपंक्ती अगदी सार्थ आहेत - 'जगण्याने छळले होते, मरणाने केली सुटका!' मधुताईंची सुटकाच झालीय, कारण त्या कलोपासक होत्या आणि कला हाच त्यांचा प्राण होता, आणि गेले दशकभर त्या आपल्या प्राणप्रिय कलेपासून विभक्त होत्या! त्या जिथेही असतील तिथे त्यांना सुख मिळो! त्यांच्या आयुष्याची भैरवी संपन्न झाली असली तरी त्यांच्या घुंगरांचे नाद लोकस्मृतींमध्ये सचेत राहतील!
- समीर गायकवाड
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज





















