सध्या देशभरात थैमान घालत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायू हा उपचाराचा भाग म्हणून मोठे योगदान देत आहे. कारण या कोविड-19 या विषाणूमुळे होणाऱ्या आजरात घशावाटे फुफ्फुसांवर हल्ला होत असतो. यामुळे अनेक रुग्णांना श्वसनाच्या विकारांना सामोरे जावे लागत आहे. फुफ्फुसाच्या शेवटच्या भागाला असणारा भाग त्याला शास्त्रीय भाषेत अल्वेओलाय (वायुकोश) असे संबोधिले जाते. या भागाद्वारेच आपण जो नैसर्गिक दृष्ट्या बाहेरच्या वातावरणातील ऑक्सिजन घेतो आणि तो शरीरातील रक्ताला पुरवठा केला जातो. जर याच भागाला इजा झाली तर मग श्वास घ्यायला त्रास होतो आणि मग अनेकवेळा रुग्णाला कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासते. त्यामुळे विशेष म्हणजे मुंबई शहरात महापालिकेने ऑक्सिजनयुक्त बेड्सची व्यवस्था करून ठेवली आहे. जर आपल्याला फुफ्फुस चांगले ठेवायचे असतील तर योग प्राणायाम सारखे प्रकार फायदेशीर ठरु शकतात.
कोरोनाबाधित काही प्रमाणातच रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज लागते. कोरोनाचा विषाणू सर्वप्रथम माणसाच्या श्वसन संस्थेवर हल्लाबोल करतो. त्यामुळे त्याची कार्यक्षमता मंदावते, आणि श्वास घ्यायला त्रास होतो. त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांना कोरोनाबाधित रुग्णांच्या फुफ्फुसांवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागते. कोरोनाच्या आजारात ज्या रुग्णाला फुफ्फुसाच्या व्याधीची अडचण दूर होते तो रुग्ण अर्ध्यापेक्षा जास्त बरा झालेला असतो. वैद्यकीय तज्ज्ञांसाठी रुग्णाच्या फुफ्फुसाची कार्यक्षमता कशी वाढवता येईल याकडे सर्वात जास्त लक्ष असते.
पुणे येथील के इ एम रुग्णालयाचे श्वसनविकारतज्ज्ञ, डॉ. स्वप्नील कुलकर्णी सांगतात की, " साधारणतः कोविड-19 या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रुग्णांना निमोनिया किंवा फुफ्फुसाला संसर्ग होतो. यामध्ये फुफ्फुसाच्या शेवटच्या भागाला म्हणजेच अल्वेओलायला इजा होते. शरीरात ऑक्सिजन घेतल्यानंतर फुफ्फुसातील अल्वेओलायमार्फत त्या ऑक्सिजनची रक्ताशी देवाण-घेवाण होते आणि त्यामुळे आपल्या सर्व शरीराला ऑक्सिजन मिळत असते. जर अल्वेओलाय इजा झाली तर शरीराला ऑक्सिजनची कमतरता जाणवायला लागते आणि मग रुग्णाला धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होण्यासारख्या समस्या सुरु होतात. मग अशावेळी रुग्णाला कृत्रिमरित्या ऑक्सिजन दिला जातो. जो पर्यंत रुग्ण नैसर्गिक दृष्ट्या ऑक्सिजन घेत नाही, तो पर्यंत त्याला कृत्रिमरित्या ऑक्सिजन दिले जाते. कोविडच्या रुग्णाला साधारण 4-5 दिवस ऑक्सिजन दिल्यानंतर तो पूर्वपदावर येतो. विशेष म्हणजे एखाद्या रुग्णाला जेव्हा ऑक्सिजन देण्याची वेळ येते त्यासाठी काही मापदंड आहे त्यानुसार रुग्णाला कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. रुग्ण जर अतिगंभीर झाल्यास त्याला अति दक्षता विभागात हलविण्यात येते".
"एस पी ओ 2, या चाचणीद्वारे शरीरातील ऑक्सिजनची पातळी मोजली जाते. या आणि अन्य मापदंडानुसार डॉक्टर रुग्णाला कृत्रिम ऑक्सिजन द्यायचे की नाही ते ठरवतात. काही कोविडबाधित रुग्णांना फुफ्फुसाचे आजार होत असल्यामुळे या रुग्णांना ऑक्सिजन लागण्याची शक्यता जास्त असते. विशेष म्हणजे व्यवस्थित वेळेवर उपचार घेतल्यामुळे रुग्ण उपचार घेऊन बरे होत आहे".
राज्य आणि महापालिका प्रशासन जेव्हा केव्हा कोरोनाच्या नियोजनाच्या कामाचा आढावा घेत असतात त्यावेळी कोरोनाबाधित रुग्णांच्या तयारीमध्ये सध्या प्रशासनाच्या अजेंड्यावर असणारा महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे कोरोनाच्या रुग्णांना लागणारा 'ऑक्सिजन'. कोरोना आजारावर सध्या तरी ठोस असे कोणतेच औषध नसले तरी ऑक्सिजनच्या आधारावर आणि सध्या जी काही औषध आहे त्यावर रुग्ण बरे होत आहे.
राज्य सरकारच्या कोरोनाविषयक विशेष कृती दलाचे प्रमुख डॉ. संजय ओक, सांगतात की, " शास्त्रीय दृष्ट्या हे खरंय की कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारामध्ये ऑक्सिजनची गरज भासत आहे, म्ह्णून फिल्ड हॉस्पिटल जी उभारली गेली आहेत. त्या ठिकाणी मोठ्या संख्येने ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच रुग्णालयांनाही ऑक्सिजनचे पॉईंट वाढविण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. तसेच बी के सी येथे उभारण्यात आलेल्या फिल्ड हॉस्पिटल च्या शेजारी मोठे ऑक्सिजनचे टँकर ठेवण्यात आले आहे, जेणेकरून ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहील. ऑक्सिजन लागणारे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे".
काही दिवसापूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये एक बातमी आली होती की, उत्तर महाराष्ट्रातील एका शहरात लोकांनी ऑक्सिजनचे सिलेंडर घरीच नेऊन त्याद्वारे उपचार करत होते. मात्र तक्रारीनंतर हा प्रकार थांबला.
राज्याच्या आरोग्य विभागाचे ,राज्य सर्वेक्षण अधिकारी, डॉ प्रदीप आवटे, सांगतात की, " सगळ्याच रुग्णांना काही ऑक्सिजनची गरज लागत नाही. कोविड-19 विषाणूच्या या आजारामध्ये, हा विषाणू थेट रुग्णांच्या फुफ्फुसांवर हल्ला करतो आणि त्याना निकामी करण्याचं काम करत असतो. अनेक वेळा रुग्ण हा सायलेंट हायपॉक्सिया (पुरेसा ऑक्सिजन मिळण्यास अडथळा निर्माण होणे) किंवा हैप्पी हायपॉक्सिया मध्ये जातो म्हणजे त्याला पटकन कळत नाही की श्वास घेण्यास त्रास होत आहे, म्हणून पल्स ऑक्सिमीटर लावून रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी मोजली जाते आणि ते प्रमाण 90 किंवा 90 पेक्षा खाली असेल तर रुग्णाला कृत्रिम प्राणवायूचा पुरवठा देण्याबाबत निर्णय त्या विषयातील तज्ज्ञ घेतात , जेणेकरून त्याच्या रक्तातील ऑक्सिजन ची पातळी नियंत्रित करण्यास मदत होते.
या सगळ्या वातावरणात नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, सध्या सुरु असलेल्या लॉक डाऊनमध्ये बऱ्यापैकी शिथिलता दिल्यामुळे नागरिक बिनधास्त घराबाहेर पडत आहेत. एकंदरच काय तर आपल्या कृत्रिम ऑक्सिजन घेण्याची गरज भासू नये याबाबत सतर्क राहावे लागेल, नाहीतर ऑक्सिजन है, तो जहान है अशी म्हणण्याची पाळी येईल.
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | कोरोना, टोळधाड अन् चक्रीवादळ कसं जगायचं!
- BLOG | खासगी रुग्णालयाचं 'हे' वागणं बरं नव्हं