>> संतोष आंधळे


बुधवार, जूनपासून ( बहुतांश ) सर्वांना घराबाहेर पडता येणार आहे. एकाप्रकारच्या सक्तीच्या आरामातून सुटका होणार आहे. लहानपणी मुले शाळा चालू होण्याच्या अगोदर जसे छोटेखानी 'प्लॅन' करतात तसंच काहीतरी सध्या मोठ्यांच्या बाबतीत घडताना दिसतंय. देशाच्या आर्थिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या मुंबईकरांना किती कौतुक ते. आयुष्यभर व्यायाम न करणारे मात्र या लॉकडाउनच्या शिथिलतेत 'मॉर्निंग वॉक'साठी सज्ज झालेत. या प्रक्रियेत आपल्याला कुठेही गर्दीत जाणे टाळायचे असून 'सकाळी चालणे' हा एकट्याने करायचा प्रकार असून कुणीही कळपाने जाऊ नये अशी अपेक्षा आहे. तसेच सामाजिक अंतराचे भान जोपासाच म्हणजे दोन व्यक्तीमध्ये किमान 5-6 फूट इतकं अंतर ठेवा. या सगळ्या तुमच्या अशा शिस्तबद्ध वागण्याचा तुमच्या मित्र-मैत्रिणींना राग येऊ शकतो, गैरसमज होऊ शकतात, किती ते कोरोना कोरोना अशा आणभाका होऊ शकतात. मात्र या काळात आरोग्याची सुरक्षा घेतच मैत्रीची वीण घट्ट ठेवा.


आपल्याकडे सोशल डिस्टंसिंग, शब्द प्रयोग झाल्यानंतर त्याला सामाजिक अंतर म्हटल्यावर काही जण हा शब्द प्रयोग चुकीचा असून, याला दोन व्यक्तीमधील सुरक्षित अंतर ठेवा असे म्हणावे असा आग्रह धरु लागले. मात्र यामधील मतीत अर्थ लक्षात घेऊन ती कृती करावी हे महत्वाचं. महाराष्ट्रातील लॉकडाउनमधील शिथिलतेची नियमावली झाली. कधी कुठे, काय आणि कसं चालू होणार याची सर्व माहिती नागरिकांनी घेतली. आता त्यांना जो तथाकथित स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद झालाय त्याचा उपयोग त्यांनी योग्य पद्धतीने घेतला पाहिजे.


राज्याच्या आरोग्य विभागाने राज्यातील कोरोना विषयीची केली. रविवारी राज्यात 1 हजार 248, रुग्ण बरे होऊन घरी गेले, मात्र जवळ-जवळ त्यांच्या दुपटीने 2 हजार 487 नवीन रुग्णांचे राज्यात निदान झाले. तर या एका दिवसात 89 नागरिकांचा या आजरामुळे दुर्दैवी मृत्यू झालाय. राज्यात आजच्या घडीला 36 हजार 031 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. सध्याची कोरोनबाबतची ही परिस्थिती आहे. ही राज्यातील सर्वच नागरिकांनी विशेषतः मुंबई आणि पुणे या शहरातील लक्षात घेतली पाहिजे. कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. कोरोनाबाधितांच्या रुग्ण संख्येत वाढ होतच आहे. त्यात पाऊस केव्हाही हजेरी लावू शकतो अशी परिस्थिती आहे. या काळात दरवर्षीप्रमाणे येणाऱ्या ह्या सर्दी-ताप-खोकला आजाराचं आगमन होईल. त्यामुळे नागरिकांनी चांगला व्यायाम करून सकस अन्न खाऊन प्रतिकारशक्ती चांगली ठेवली पाहीजे.


आपले डॉक्टर आजारी रुग्णांची काळजी घेत असले तरी, या आरोग्य यंत्रणेवर ताण येत कामा नये. याची काळजी आपण सर्वानी मिळून घेतली पाहिजे. विशेष म्हणजे या काळात कोरोनाच्या आजराबरोबर अनेकांच्या मानसिक आरोग्याचा विचार केला गेला पाहिजे. अनेक जणांना हा आजार आहे हेच त्यांना कळत नाही. त्यामुळे जेव्हा केव्हा वेळ मिळेल, तेव्हा मित्र-नातेवाईकांशी गप्पा मारून एकमेंकाना धीर देण्याची हीच ती वेळ आहे. ही गोष्ट छोटी असली तरी त्यांचं या घडीला फार महत्व आहे. अनेकांच्या नोकऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही जणांचे पगार कापले गेले आहे. बँकांचे हफ्ते आणि कुटुंबाचा खर्च, मुलांच्या शाळेचा खर्च अशा विविध समस्या समोर उभ्या आहेत. अनेक जण या सर्व समस्येचं उत्तर शोधण्यात मग्न आहेत. मात्र प्रत्येकालाच याचं उत्तर मिळेल असं नाही. त्यामुळे या काळात एकमेकाला आर्थिक मदत करता नाही जमली तर धीर देण्यासाठी भक्कम उभं राहणं गरजेचे आहे. अनेक जण अडचणीत असतील, याचा जर कुणाला अधिक किंवा मानसिक त्रास होत असेल तर वेळीच डॉक्टरकडे नेण्यास मित्रांनी मदत केली पाहिजे.


वैद्यकीय तज्ञांच्या मते कोविड -19 हा विषाणू तात्काळ असा नष्ट होणार नाही. मात्र नागरिंकानी सर्व सुरक्षिततेचे नियम पाळले तर रुग्ण संख्या आटोक्यात आणणे शक्य आहे. त्यामुळे शिथिलता मिळाली आहे म्हणून उगाच प्रवास करू नका, महत्वाची कामे झाली की शक्यतो सगळ्यांनी घरी थांबण्यास पसंती दिली पाहिजे. अनेक वेळा आपल्याला आता फावला वेळ आहे, म्हणून लोकं शॉपिंग करण्यासाठी बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरं तर कोरोनाने हे दाखवून दिले आहे की आपल्या गरजा ह्या फार नाही आहेत. आपणच त्या वाढवून ठेवल्या आहेत. अनेक ठिकाणी फिरल्यामुळे अनेकांचे हात दुकानात ठेवलेल्या वस्तूला लागतील त्यातून प्रादुर्भाव होउ शकतो. कोरोनामुळे आता आपण बहुतांश बदलण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे.


कोरोनाबरोबर जगताना नवीन जीवनशैली पद्धती विकसित करावी लागेलच, त्याचबरोबर स्वतःला शिस्त आखून द्यावी लागणार आहे. अनेकांचं या कोरोनामुळे संपूर्ण आयुष्यच बदलणार आहेत त्यामध्ये एक म्हणजे विद्यार्थी, त्यांच्या शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होतील. लोकांच्या खाण्याच्या - पिण्याच्या अनेक गोष्टी बदलतील, भीतीपोटी लोकं बाहेर खाणार नाहीत. या आणि अनेक अशा नवीन बदलांसह पुढचे निरोगी आयुष्य जगायचे असेल तर त्या बदलांना आपलंसं करून दाखवायची तयारी ठेवली पाहिजे.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग