गेल्या काही दिवसापासून कोरोना विषाणूंचा होणार प्रादुर्भाव, त्यामुळे आजरी पडलेले रुग्ण आणि काही बळी, याच्यापेक्षा देशामध्ये लॉकडाऊन वाढणार की शिथिल होणार यावरच जोरदार चर्चा सुरु आहे. जर आपल्याकडे असं मोजमाप करण्याचं काही साधन किंवा तंत्रज्ञान असतं तर कोरोना पेक्षा दसपटीने जास्त वेळा बोलणारा शब्द म्हणून लॉकडाऊन या शब्दाची निवड झाली असती. जगात आणि विश्वात घडतंय काय? आणि नागरिकांना 'इंटरेस्ट' लॉकडाऊन वाढवला तर काही शहरात तरी तो शिथिल करतील काय? काही वेळेपुरते का होईना 'वाईन शॉप' उघडतील काय? आम्हाला गावाला जात येईल काय? असे विविध प्रश्न पडताना दिसत आहे. एकंदरचं काय तर, आपण व्यवस्थित आहोत ना बाकीच्याच काही होवो ही वृत्ती बाळागणे घातक आहे.


भारतात 21 दिवसाचा लॉकडाऊन घोषित केल्यानंतरचा आजचा शेवटचा दिवस 14 एप्रिल, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसापूर्वीच घोषणा करून लॉक डाउन 30 एप्रिलपर्यंत केला, त्याच्यापुढे जाऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन 3 मेपर्यंत केला. पहिल्या लॉकडाऊनचा आजचा शेवटचा दिवस म्हणून अनेकांनी मित्रांना नातेवाईकांना फोन केले. मनुष्य हा आशावादी असतो आणि असावा. पहिला लॉकडाऊन संपत नाही तोच, काय हरकत नाही लॉकडाऊन तर वाढणारच होता असे सांगत , अनेकांनी आता एकदा हे सेटल होऊ दे मग आपण 3 मे नंतर भेटूचं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.


लॉकडाऊन का वाढविला याची चर्चा येथे होणे गरजेचे आहे. केंद्रातील आणि राज्यातील सरकारला लॉकडाऊन वाढविण्यास काही आनंद होत नाही, उलट कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर त्यांनी पाणी सोडलंय. फक्त देशातील नागरिक सुरक्षित राहावे त्यांना कुठल्याही पद्धतीचा आरोग्याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी ही टाळेबंदी वाढवली. कोरोनाबाधितांचा राज्यातील आकडा वाढत चाललंय, खबरदारी म्हणून प्रशासन विविध पावले उचलत आहेत, उपाय योजना राबवित आहे. आरोग्य यंत्रणा त्यांचं काम करीत आहे. लॉकडाऊन वाढवला आहे कारण रुग्ण संख्या म्हणावी तशी आटोक्यात आलेली नाही, सध्या जे घरी आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीचा या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये. केवळ नागरिकांचं हीत लक्षात घेऊन असे निर्णय शासन घेत असतं.


विशेष करून तरुणांनी, 'मी घरी बसणार आणि कोरोनाला हरवणार' हे फक्त व्हॉट्सअॅपला स्टेटस ठेवून चालत नाही तर अमलात आणायची गरज आहे. लॉकडाऊन वाढवला म्हणून नाक मुरडत बसण्यापेक्षा मिळालेला वेळ सदुपयोगी कसा लागेल याचा विचार करण्याची गरज आहे. मागच्या काळात अल्पावधीत काही तरुणांमध्ये समाजसेवेची आवड निर्माण झाली होती, काही खरोखर काम करतात त्याबद्दल वाद नाही. परंतु काही जण 'फोटो-सेवा' मध्येच गुरफटले गेले आहे. आज अनेक गरीब गरजू व्यक्ती आहेत त्यांना एक वेळची खाण्याची भ्रांत आहे, परिस्थिती आणखी गंभीर होत आहे. या तळागाळातील घटकांचा विचार होणे गरजेचे आहे. कोरोनाचा विळखा वाढत चाललेला असताना प्रत्येकाने खबरदारी म्हणून काळजी घेऊन घरीच बसले पाहिजे, हे वाक्य वाचून किंवा ऐकून नागरिक कंटाळले आहेत


मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे, या शहरातील जटील प्रश्न म्हणजे दाटीवाटीतील वस्त्यांमध्ये जाऊन रुग्ण शोधणं, जीवाची बाजी लावून डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय हे जोखमीचं काम करत आहेत. आपली आरोग्य यंत्रणा रुग्ण रुग्णालयात येण्याची वाट पाहत नाही तर डॉक्टर रुग्णाच्या दारी जाऊन रुग्ण शोधण्याचं काम करीत आहे. आपल्याकडे आता लवकर रॅपिड टेस्टिंग अमलात आणणार आहे, यामुळे येणाऱ्या काही काळात रुग्ण संख्येत वाढ झाली तरी हरकत नाही परंतु एकही रुग्ण उपचारविना राहता कामा नये ही दक्षता प्रशासनाने घेतली पाहिजे.


त्यामुळे नागरिकांनी लॉकडाऊनचा आणि 3 मे नंतर कसं भेटता येईल याचा विचार न करता, आरोग्य कसं सांभाळता येईल यावर अधिक विचार केला पाहिजे.


संतोष आंधळे यांचे आणखी काही ब्लॉग


BLOG | फिनिक्सच्या पक्षासारखी मुंबई झेप घेणार

BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना


BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क