भारतात, महाराष्ट्राची रुग्ण संख्या जास्त असून त्यात मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रातील रुग्णांची संख्या सर्वात जास्त म्हणजे राज्याच्या आकडेवारीच्या तुलनेत निम्म्यापेक्षा जास्त कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या एकट्या मुंबईमध्ये आहे. या शहरात लोकसंख्याच्या प्रमाणानुसार टेस्टिंगचं प्रमाण वाढलं आहे. रुग्ण शोधून काढले जात आहे. मुंबईतील काही भाग प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सील केले आहे. संशयित रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर तात्काळ उपचार केले जात आहे. काही रुग्ण उपचार घेऊन यशस्वीपणे आपल्या घरी जात आहे. आधुनिक वैद्यकशास्त्राचं हेच खरं यश आहे की, रुग्ण शोधून काढणे, त्या रुग्णांना उपचार मिळणे आणि ते उपचार सध्या शहरातील विविध रुग्णालयामध्ये मिळत आहे. खासगी टेस्टिंग लॅबमध्ये लोकं स्वतःहून जाऊन चाचणी करून घेत आहेत. तर वेळ प्रसंगी त्यावर उपचारही घेत आहेत. हा आकडा वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे परदेशातून जेव्हा अनेक जण मायदेशी परतले, त्यामध्ये बऱ्यापैकी नागरिक हे मुंबईचेच आहेत. सुरुवातीच्या काळात जे कोरोनाबाधित रुग्ण सापडले ते बहुतांश हे परदेशातून आलेलेच आहेत.
साथ रोगशास्त्राच्या अभ्यासानुसार रुग्णांमध्ये एकदा विश्वास निर्माण झाला की ते या आजारातून सहजपणे उपचार घेऊन बाहेर पडू शकतात. त्यानंतर, मग ते बिनधास्तपणे उपचार घेण्याकरीता बाहेर पडतात, तोच विश्वास या शहरातील आरोग्य यंत्रणेने लोकांमध्ये आता निर्माण केला आहे. त्यामुळे, एका वेळी रुग्णांचा आकडा वाढला तर चालेल परंतु कोरोनाबाधित सर्व रुग्णांना पूर्ण उपचार देणे ही सध्याच्या घडीची गरज आहे . त्यामुळे बाकीचे नागरिक पुढे जाऊन आश्वस्तपणे निरोगी आयुष्य जगू शकतात. कुणालाही घाबरून जगण्याची गरज नाही. अन्यथा, पुढचे सहा महीने लोकं एकमेकाला संशयाने पाहतच घालवतील.
खरं तर ही वेळ 'आवसान' गळून पडण्याची नाही तर खंबीर पणे उभं राहून लढण्याची आहे, जे योद्धे रणभूमीवर लढतायत त्यांचं मनोबल वाढविण्याची आहे. ज्या वेगात कोरोनाबाधित रुग्णांचे आकडे वाढत आहेत, त्यामुळे चिंता वाटत असली तरी त्याकरीता आवश्यक असणारी यंत्रसामुग्री पुरविण्याचं काम प्रशासन आरोग्य यंत्रणेस करीत आहेत, मात्र आता अजून आक्रमक होण्याची गरज आहे. सध्याच्या घडीला महाराष्टात 748 रुग्ण कोरोनाबाधित असून, त्यापैकी 458 रुग्ण एकट्या मुंबईमध्ये आहे. तर त्या खालोखाल पुण्याचा क्रमांक लागत असून तेथील रुग्ण संख्या 100 वर पोहचली आहे. आपली आरोग्य व्यवस्था या परिस्थितीचा वेळेच्या वेळी आढावा घेत असून आवश्यक ते बदल त्यांच्या सेवेत करीत आहे. खासगी डॉक्टरांनी आपली सेवा देण्याची तयारी दाखवली असून, तशी यादीही प्रशासनाकडे सुपूर्द केली आहे. काही वरिष्ठ डॉक्टर, निवासी डॉक्टरांना पर्सनल प्रोटेक्टिव्ह एक्विपमेन्ट (पी पी इ ) आणि आधुनिक दर्जाचे मास्क मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न करत असून काही अंशी ते यामध्ये यशस्वी ठरले आहेत.
देशाची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या या मुबंई शहरात देशभरातून लोक रोजी-रोटी करता येत असतात. त्याचप्रमाणे मिळेल त्या व्यवस्थेत ते राहत असतात कारण जगाच्या पाठीवर हे एकच आहे. शहर आहे की ते कुणाला उपाशी झोपू देत नाही. या शहराने कोरोनाचं गंभीर रूप बघितलं असून त्यावर योग्य तोडगा काढत पुढे जाण्याची जिद्द कायम ठेवली आहे. संपूर्ण विश्वात हे शहर 'मुंबई स्पिरीट' करता प्रसिद्ध आहे. काहीही झालं तरी धावत राहायचं हा मुंबईचा ठायी स्वभाव असून आजपर्यंत त्याला कोणी रोखू शकलेले नाही. मात्र, यावेळेचं संकट हे इतर संकटांपेक्षा वेगळं असून त्यावरही मात करण्यासाठी हे शहर सज्ज झाले आहे. ज्या पद्धतीने या शहराने या संकटाचा मुकाबला केला आहे, या आशयाची बातमी जगभर गाजेल आणि सगळ्यासाठी या कामात आदर्श ठरलेल्या मुंबई मॉडेलची चर्चा भूतलावर झाल्याशिवाय राहणार नाही.
संतोष आंधळे यांचे आणखी काही ब्लॉग
BLOG | कोरोना वातावरणातले तुम्ही सारे खवय्ये
BLOG | सारे जमीन पर ...
BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!