>> संतोष आंधळे


कोरोना काळात सर्वात महत्वाचा आणि मुख्य प्रश्न म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर रुग्णालयात बेड मिळवण्याकरिता होणारी अनाठायी धावपळ. शेवटी एकदाच मनावर घेऊन मुंबई शहरातील प्रशासनाने नागरिकांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करण्याचा आणखी एक चांगला प्रयत्न केला असे म्हणण्यास हरकत नाही. गेले अनेक दिवस सगळ्याच स्तरातून बेड न मिळण्याच्या तक्रारीनी उच्चांक गाठला होता. अनेक जण खासगी आणि सरकारी रुग्णालयातील बेड संदर्भातील माहिती ऑनलाईन करा म्हणून ओरडत होते. गेले अडीच-तीन महिने कोरोनाच्या धुमाकुळामुळे अनेक जण मृत्युमुखी पडले, तर अनेक जणांना या आजाराची बाधा झाल्याने रुग्णालयाची वारी करावी लागली आहे. या बेड वाटपाचं विकेंद्रीकरण व्यवस्थापन आणि विभागीय नियंत्रण कक्ष स्थापन करून नागरिकांना चांगलाच दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. पण यापुढे रुग्णांना बेड मिळण्यास अडचण होणार नाही याची दक्षता आता महापालिकेने घेतली पाहिजे. शासन अनेक चांगले जनहिताचे निर्णय घेत असते. मात्र त्याची योग्यपद्धतीने अंमलबजावणी व्यवस्थित झाली पाहिजे, अन्यथा मोठ्या जनक्रोशाला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या लोकांची अवस्था, "कोरोनासे डर नही लगता है, पर बेड नही मिलने से लगता है' अशी झाली आहे.


रुग्णांच्या नातेवाईकांची बेड मिळवण्यासाठी होणारी वणवण थांबवण्याकरिता राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिकेने खासगी रुग्णालयांतील 80 टक्के बेड ताब्यात घेतले आहेत. यामुळे रुग्णांची होणारी परवड थांबेल अशी आशा आहे. मात्र काही दिवसापूर्वीच राजेश टोपे, आरोग्यमंत्री यांनी मुंबईतील काही खाजगी रुग्णालयांना गेल्या आठवड्यात रात्री अचानकपणे भेटी दिल्या. तर त्यांना कोरोना उपचारासाठी सर्व सामान्य रुग्णांसाठी केलेल्या नियमांचे पालन न केल्याचे दिसून आल्याने चारही रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांना या रुग्णालयांमध्ये बेडच्या उपलब्धतेबाबत आणि दिलेल्या बेडबाबत माहिती दर्शवणारे फलक नव्हते. शासनाने उपाचारासाठी जे दर निश्चित केले आहेत, ते दरपत्रक लावण्यात आलेले नव्हते. क्षमतेच्या 50 टक्केही खाटांचा वापर न करताही अनेक रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत आहे, अशी विविध बाबी या भेटी दरम्यान निदर्शनास आल्या. राज्य शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिला.


जून 4 ला, खासगी रुग्णालयाच 'हे' वागणं बरं नव्ह ! या शीर्षकाखाली येथेच जो लेख लिहिण्यात आला होता, त्यात शहरातील खासगी रुग्णालये शासनाच्या आदेशच पालन करत नसल्याबाबत विस्तृत लिहिले होते.


सध्या सर्व सामान्य नागरिक कोरोनाबाधित आहे, हे कळल्यानंतर पहिला मदतीकरिता फोन करतात तो 1996 या क्रमांकावर, येथे रुग्णवाहिका, रुग्णालयातील बेड्स मिळवण्यापासून ते आता आमच्या कुटुंबात किंवा कॉलनीमध्ये रुग्ण मिळाला आहे. तर आम्ही काय करू या आणि अशा विविध प्रश्न विचारण्याकरिता नागरिक सातत्याने या क्रमांकावर फोन करत असतात. त्यामुळे साहजिकच या व्यस्थेवर ताण निर्माण होत होता. अनेक वेळा लोकांना समाधानकारक उत्तर मिळत नव्हते. मात्र प्रशासनाने बेड वाटपाबाबत पालिकेच्या 24 वार्ड निहाय स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे. याकरिता स्वतंत्र दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहे. त्यांनी वृत्तपत्रात याबाबत दिलेल्या जाहिरातीनुसार 10 जूनपासून ही सेवा उपलब्ध करून असल्याचे सूचित केले आहे. यामुळे खरोखरच या सेवेचा फायदा नागरिकांना किती होतोय हे येणाऱ्या काळातच कळू शकेल. वॉर्ड वॉर रुम कार्यान्वित केल्यानंतर त्यांचे संपर्क क्रमांक प्रसारमाध्यमे, सामाजिक माध्यमे व इतर संपर्काच्या माध्यमांतून मुंबईकरांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत.


तसेच, ज्या व्यक्तींना मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत किंवा ज्यांच्यात लक्षणे नाहीत, अशा (लक्षणविरहित) बाधितांना त्‍यांचा चाचणी अहवाल आल्यानंतर काही कालावधीनंतर देखील विभागीय स्तरावरुन काही दिवस दूरध्वनीवरुन पाठपुरावा केला जाईल. नियंत्रण कक्षांमधून तांत्रिक ज्ञान असलेल्या व्यक्तींऐवजी स्वत: वैद्यकीय अधिकारी रुग्णांशी थेट संवाद साधून सल्लामसलत करणार असल्याने रुग्णांची नेमकी स्थिती समजून घेणे. गरजेनुसार त्यांना खाटा व औषधोपचार आदी पुरवणे यामध्ये महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार आहे. यातून मुख्य आरोग्य सेवेचा वेळ वाचेल. विभाग कार्यालयांना कोरोना रुग्णसेवेसाठी दिलेल्या रुग्णवाहिकांच्या सेवेचे व्यवस्थापनही आता विभागीय कक्षाद्वारे होणार असल्याने रुग्णवाहिकांचा प्रतिसाद कालावधी वाढेल व आपसूकच रुग्णवाहिका सेवेची प्रभावी अंमलबजावणी होईल. यापुढे लक्षणे नसलेल्या अतिजोखीम गटामधील संशयित व्यक्तींची डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय थेट खासगी किंवा महापालिकेच्या प्रयोगशाळांमध्ये चाचणी केली जाईल.


महानगरपालिकेच्या सर्व विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या विभाग कार्यालय स्तरावर हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावयाचा आहे. विभाग स्तरावरील हा नियंत्रण कक्ष ‘वॉर्ड वॉर रूम’ म्हणून ओळखला जाणार असून त्या माध्यमातून कोरोनाबाधित रुग्णांसाठी खाटांचे व्यवस्थापन केले जाणार आहे. प्रत्येक ‘वॉर्ड वॉर रूम’ मध्ये दिल्या जाणाऱ्या दूरध्वनी क्रमांकाच्या 30 वाहिन्या असतील. 24x7 तत्वांवर तीन सत्रांमध्ये अखंडपणे कार्यरत राहणाऱ्या या कक्षामध्ये वैद्यकीय अधिकारी, आवश्यक इतर कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येत आहे.


दररोज कोरोनाबाधित रुग्णांची यादी प्राप्त झाल्यानंतर ‘वॉर्ड वॉर रूम’मधील डॉक्टर या रुग्णांशी संपर्क साधून, त्यांना असलेल्या बाधेचे स्वरुप समजावून घेऊन रुग्णास कोविड आरोग्य केंद्र किंवा रुग्णालयामध्ये योग्य व आवश्यक खाट मिळवून देण्याची जबाबदारी पार पाडतील. त्या ठिकाणी रुग्णाला नेण्याबाबतच्या कार्यवाहीमध्ये समन्वय साधला जाईल. तीव्र स्वरूपाची बाधा असल्यास रुग्णांच्या घरी आवश्यक वैद्यकीय साधनांसह जाऊन त्याची तपासणी करणे. त्याआधारे तातडीने खाट उपलब्ध करून देणे, सामुदायिक आरोग्य स्वयंसेवक यांच्या मदतीने या कामामध्ये समन्वय साधणे, रुग्णवाहिकेतून संबंधित रुग्णालयांमध्ये बाधित व्यक्तीला पोचवणे, ही सर्व कार्यवाही ‘वॉर्ड वॉर रूम’ स्तरावर केली जाणार आहे. उपलब्ध सर्व खाटांची माहिती ऑनलाईन प्रणालीवर ‘वॉर्ड वॉर रूम’द्वारे अद्ययावत केली जाणार आहे.


बेड न मिळण्याच्या तक्रारींचं गांभीर्य ओळखून शासनाने याची दखल घेऊन, खासगी रुग्णालयातील त्या 80 टक्के बेड वाटपाच्या व्यवस्थापनसाठी पाच सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. नागरिकांना जर खासगी रुग्णलयांत बेड मिळत नसेल तर नागरिकांनी या अधिकाऱ्यांना ई-मेलद्वारे कळवावे, असे सांगण्यात आले आहे.


मदन नागरगोजे यांच्याकडे बॉम्बे हॉस्पिटल, सैफी रुग्णालय, जसलोक रुग्णालय, ब्रीच कँडी रुग्णालय, एच. एन. रिलायन्स रुग्णालय, भाटिया रुग्णालय, काॅनवेस्ट व मंजुळा एस बदानी जैन इस्पितळ आणि एस.आर.सी.सी. हॉस्पिटल या रुग्णालयांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या रुग्णालयांच्या अनुषंगाने काही तक्रार किंवा सूचना करावयाची असल्यास


ईमेल : covid19nodal1@mcgm.gov.in


अजित पाटील यांच्याकडे मसिना रुग्णालय, वोक्हार्ट हॉस्पिटल, प्रिन्स अली खान रुग्णालय, ग्लोबल रुग्णालय, के जे सोमय्या रुग्णालय, गुरू नानक इस्पितळ आणि पी डी हिंदुजा हॉस्पिटल यांचे दायित्व सोपवण्यात आले आहे.


ईमेल : covid19nodal2@mcgm.gov.in


राधाकृष्णन यांच्याकडे एस एल रहेजा रुग्णालय, लीलावती इस्पितळ, होली फॅमिली रुग्णालय, सेव्हन हिल्स हॉस्पिटल (रिलायन्स), बी.एस.इ.एस. रुग्णालय, सुश्रुषा रुग्णालय आणि होली स्पिरिट हॉस्पिटल या रुग्णालयांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


ई-मेल : covid19nodal5@mcgm.gov.in


सुशील खोडवेकर यांच्याकडे कोहिनूर रूग्णालय, हिन्दू सभा रुग्णालय, एसआरव्ही चेंबूर रुग्णालय, गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, एल एच हिरानंदानी इस्पितळ, सुराणा सेठिया रुग्णालय आणि फोर्टीस रुग्णालय या रुग्णालयांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


ई-मेल : covid19nodal4@mcgm.gov.in


प्रशांत नारनवरे यांच्याकडे करूणा रूग्णालय, कोकिळाबेन रुग्णालय, संजीवनी रुग्णालय, नाणावटी रुग्णालय, अपेक्स रुग्णालय आणि अपेक्स सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल या रुग्णालयांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


ईमेल - covid19nodal3@mcgm.gov.in


शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे, त्यातच पावसाळी आज़ार होणाऱ्या रुग्णांची अशा परिस्थितीत भर पडू शकते. त्यामुळे नागरिकांनी आता आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. महापालिकेने काही काळाने का होईना नागरिकांना बेड मिळावे याकरिता ही व्यवस्था निर्माण केली आहे. त्यामुळे आता तरी बेड मिळतील का? हा प्रश्न विचारण्याची नागरिकांवर वेळ येऊ नये असा आशावाद बाळगण्यास हरकत नाही.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग