सध्या आपल्या भारत देशात नव्हे तर संपूर्ण जगात कोविड -19 म्हणजेच कोरोना सारख्या महाभयंकर आजारावर उपचार करण्यासाठी नवनवीन पद्धत शोधली जात आहे. सध्या देशाच्या काही भागात कॉन्वालेसंट प्लाझमा थेरपी या पद्धतीचा अवलंब केला गेला असून तो लवकरच महाराष्ट्रातील मुंबईमध्ये सुरू करण्यात येणार आहे. कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णाचा रक्तद्रव घेऊन तो कोरोनाबाधित गंभीर रुग्णाच्या शरीरात ज्याप्रमाणे रक्त चढवलं जातं त्याप्रमाणे दिला जातो. मात्र ह्या प्रक्रियेत रक्तगट जुळणे गरजेचं असून सध्या ही थेरपी ही 'क्लिनिकल ट्रायल' अवस्थेत असून यालाच कॉन्वालेसंट प्लाझ्मा थेरपी असं म्हटलं जात आहे. ही पद्धती अधिक विकसित होण्यासाठी काही काळ लागणार असून दिल्लीमधील काही रुग्णांनी या थेरपीला प्रतिसाद दिल्याचं वृत्त असून आणखी किती रुग्णांना याचा फायदा होतो ते येणाऱ्या काळात ठरणार असून ही थेरपी वरदान ठरेल काय? यावर शिक्कामोर्तब होण्यासाठी नक्कीच काही काळ थांबावे लागेल.


काही दिवसापूर्वी भारतीय वैद्यक संशोधन परिषदने प्लाझ्मा थेरपी पद्धतीची क्लिनिकल ट्रायल करण्यास परवानगी दिली होती. यामध्ये देशातील बऱ्याच रुग्णालयांनी क्लिनिकला ट्रायलमध्ये सहभाग होण्यासाठी उत्सुकता दाखवली होती. यामध्ये केरळ, दिल्ली, पंजाब आणि महाराष्ट्र राज्याने सहभाग नोंदविला आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते यापूर्वी काही आजारामध्ये या थेरपीचा वापर करण्यात आला आहे. मात्र कोरोना या आजारांमध्ये या थेरपीचा किती उपयोग होतो, हा येणारा काळच ठरवेल. 16 एप्रिल रोजी भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने या उपचार पद्धतीच्या चाचण्यांना परवानगी दिली आहे. तशी पहिली चाचणीची परवानगी केरळमधील श्रीचित्रा तिरुनाल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस अ‍ॅड टेक्नॉलॉजी या संस्थेने मागितली होती.


या रक्तद्रव उपचार पद्धती नेमकं काय होत?


या पद्धतीत कोरोना आजारापासून मुक्त झालेल्या व्यक्तीतील रक्तद्रव काढून तो कोरोनाबाधित रुग्णांसाठी वापरला जाईल ज्यांना श्वास घेण्यासाठी (ऑक्सिजन मशीन ) यंत्रांची गरज असून ते गंभीर स्वरूपाचे असे रुग्ण आहेत. त्या रुग्णांना हा प्लाझमा त्यांच्या शरीरात सोडण्यात येईल, त्यामुळे कोरोना मुक्त व्यक्तीच्या रक्तात विषाणू विरोधात निर्माण झालेल्या अँटीबॉडीस् ज्या रुग्णामध्ये प्लाझ्मा दिला आहे त्या रुग्णास मिळतात. त्यामुळे त्याची प्रतिकारशक्ती व्यवस्था (इम्यून सिस्टिम) ही या विषाणूंशी जोरदार लढा देते. यामुळे रुग्णाची रोग प्रतिकारकशक्ती वाढते आणि रुग्ण उपचाराला लवकर साथ देऊन बरा होण्यास मदत होते.


याप्रकरणी, वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयाचे संचालक, डॉ रमेश भारमल सांगतात की, "काही कोरोना पासून बरे झालेले रुग्ण स्वतः हून याकरिता पुढाकार घेत असून आतापर्यंत तीन जणांनी प्लाझ्मा दिलेला आहे. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेकडून आज किंवा उद्या एक परवानगी मिळणे अपेक्षित असून ती मिळाल्यानंतर ही थेरपी आपल्याकडील रुग्णांना देण्यास सुरुवात करण्यात येईल. याकरिता आमच्या महापालिकेचे आयुक्त स्वतः भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या प्रमुखांशी बोलत आहेत. आतापर्यंत या थेरपीचे काही चांगले परिणाम इतर ठिकाणी दिसून आले आहेत.


नुकतेच दिल्लीचे मुखमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, या क्लीनिकल ट्रायल मधील काही रुगणांनी या थेरपी ला चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसत आहे.


तसेच, जगजीवनराम रेल्वे रुग्णालयाच्या, विकृतीशास्त्र विभागाचे प्रमुख, डॉ. योगानंद पाटील, सांगतात की, "रक्तदान ज्या पद्धतीने केले जाते त्याचा पद्धतीने हा प्लाझ्मा कोरोनापासून बरे झालेल्या व्यक्तीमधून काढला जातो. याकरिता साधारण 45 मिनिटे ते 1 तासाचा अवधी लागतो. 300 एम एल पर्यंत ह्या व्यक्तीमधून मिळतो . त्यानंतर त्याचा वापर जो डॉक्टर रुग्णांवर उपचार करीत आहे तो ज्या पद्धतीने रक्त चढविले जातो त्याप्रमाणे करतो. कोरोना रुग्णामधील याचे परिणाम आत्ताच सांगत येत नाही कशा पद्धतीने फायदा होईल, मात्र ज्या पद्धतीने इतर राज्यात याचा वापर केल्याने काही रुग्णांना फायदा झाल्याचं दिसत आहे ते आशादायक चित्र आहे . आतापर्यंत प्लाझ्मा थेरपीचा वापर जे रुग्ण भाजल्यानंतर गंभीर होतात, काही घटनांमध्ये महिला बाळंतीण झाल्यानंतर मोठा रक्तस्त्राव होतो अशा वेळी या थेरपीचा उपयोग केला गेला असून त्याचे निकाल समाधान कारक आहे".


सध्या ह्या थेरपीचा या आजरात क्लिनिकल ट्रायल म्हणून उपयोग करण्यात येणार आहे. सरसकट याचा वापर इतर रुग्णांवर करत येणार नाही. या थेरपीमुळे किती रुग्णांना बरे वाटते याचा डेटा आज जरी नसला तरी पाश्चिमात्य देशात या थेरपीचा फायदा झाल्याच्या काही घटना आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या रुग्णांमध्ये ह्या थेरपीचे सध्या प्रयोगच चालू आहेत.


सध्या या कोरोनामुळे देशभर गाजत असलेलं कस्तुरबा रुग्णालयातील साथरोग तज्ज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव सांगतात की, "आज किंवा उद्या आम्हाला आणखी एक परवनगी मिळणे आवश्याक आहे ती मिळेल त्या संदर्भातील पत्रव्यवहार झाला आहे. आम्ही लवकर ही थेरपी सुरु करू, त्यानंतर रुग्ण कसा प्रतिसाद देत आहे हे ठरेल".


तर, कराड येथील विकृतीशास्त्र तज्ज्ञ डॉ संदीप यादव, असे सांगतात की, "सध्याचा जो कोविड-19, हा कोरोना आजार संपूर्ण जगासाठी सध्या नवीन असून आपल्याकडे जे पर्याय आहे त्यांचा आपण वापर केला पाहिजे. कुणीही आज छाती ठोकपणे सांगू शकत नाही की याचा सर्व कोरोनबाधित रुग्णांना फायदा होईल किंवा नाही. मात्र कोरोना वगळता काही आजारात यापूर्वी प्लाझ्मा थेरपीचा वापर केला गेला आहे, आणि त्यात बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे. हा प्लाझमा उणे 20-30 डिग्री मध्ये ठेवून 6-8 महिन्यांपर्यंत ठेवता येतो.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग