इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत निर्णायक लढतीमध्ये मॅंचेस्टरच्या मैदानात भारत आधी तीन बाद 38 आणि नंतर चार बाद 72. रोहित, विराट, धवन पॅव्हेलियनमध्ये. मैदानावर पंत आणि हार्दिक पंड्या. रवींद्र जडेजासह गोलंदाजांची फळी बाकी. लक्ष्य जरी 260 चं माफक होतं, तरी समोर यजमान इंग्लिश टीम, त्यातही दोन डावखुरे गोलंदाज. अशा परिस्थितीत ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्याने शतकी भागीदारी साकारत भारताला मिळवून दिलेला विजय हा यंग इंडियाचा यादगार विजय आहे, असंच म्हणावं लागेल.
खास करुन हार्दिक पंड्याचा प्रतिहल्ला आणि पंतने गियर बदलताना दाखवलेली परिपक्वता प्रचंड सुखावणारी होती.
हा अप्रोच कमाल होता. खास करुन पंतचा. म्हणजे पाहा ना, पंतच्या पहिल्या 50 धावा 71 चेंडूंमध्ये, ज्यात केवळ चार चौकार. तर सामना संपताना पंत 113 चेंडूंमध्ये नाबाद 125 धावा. ज्यात 16 चौकार आणि 2 षटकार. पंतनं अर्धशतक करायला 71 चेंडू घेतले. म्हणजे पुढच्या 42 चेंडूंमध्ये 75 धावा. याला म्हणतात गियर बदलणं. जे सचिन, कोहली आणि नंतरच्या काळात रोहित शर्माही करत आलाय.
ऑस्ट्रेलियन भूमीवर पंतने अशीच अविस्मरणीय खेळी खेळत भारताला यादगार विजय मिळवून दिला होता, त्या आठवणींचं मोरपीस मनावरुन पुन्हा फिरलं. तेव्हा त्याच्यासोबत वॉशिंग्टन सुंदर होता आणि आता पंड्या.
अखेरच्या चेंडूपर्यंत नाबाद राहत सामना जिंकून देणं ही महान खेळाडू होण्याची खूण असते. करिअरच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये पंतने या पायऱ्या चढायला सुरुवात केलीय.
आजही लक्ष्य माफक असताना पंत-पंड्या जोडी मैदानात होती, तेव्हा दोन्ही बाजूंनी हल्ला होण्याची गरज नव्हती. म्हणजे जितक्या तीव्रतेचा आजार तितकंच औषध घ्यावं, नाहीतर ओव्हरडोस होतो. ही बाब पंतने नेमकी लक्षात ठेवली आणि आधी पंड्याला चौफेर उधळू दिलं आणि जेव्हा पंड्या बाद झाला तेव्हा पंतने ती सूत्र आपल्याकडे घेत सामना खिशात घातला. ही जोडी डावखुरी-उजवी असल्याचाही फायदा या जोडीला झाला. खास करुन पंतने विलीला मारलेले पाच सलग चौकार ‘हू इज द बॉस’ हे ठसवून सांगणारे होते. क्रिकेटच्या दोन वेगळ्या फॉरमॅटमध्ये तो दोन अफलातून खेळी खेळलाय. त्यात वनडेतलं पहिलं शतकही त्याने या मँचेस्टरच्या सामन्यात आपल्या नावावर केलं.
हा यंग इंडियाचा विजय मी अशासाठी म्हणतोय की, रोहित, विराट, धवन बाद झाले असताना निर्णायक सामन्यात नाव हेलकावे खाणार असं वाटत असताना दोन तुलनेने तरुण आणि काहीशा कमी अनुभव असलेल्या नावाड्यांनी नौका तीरावर नेली.
मालिकेचा फैसला ज्या सामन्यात लागणार आहे, त्या मॅचमध्ये अशी खेळी खेळणं हे त्या खेळाडूचा दृष्टिकोन आणि त्याची मानसिकता किती जबरदस्त आहे, याचंच सूचक असतं. त्यातही मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कसोटी आणि वनडे अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये पंतने विजयी पताका फडकवली.
पंतचं कौतुक करतानाच हार्दिक पंड्याबद्दलही लिहावं लागेल. आयपीएल विजेतेपदापासून पंड्यामध्ये झालेला बदल आपण पाहतोय. आयपीएल कर्णधारपदाची जबाबदारी त्याच्यावर आली, जी त्याने पेलली आणि संघाला विजेतेपद पटकावून दिलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर काहीसं डळमळीत झालेलं स्थान त्याने आता तरी भक्कम केलेलं दिसतंय.
या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करताना पंड्याने संघाला विजयपथावर नेलं. त्यातही अखेरच्या सामन्यात पंतशिवाय भारतीय संघात चारच निव्वळ फलंदाज होते, पंत हा विकेटकीपर बॅट्समन, पंड्या, जडेजा हे ऑलराऊंडर तर त्यांच्या जोडीला शमी चहल, कृष्णा आणि सिराज असे चार स्पेशालिस्ट गोलंदाज भारताने खेळवले होते. ही अत्यंत धाडसी चाल होती. पंड्याच्या अष्टपैलू कामगिरीने ती योग्य ठरवली. या संघनिवडीमागे युवा खेळाडूंवर असलेला संघ व्यवस्थापनाचा प्रचंड आत्मविश्वास दिसतो. त्यात जडेजासारखा खेळाडू हा बॅटिंग,ब़ॉलिंग आणि फिल्डिंगमध्येही तुम्हाला उपयुक्त ठरत असतो. त्याचे दोन्ही कॅचेसही आठवा. टू सेव्ह मनी इज टू अर्न मनी. याप्रमाणेच वाचवलेली प्रत्येक धाव ही त्याने केल्यासारखीच असते. वनडे आणि टी-ट्वेन्टी वर्ल्डकपकडे जाताना यंग इंडियाला खास करुन पंत आणि पंड्यासारख्या गुणवत्तावान खेळाडूंना आपल्यात काय दडलंय हे नेमकं उमगलंय हे त्यांच्या या परफॉर्मन्सवरुन कळतंय. हेच सातत्य त्यांनी कायम ठेवल्यास व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये भारताची मक्तेदारी पुढचे अनेक वर्ष कायम राहू शकते. तूर्तास यंग इंडिया शायनिंग होत असतानाचा हा आनंद साजरा करुया, त्याच वेळी कोहली, रोहित आणि धवनसारखे अनुभवी शिलेदार कामगिरीत सातत्य आणतील अशी अपेक्षाही बाळगूया.
अश्विन बापट यांचे अन्य काही महत्वाचे ब्लॉग