नुकतीच एबीपी माझाची 14वी वर्षपूर्ती झाली, तितकीच वर्षे चॅनलमध्ये मलाही झाली. या निमित्ताने मागच्या वर्षांचा विचार करत असतानाच मन फ्लॅशबॅकमध्ये गेलं, त्यावेळी दै. नवशक्तिमधील सात आणि ‘माझा’मधील सुरुवातीची साधारण दोन-सव्वा दोन वर्ष अशा नऊ वर्षांचा क्रीडा पत्रकारितेतील काळ सरकन पुढे आला.


नवशक्तित पत्रकारितेतील अ ब क ड शिकत असतानाच माझा कल ओळखून तत्कालीन संपादक प्रकाश कुलकर्णी सरांनी मला क्रीडा पानाची जबाबदारी सोपवली होती. ज्येष्ठ सहकारी होते सुनील लवाटे. ज्यांचं बोट धरून खरं तर खेळांच्या बातम्या लिहिण्याची मुळाक्षरं गिरवली. मग हळूहळू क्रीडा पानाचा ले-आऊट आणि अन्य गोष्टी शिकत गेलो. त्याच वेळी लवाटेजींनी फिल्डवर उतरून रिपोर्टिंग करण्याचा आग्रह धरला. हळूहळू प्रेस कॉन्फरन्सेस, इव्हेंट्सना जाऊ लागलो.


तिथे गाठ पडली एका भल्या मोठ्या जगाशी आणि अनेक दिग्गजांशी. व्ही.व्ही. करमरकर, चंद्रशेखर संत, द्वारकानाथ संझगिरी, विनायक दळवी, सुनंदन लेले अशा अनेक दिग्गजांची नावं आम्ही पेपरमध्ये एखाद्या लेखाखाली किंवा बातमीच्या बायलाईनमध्ये, म्हणून वाचत होतो, ती मंडळी प्रत्यक्ष भेटू लागली, मोकळेपणाने बोलू लागली. क्रीडा पत्रकारितेतल्या या शिखरांना पाहून अचंबित व्हायचो.


माझ्या करिअरच्या पायथाच होता तो, वातावरण काही वेगळंच होतं, एकदम घरगुती. करमरकर सरांचा क्रिकेटसोबतच अन्य स्थानिक खेळांचा असलेला सखोल अभ्यास, त्यांचं भन्नाट नेटवर्क पाहून थक्क व्हायचो.


प्रल्हाद नाखवा, सुभाष हरचेकर, मुकुंद कर्णिक, अनिल जोशी, सुहास जोशी, शरद कद्रेकर, संजय परब आदी सर्वच मंडळी वयाने, अनुभवाने सगळ्याच बाबतीत खूप सीनियर. तरीही क्रिकेट स्टेडियममध्ये (अर्थातच कोरोना काळापूर्वीचं) जसे चाहते खच्चून भरलेले असतात, तसा या मंडळींमध्ये आपलेपणा खच्चून भरलेला. मुकुंद कर्णिकांसारखा प्रेमाने कान उपटणारा हक्काचा माणूस आज आमच्यासोबत नाही. ज्यांचा फिल्ड रिपोर्टिंगचा आग्रह किती महत्त्वाचा होता, हे नंतर कळलं.


तसंच सदा हसतमुख चंद्रशेखर संत सरांनाही आज मिस करतो. संत सरांसोबत एका मॅरेथॉनची लाईव्ह कॉमेंट्री करण्याचं भाग्य लाभलं होतं. एखाद्या झऱ्यातून पाणी ज्या प्रवाहाने वाहील, त्या प्रवाही भाषेत सर कॉमेंट्री करत होते. तसंच त्यांचं रेडिओतील फुटबॉल अपडेट ऐकण्याचा योगही आला होता. हातात फक्त काही मुद्यांच्या नोंदी असलेल्या एका कागदासह सर स्टुडिओत बसले होते आणि पुढची काही मिनिटं एखादं तयार स्क्रिप्ट वाचल्याच्या फ्लोमध्ये बोलत होते. हे पाहणं म्हणजे एक सोहळा होता किंवा अविस्मरणीय अनुभव म्हणा ना.


या सगळ्याच ज्येष्ठ क्रीडा पत्रकारांनी मला काहीतरी दिलंय. देशी खेळांशी नाळ जुळलेले हरचेकर, सुहास जोशी, प्रल्हाद नाखवा यांच्यासाठी बहुदा वय हा फक्त आकडा आहे. म्हणजे त्यांचं खेळाप्रती असलेलं प्रेम, त्यांची ऊर्जा अचंबित करणारी. क्रिकेट आणि जुन्या सिनेमांची आवड असणारे माधव दळवी. फुटबॉल, हॉकीवर आपल्या घरच्या कुटुंबातल्या सदस्यासारखं प्रेम करणारे रणजित दळवी. स्थानिक खेळांवर प्रचंड जीव असणारे दत्ता सावंत. विजय बने, शैलेश नागवेकर, संजय घारपुरे..किती नावं घेऊ. ही लिस्ट खूप मोठी आहे.


शरद कद्रेकर, मुकुंद कर्णिक, सुनील लवाटे यांच्यासोबतच्या गप्पा अनेकदा मी खूप एन्जॉय केल्यात. म्हणजे मी प्रेक्षकाच्या भूमिकेत असायचो. कर्णिक-कद्रेकरांची बॅटिंग जोरदार, मधून मधून लवाटेही सिक्स मारायचे. भन्नाट किस्से ऐकायला मिळत. त्याच वेळी कद्रेकर-कर्णिकांचं प्रेमाचं भांडण व्हायचं. कर्णिकांसारखेच रोखठोक बोलणारे संजय परब. अजूनही मला आवर्जून फोन करतात, अँकरिंगबद्दल आवर्जून प्रतिक्रिया देतात.


त्या काळात विनायक दळवींसोबत प्रेस बॉक्समध्ये मॅच बघणं ही पर्वणी असायची. म्हणजे त्या मॅचचा संदर्भ घेत खेळाडूंचे, स्टेडियमचे अफलातून किस्से ऐकायला मिळत. जवळच संझगिरी सरही असत. ज्यांच्यासोबत मी एबीपी माझावर तसंच काही जाहीर कार्यक्रमांमध्येही स्टेज शेअर केलंय. त्यांच्या लिखाणाचा मी फॅन आहे. तसाच त्यांच्या बोलण्याचाही, लेखणी आणि माईक या दोन्हींमधून सर्वांना प्रेमात पाडणाऱ्या सरांची खवय्येगिरी, भटकंतीची आवडही अमेझिंग.


आमचा एबीपी माझाचा स्पोर्टस हेड विजय साळवीही क्रीडा पत्रकारितेतील त्या काळापासून परिचित. त्याचेही खास शैलीतील लेख, बातम्या आवर्जून वाचायचो. पुढे संदीप चव्हाण, महेश विचारे, संदेश पाटील, मंगेश वरवडेकर, स्वाती अशा समवयस्कांशी चांगलं ट्यूनिंग झालं, जे आजंही कायम आहे. अमित भंडारीही सुरुवातीला स्पोर्टसलाच होता. पुढे एबीपीमध्ये तो एन्टरटेन्मेंट हेड होता तेव्हा त्याच्यासोबत काम केलं. जागतिक क्रीडा पत्रकार दिनानिमित्ताने हे सारं रिवाईन्ड झालं. वेब सीरीजच्या जमान्यातही क्रीडा पत्रकारितेतील आठवणींची ही मालिका मनाच्या रेकॉर्डमध्ये कायम राहील.