टीम इंडियाने मेलबर्नच्या मातीत कांगारुंना चौथ्याच दिवशी लोळवलं आणि मालिकेत बरोबरी साधली. अॅडलेडमधील सर्वबाद 36 च्या मानहानीनंतर भारतीय संघाबद्दल अनेक शाब्दिक तलवारी उपसल्या गेल्या, त्या आता म्यान झाल्या असतील.
इतक्या खच्चीकरण करणाऱ्या पराभवातून सावरुन पुढच्याच सामन्यात विजयी पताका फडकवणं सोपं नाही. याकरता मानसिक कणखरता महत्त्वाची. जे रहाणेने पोस्ट मॅच कमेंट्समध्ये बोलूनही दाखवलं. यासाठी टीम इंडियाची पाठ थोपटायलाच हवी. खास करुन अजिंक्य रहाणेची.
0-1 चा स्कोरबोर्ड, कोहली मायदेशी परतलेला, रोहित शर्मा, ईशांत, शमी उपलब्ध नाही. सगळीकडून कोंडी करणारी अशी स्थिती असताना रहाणेने या कोंडीतून केवळ मार्गच काढला नाही तर विजयाची गाडी सुसाट अटकेपार पोहोचवली.
सगळ्यात आधी टीम सिलेक्शनसाठी त्याचं कौतुक. संघात कोहलीसारखा फलंदाज नसताना त्याने स्पेशालिस्ट बॅट्मसनची निवड न करता बॉलिंग ऑलराऊंडर रवींद्र जडेजाला निवडलं. उमेश यादव दुखापतग्रस्त झाल्यावर याचं महत्त्व आणखी अधोरेखित झालं. या शिवाय त्याने केलेली क्षेत्ररक्षकाची व्यूहरचनाही पाहुण्यांना चक्रावून टाकणारी ठरली. म्हणजे स्क्वेअर लेगला मागे फिल्डर उभा करणे, अश्विनसाठी सातत्याने लेग स्लिप लावणे. हे सारं त्याने चपखलपणे केलं. डीआरएस कोणत्या वेळी घ्यायचं याचं अचूक भानही त्याने दाखवलं. (पेनची दुसऱ्या डावातील विकेट आठवा)
त्याने केलेले बॉलिंग चेंजेसही नेमकेपणा दाखवणारे होते. खास करुन पहिल्या दिवशी टॉस हरुनही त्याने ऑसी टीमला 195 मध्येच रोखलं. तिथेच विजयाच्या दारात पहिलं पाऊल पडलं होतं. पण, असंच पहिलं पाऊल गेल्याही कसोटीत पहिल्या डावात पडलं होतं, जेव्हा आपण आघाडी घेतली होती. त्यावेळी कमिन्स, स्टार्कच्या भन्नाट स्पेलने आपल्यासाठी विजयाचा दरवाजा लावून टाकला. यावेळी आपण ती चूक केली नाही. एकतर आघाडी 100 पार नेली. ज्यात अर्थातच बर्फाचं टेम्परामेंट घेऊन खेळणाऱ्या रहाणेचा वाटा मोलाचा होता. त्याला जडेजाने अत्यंत मोलाची साथ दिली. ती पार्टनरशिप मॅच विनिंग ठरली. रोहित शर्मा, विराट नसताना, पुजारा स्वस्तात बाद झालेला असताना, कॅप्टन्सीची अतिरिक्त जबाबदारी असताना रहाणेचं हे शतक सर्वार्थाने मोलाचं आहे. जडेजाच्या रुपात त्याला उत्तम सहकारी मिळाला. लेफ्टी-राईटी जोडीने कांगारुंच्या आक्रमणाला दाद दिली नाही. आघाडी 131 ची झाल्यावरही टीम इंडियाने मग कुठेही रिलॅक्स न होता दुसऱ्या डावातही ग्रिप सुटू दिली नाही. अपवाद ऑस्ट्रेलियाच्या सातव्या विकेटच्या भागीदारीचा. क्रिकेटमध्ये अशा एखाद-दोन भागीदारी होणारच हे जरी गृहीत धरलं तरीही शेपूट गुंडाळण्यासाठी आपल्याला अनेकदा कसरत करावी लागते, यावर कायम स्वरुपी उत्तर शोधावं लागेल.
तरीही 200 वरच ऑसी टीमला ऑल आऊट करणं ही मोठी अचिव्हमेंट होती. या स्थितीत 70 धावांचं टार्गेट आपल्यासमोर होतं. मयांक अग्रवाल याही स्थितीत एक आकडी धावसंख्येतच परतला. संघात प्रत्येक स्थानासाठी असलेली स्पर्धा, मालिकेची स्कोर लाईन बघता मयांक अग्रवाल यापुढच्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमीच दिसतेय. शुभमन गिलने इम्प्रेस केलं. त्याचं शॉट सिलेक्शन, पॉझिटिव्ह अप्रोच यामुळे ऑस्ट्रेलियन भूमीत खेळतानाही त्याच्या ऑन फिल्ड अपिअरन्समध्ये नवखेपणा नव्हता. तीच बाब मोहम्मद सिराजची. वडिलांच्या निधनाचा धक्का पचवून मैदानात उतरणं सोपं नव्हतं. सिराजने ते करताना आपली मानसिक कणखरता दाखवून दिली. शिवाय डावखुऱ्या आणि उजव्या फलंदाजांना गोलंदाजी करतानाची एडजस्टमेंट चांगली केली.
मला या सामन्यात भावलेली आणखी एक गोष्ट म्हणजे अगदी 70 धावाच करायच्या असताना, त्यातही अग्रवाल आणि पुजारा पॅव्हेलियनमध्ये परतलेला असताना गिल-रहाणे जोडीचा सकारात्मक दृष्टिकोन. त्यांनी ज्या स्ट्राईक रेटने चौकार वसूल केले. ज्याने प्रेशर बिल्ड होऊ दिलं नाही. कारण, कांगारुंची टीम अशी आहे की, तुम्ही त्यांना नुसतं बोट दिलंत की, हात धरुन तुम्हाला सामन्यातून बाहेर काढतात.
डीआरएसमधील ‘अंपायर्स कॉल’ या डिसिजनबद्दल यापुढे चांगलीच चर्चा होणार असं दिसतंय. या कसोटीत एक-दोन वेळा काही निर्णय असे पाहायला मिळाले. अर्थात तंत्रज्ञान, काळाच्या ओघात जसं आणखी प्रगत होईल, तसं यातही आणखी सफाई येईल अशी अपेक्षा करुया.
मिशन मेलबर्न फत्ते झालंय, मालिकेत बरोबरी झालीय. 2020 ला विजयाची चव चाखत बाय बाय केलंय. ही विजयाची गोडी 2021 मध्ये आणखी वाढावी हीच अपेक्षा आहे. ख्रिसमस मूडची जिंगल बेल आपण ऐकली आणि आता रोहित शर्माच्या पुनरागमनाची बेल वाजू लागलीय. ती बेल ऑस्ट्रेलियासाठी वॉर्निंग बेल ठरु दे. संघात परतून रोहित शर्माचीही बॅट अजिंक्य आणि कंपनीच्या साथीने तळपली तर इथून पुढे भारतीय संघ या मालिकेवरची पकड कायम ठेवू शकेल. आता एकच सांगणे आहे, प्रतिस्पर्ध्याला खिंडीत गाठलंय, आता ग्रिप सोडू नका.
अश्विन बापट यांचे अन्य ब्लॉग :