आज सकाळीच काही वेबसाईट्स पाहत असताना धोनीच्या टीम इंडियाच्या ऐतिहासिक विश्वविजयाला दहा वर्ष पूर्ण झाल्याची बातमी वाचली. मन पटकन आमच्या महालक्ष्मी ऑफिसमध्ये गेलं. तारीख 2 एप्रिल, 2011. तेव्हा आम्ही 'स्टार माझा'मध्ये होतो. त्या दिवशी ती नावाला न्यूजरुम होती. वातावरण म्हणायचं झालं तर मिनी वानखेडेच. आमच्या त्यावेळच्या कँटिनमध्ये भव्य पडदा. पूर्ण क्रिकेट स्टेडियमचा फिल देणारं सारं. अगदी कँटिनपासून न्यूजरुमपर्यंत माहोल पूर्ण क्रिकेटमय. मी आणि त्यावेळची अँकरिंग टीममधील सहकारी स्नेहा गोरे आम्ही दोघांनीही टीम इंडियाचे टी-शर्ट्स परिधान केले होते. म्हणजे अगदी मॅच सुरु झाल्यापासून संपेपर्यंत. माजी कसोटीपटू चंद्रकांत पंडित विश्लेषणासाठी दिवसभर खरं तर रात्रीपर्यंत आमच्यासोबत होते. त्या दिवसाचं अँकरिंग हा माझ्यासाठी प्रचंड थ्रिलिंग अनुभव होता. म्हणजे अँकर म्हणून प्रश्नोत्तरं करणं, त्या त्या क्षणाची मॅच अपडेट सांगणं, त्याच वेळी अस्सल भारतीय क्रिकेट चाहता म्हणून त्या मॅचमध्ये इमोशनली गुंतलेलं असणं. काळजाचा ठोका वाढत राहणं. जसजसा मॅचचा निर्णायक क्षण जवळ येत होता, तसतसा ठोका वाढत होता. तेव्हा माझा इसीजी काढला असता तर काय रिपोर्ट आला असता देव जाणे. त्या क्षणी चंद्रकांत पंडित यांच्यासारखा कसोटीपटू, ज्यांनी इंटरनॅशनल मॅचेसचं प्रेशर हँडल केलंय. ते आमच्यासोबत होते. त्यांचा कूलनेस माझ्यासाठी अँकरिंग करताना खूपच हेल्पफुल होता. क्रिकेट खेळणाऱ्याप्रमाणेच क्रिकेट अनुभवतानाही टेम्परामेंट किती मॅटर करतं हे ठसवणारा तो अनुभव होता.


त्या मॅचचं क्रिकेटिंग अॅनालिसिस करायचं तर माझ्या मते सर्वात क्रुशल फॅक्टर होता तो कॅप्टन कूल धोनीने इनफॉर्म युवीच्या आधी स्वत:ला बॅटिंग ऑर्डरमध्ये प्रमोट करणं. तो निर्णय म्हणजे केवळ निखाऱ्यावरुन चालण्यासारखा होता. किंवा ज्वालांमधून चालण्यासारखा नव्हे त्यात उडी घेण्यासारखाच. धोनीने ते केलं. त्या ज्वाला त्याने आपल्या टेम्परामेंट आणि स्ट्रोक-प्लेने विझवल्या. त्या क्षणी तो जर लवकर बाद झाला असता आणि सामन्याचा निकाल जर आपल्या बाजूने लागला नसता तर त्या निर्णयाचं पोस्टमार्टम झालं असतं. जिथे धोनीकडे सगळी बोटं दाखवली गेली असती. तो निर्णय दुधारी तलवारीसारखा होता. जिथे समोरच्या टीमसोबत स्वत:लाही भळभळती जखम होण्यासारखी स्थिती होती. धोनीने ती कॅलक्युलेटेड रिस्क घेतली. समोर गौतम गंभीर प्रचंड खंबीरपणे बॅटिंग करत होता, त्यामुळे लेफ्टी-राईटी कॉम्बिनेशन चालू राहिलं. माहीला त्याचा धोनी टच गवसला. त्याने लंकन गोलंदाजांची पिसं काढली. अगदी मुरलीधरनलाही त्याने मारलेले अगेन्स्ट द स्पिन ऑफ ड्राईव्हज आजही गुदगुल्या करतात.


सचिन-सेहवाग स्वस्तात बाद झाल्यावर गौतम गंभीर 97 धावांची एक अमेझिंग इनिंग खेळून गेला. तो नव्वदीत बाद झाला असला तरी त्याची ती इनिंग सेंच्युरीच्याच तोडीची होती. खरं तर आयसीसीला विनंती करुन त्याच्या शतकांमध्ये एकाची भर घालायला हवी, इतकी ती खेळी अनमोल होती, आजही आहे.


तेव्हा विराट कोहली हे एक रोपटं होतं. आजच्यासारखा तो धावांचा महाकाय वृक्ष नव्हता. पण, तेव्हाच त्या रोपट्याने महाकाय वृक्ष होण्याची चुणूक दाखवली होती. मोठ्या स्टेजवर फायनलमध्ये खेळताना त्याने तीस-पस्तीसची छोटी पण, मोक्याच्या क्षणी महत्त्वाची खेळी केली.




हे सारं आम्ही बातम्या देता देता एन्जॉय केलं. खरं तर ब्लडप्रेशर वाढवून घेता घेता असं म्हणावं लागेल. तेव्हा आमचं ब्लडप्रेशर चेक केलं असतं तर त्याने स्कोरबोर्डप्रमाणेच प्रत्येक मिनिटाला वेगळा काऊंट दिला असता. म्हणजे न्यूजरुममध्ये त्या मॅचचा प्रत्येक क्षण आम्ही अक्षरश: जगलो. सामना जिंकल्यावर न्यूजरुममध्ये ढोल-ताशे वाजत होते. डे-नाईट मॅच असल्याने रात्री 11 च्या सुमारास दिवसापेक्षा एनर्जिटिक वातावरण अनुभवायला मिळालं. आत्ता हे लिहितानाही अंगावर शहारे येतायत. त्या दिवसाने मला अँकरिंगचा अविस्मरणीय अनुभव तर दिला. शिवाय त्या दिवसाने भारतीय क्रिकेटला काय काय दिलं, तर 1983 नंतर तब्बल 28 वर्षांनी वन-डे विश्वविजयाची चव चाखायला दिली. ज्याची गोडी आज 10 वर्षांनीही कायम आहे. धोनीच्या ग्रेटनेसवर शिक्कामोर्तब झालं तर, विराट कोहलीची पताका आंतरराष्ट्रीय स्तरावर डौलाने फडकण्यासाठी तिथून पडलेली पावलं पुढच्या काळात आणखी ठळक होऊ लागली.  धोनीने कुलसेखराला मारलेल्या विनिंग सिक्सरनंतर त्याला युवराजने कडकडून मारलेली मिठी, आमचीही छाती तेव्हा अभिमानाने फुलून आली होती. ती मिठी युवराजने तमाम भारतीयांनाच मारली होती जणू. युवराजच्या डोळ्यातून त्याच्या फटक्यांसारख्याच फ्लोने अश्रू वाहणं, सचिनला त्याच्या सहकाऱ्यांनी खांद्यावर घेत स्टेडियमला फेरी मारणं हे सारे क्षण कालपरवा घडल्यासारखे डोळ्यासमोर तरळले. आमच्या पिढीने 2007 च्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकपनंतर अनुभवलेला, जगलेला हा सर्वात मोठा क्षण होता. तेव्हा धोनीने वानखेडेमध्ये जरी कप उंचावला असला तरी करोडो भारतीयांच्या हात जणू त्या कपला लागले होते. मुंबईतलं त्या दिवशीचं सेलिब्रेशन मला चांगलं आठवतंय. मध्यरात्री रस्ते जाम झाले होते. रस्त्यांवर, गॅलरीत, घरात फक्त आनंदोत्सव सुरु होता. प्रत्येक घर जणून वानखेडेची रनभूमी झालं होतं. टीम इंडियाने तमाम क्रिकेटचाहत्यांना नवा ऑक्सिजन दिला होता. आज कोरोना काळात पुढे जाताना याच उत्साहाच्या, नवीन प्रेरणेच्या प्राणवायूची गरज आहे.


या दिवसासाठी, त्या ऐतिहासिक, रोमांचक क्षणांसाठी थँक्यू धोनी अँड टीम इंडिया.