Kinkrant 2024 : आज किंक्रांत! आजच्या दिवशी चुकूनही करू नका 'या' गोष्टी
Kinkrant 2024 : मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी केली जाते. किंक्रांतीचा दिवस हा अनेकजण शुभ मानतात, या दिवशी शुभ कार्य केली जात नाहीत.
Kinkrant 2024 : मकरसंक्रांतीचा (Makar Sankranti 2024) सण सगळीकडे आनंदाने आणि उत्साहात साजरा झाला. नवीन वर्षातील पहिलाच सण असल्यामुळे अनेकांनी उत्साहात पतंगबाजीचा आनंदही लुटला. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत (Kinkrant 2024) साजरी केली जाते. पौष शुक्ल षष्ठीचा दिवस किक्रांत, म्हणजेच करिदिन असतो. या दिवशी चांगले किंवा कोणतेही शुभ काम केले जात नाही, अशी मान्यता आहे. पण किंक्रांत (Kinkrant) म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर जाणून घेऊया.
किंक्रांत म्हणजे काय? (What is Kinkrant?)
संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारलं आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केलं, म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. पंचागात हा दिवस करिदिन म्हणून दाखवला गेला आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. यंदा 16 जानेवारी 2024, म्हणजेच मंगळवारी किंक्रांत आली आहे.
किंक्रांत कशी साजरी करतात?
किंक्रांतीच्या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ करतात. या दिवशी विवाहित स्त्रिया संक्रांतीप्रमाणे हळदी कुंकू कार्यक्रम (Kinkrant Celebration) करू शकतात. प्रत्येक राज्यानुसार किंक्रांती बाबत वेगवेगळ्या रूढी परंपरा पाळल्या जातात, या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याचीही प्रथा आहे. या दिवशी केर काढण्यापूर्वीच वेणी घालावी किंवा केस विंचरावे, असे सांगितले जाते. महाराष्ट्रात संक्रांतीचा सण तीन दिवस साजरा केला जातो. भोगी (Bhogi), मकरसंक्रांत (Makar Sankranti), किंक्रांत (Kinkrant) असा तीन दिवसाचा हा सण असतो.
दक्षिण भारतात किंक्रांतीचा दिवस 'मट्टू पोंगल'
दक्षिण भारतात किंक्रांतीचा दिवस 'मट्टू पोंगल' म्हणून साजरा करतात. या दिवशी गाई-बैलांना स्नान घालून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतात. त्यांच्या शिंगाना बेगड लावून त्यांना सजवतात. गुरांना दुपारी गोडधोड जेवण घालून दिवसभर त्यांना मोकळे सोडतात. संध्याकाळी त्यांची गावातून मिरवणूक काढतात. त्यानंतर नृत्यगायनाचा कार्यक्रमही केला जातो.
किंक्रांतीच्या दिवशी 'या' गोष्टी करणं टाळा
- या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये.
- लांबचा प्रवास टाळावा.
- घरात वादविवाद टाळा, मन शांत ठेवा. सर्वांशी आदराने वागा.
- केर काढण्यापूर्वीच केस विंचरा
- कुलदैवताची आणि देवाची पूजा, तसेच नामस्मरण करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: