Ayodhya Ram Mandir : 22 जानेवारीलाच का होणार राम मंदिराचं उद्घाटन? या मागे आहे 'हे' धार्मिक कारण
Ayodhya Ram Mandir : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत राम मंदिर तयार झालं आहे. रामललाच्या अभिषेकसाठी 22 जानेवारीची तारीख निवडण्यात आली आहे. या दिवशी इतकं काय खास आहे? जाणून घेऊया.
Ayodhya Ram Mandir : उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. राम मंदिराच्या अभिषेकासंदर्भात लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. राम मंदिरात (Ram Mandir) मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी 22 जानेवारी 2024 हा दिवस निवडण्यात आला असून यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. आता या शुभ कार्यासाठी 22 जानेवारीचीच निवड का करण्यात आली, असा प्रश्न तुम्हाला पडला का? जर हो, तर या मागचं कारण जाणून घेऊया.
अवघ्या 84 सेकंदांचा शुभ मूहूर्त
अयोध्येत बांधण्यात आलेल्या राम मंदिरात रामल्लांच्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी अवघ्या 84 सेकंदांचा शुभ मूहूर्त आहे. हा शुभ मुहूर्त 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजून 29 मिनिटं 8 सेकंदांना सुरू होत असून तो दुपारी 12 वाजून 30 मिनिटं 31 सेकंदांना संपणार आहे. रामलल्लाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर महापूजा आणि महाआरती करण्यात येईल.
राम मंदिरासाठी 22 जानेवारीचीच निवड का?
हिंदू कॅलेंडरनुसार, 22 जानेवारी ही पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. नक्षत्र मृगाशिरा आणि ब्रह्म योग सकाळी 8:47 वाजेपर्यंत आहे, त्यानंतर इंद्र योग सुरू होईल. ज्योतिष्यांच्या मते, 22 जानेवारी ही कर्म द्वादशी आहे. ही द्वादशी तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी भगवान विष्णूने कासवाचं रूप धारण केल्याचं सांगितलं जातं. धार्मिक ग्रंथांनुसार, या दिवशी भगवान विष्णूने कासवाचा अवतार घेतला आणि समुद्रमंथनात मदत केली. भगवान श्री राम हे भगवान विष्णूचे अवतार आहेत, म्हणून हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो आणि हा दिवस राम मंदिराच्या उद्घाटनासाठी निवडण्यात आला आहे.
22 जानेवारीला अनेक शुभ योग
ज्योतिषांच्या मते, 22 जानेवारीला अनेक शुभ योग तयार होत आहेत. या दिवशी अभिजीत मुहूर्त, सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि रवि योग असे तीन शुभ योग तयार होत आहेत. कोणताही शुभ कार्य करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या योगांमध्ये कोणतेही काम केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या कामात यश मिळते.
म्हणून झाली 22 जानेवारीची निवड
धार्मिक मान्यतेनुसार, भगवान रामाचा जन्म अभिजीत मुहूर्तावर मृगशीर्ष नक्षत्र, अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योगाच्या संयोगादरम्यान झाला. हे सारे शुभ योग 22 जानेवारी 2024 रोजी पुन्हा एकदा जुळून आले आहेत. त्यामुळेच अयोध्येमध्ये राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 22 जानेवारीची निवड करण्यात आली आहे.
हेही वाचा: