Pitru Paksha 2024 : पितृपक्षात नवीन गोष्टी का खरेदी करू नये? प्रेमानंद महाराज सांगतात...
Pitru Paksha 2024 : पितृपक्षात अनेक गोष्टी निषिद्ध मानल्या जातात. पितृपक्षात खरेदीच्या बाबतीतही काही नियम आहेत, या काळात नवीन गोष्टी का खरेदी करू नये? जाणून घेऊया.
Pitru Paksha 2024 : गणेशोत्सव संपताच पितृपक्षाला (Pitru Paksha 2024) सुरुवात झाली. महाराष्ट्रातील गावखेड्यात या महिन्याला पितरांचा महिना असंही म्हणतात. या कालावधीत आपल्या पूर्वजांचं स्मरण केलं जातं. पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून वेगवेगळे विधी केले जातात. यंदा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान पितृपक्ष आहे.
पितृपक्ष हा पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ असतो. त्यामुळं खरं तर तो चांगला काळ आहे. मात्र, या काळात अनेक गोष्टी निषिद्ध समजल्या जातात. विशेषत: या कालावधीत कुठल्याही नव्या कामाची सुरुवात केली जात नाही. तसंच, कुठलीही मोठी खरेदी केली जात नाही. यामागे नेमकं काय कारण आहे? प्रेमानंद महाराजांनी दिलेलं स्पष्टीकरण जाणून घेऊया...
पितृपक्षात नवीन वस्तू का खरेदी करू नये?
प्रेमानंद महाराजांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक भक्त त्यांना विचारत आहे की पितृ पक्षाच्या काळात नवीन वस्तू का खरेदी करू नयेत? ज्यावर प्रेमानंद महाराज सांगतात की, पितृपक्षात नवीन वस्तू खरेदी करून त्या वापरल्याने आपलं लक्ष पूर्वजांकडून विचलित होतं आणि त्यामुळे पितरांच्या आत्म्याला त्रास होतो.
वस्तूंमध्ये राहतो पितरांचा अंश
तसेच स्वामी प्रेमानंद महाराज पुढे म्हणाले, पितृ पक्षाच्या काळात खरेदी केलेल्या वस्तू पितरांना अर्पण केल्या जातात, त्यामुळे त्या वस्तूंमध्ये प्रेतांचा अंश असतो आणि या वस्तूंचा वापर जिवंत लोकांसाठी करणं योग्य नाही. या कारणास्तव लग्न सोहळे, घर-कार खरेदी, नवीन नोकरी-व्यवसाय इत्यादी गोष्टी पितृपक्षात केल्या जात नाहीत.
पितृ दोष आणि पितृ ऋण यावर उपाय काय?
एका भक्ताने पितृ दोष आणि पितृ ऋण यावर उपाय काय आहेत असं विचारलं, त्यावर प्रेमानंद महाराज म्हणाले, जेव्हा आपण भजन करतो आणि देवाचं नामस्मरण करतो तेव्हा पितरही प्रसन्न होतात. त्या वेळी व्यक्तीची प्रगती होते, त्यांना पितरांचा आशीर्वाद मिळतो. जेव्हा तुम्ही धार्मिक विधी जसं की भागवत पठण, गोपाल सहस्त्रनाम किंवा भजन आयोजित करता तेव्हा पितर तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुम्हाला आशीर्वाद देतात. प्रेमानंद महाराजांनी सांगितल्याप्रमाणे, या गोष्टी केल्याने पितृदोष आणि पितृ ऋणापासून मुक्ती मिळते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: