Navdurga 2024 : आजचा रंग... नारंगी... म्हणजेच आपल्या हिंदू धर्माचं प्रतीक असलेला भगवा रंग! तसं तर... आपल्या ऐहिक जीवनात अनेक गोष्टी आपण स्वतःसाठी करतो, आपल्या कुटुंबासाठी करतो... आणि त्या केल्याही पाहीजेत! परंतु...त्याचबरोबर आपल्या देशासाठीही आपण जमेल तितकं करायला हवं, कारण... देश टिकला तर संस्कृती टिकेल! आजचा रंग नारंगी म्हणजेच भगवा आणि याच भगव्यासाठी, त्याच्या प्रसारासाठी... आणि जागरणासाठी कार्य करणारी आजची दुर्गा... म्हणजे कीर्तनकार मृण्मयी भाटवडेकर - कुलकर्णी!
मृण्मयी यांनी आपल्या अगदी लहानपणी, वयाच्या फक्त पंधराव्या वर्षी कीर्तनाच्या क्षेत्रात पहिलं पाउल टाकलं... ते आपल्या आईच्या प्रेरणेमुळे! नागपूरमध्ये एका शिबिरात कीर्तनाचं प्रशिक्षण घेण्याच्या निमित्ताने, मृण्मयी यांचा किर्तनकार म्हणून सुरू झालेला प्रवास हा आजतागायत अगदी अखंडपणे सुरू आहे! त्या पहिल्या शिबिरात अनेक मान्यवर कीर्तनकारांचं मृण्मयी यांना मार्गदर्शन लाभलंच, पण... त्याचबरोबर राष्ट्रीय कीर्तनरत्न ह. भ. प. श्री. दिलीपबुवा डबीर यांनी, त्यांच्यातील भावी कीर्तनकाराचे गुण ओळखून, स्वतः त्यांना मार्गदर्शन करायचं ठरवलं, त्यामुळे विदयार्थी दशेतच मृण्मयी या कीर्तनकार म्हणून पुढे आल्या.
पण तेवढयावरच न थांबता त्यांनी महाकवी कालिदास विदयापीठांतर्गत असलेल्या कीर्तन महाविदयालयातून कीर्तनशास्त्राची पदवी आणि त्यानंतर एम. ए. चा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि अशा त-हेने त्यांनी कीर्तनाचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले....आणि एक अतिशय अभिमानास्पद बाब अशी की, हे चालू वर्ष त्यांच्या कीर्तनकारीच्या कारकिर्दीतले 25 वे म्हणजेच...रौप्यमहोत्सवी वर्ष आहे!
सनातन वैदिक धर्मातील आदय कीर्तनकार...देवर्षी नारद यांना गुरूस्थानी मानून निरंतर चालत असलेल्या या नारदीय कीर्तनकलेला मृण्मयी या समाज-प्रबोधनाचे, जनजागृतीचे आणि धर्मप्रसाराचे एक महत्त्वाचे आणि प्रभावी साधन मानतात. आपण ज्या समाजाचे देणे लागतो, त्याची या मार्गाने सव्याज परतफेड करू शकतोय याबददल त्यांना खूप धन्यता वाटते. एका राष्ट्रीय कीर्तनकाराच्या मार्गदर्शनाखाली धडे गिरवणा-या मृण्मयी आपल्या कीर्तनामधून पौराणिक कथा-आख्याने तर कथन करतातच, पण त्याचबरोबर राष्ट्रीय विषयांचा ही अंतर्भाव आपल्या कीर्तनात असावा हा त्यांचा नेहमीच कटाक्ष असतो. हल्लीच्या तरूण पिढीचे वाचन मुळातच कमी झालेले असल्यामुळे, देशभक्ती, धर्मनिष्ठा याबददलच्या विविध महापुरूषांच्या-क्रांतिकारकांच्या चरित्रांशी त्यांचा परिचय व्हावा यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील असतात. आणि देशप्रेमासोबत विज्ञानाची तसेच वैज्ञानिकांची... त्यांच्या महान कार्यांची त्यांना माहिती व्हावी यासाठी त्यांनी भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांसारखी प्रेरणादायी जीवनचरित्रेही आपल्या कीर्तनांच्या माध्यमांतून या तरूणपिढी समोर आणली आहेत! आणि त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांना आजवर अगदी भरघोस यश मिळाले आहे.
अनेक तरूण-तरूणींना कीर्तनाची गोडी तर लागलीच... पण त्यातील अनेकांना कीर्तनाच्या क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणाही मिळाली! आजवर मृण्मयी यांनी अनेक कीर्तनकार घडवले आहेत आणि अनेक उदयोन्मुख कीर्तनकारांना त्या आज मार्गदर्शन करीत आहेत. संस्कृतीची भगवी पताका सन्मानाने फडकवत ठेवणा-या या दुर्गेला आमचा साष्टांग दंडवत!
पाहा व्हिडीओ :
हे ही वाचा :