Hanuman Jayanti 2024 : आज चैत्र पौर्णिमा आणि त्यासोबतच हनुमान जयंती (Hanuman Jayanti 2024) सुद्धा. आज राज्यभरातील अनेक हनुमान मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी पाहायला मिळतेय. राज्यभरात अनेक हनुमान मंदिरं आहेत. पण त्यातल्या त्यात पुण्यातील हनुमान मंदिरांची गोष्टच वेगळी. पुण्यात अनेक प्राचीन हनुमान (मारुती) मंदिरं आहेत जी फार प्रचलित आहेत, पण ती त्यांच्या विचित्र नावांमुळे जास्त चर्चेत असतात. यातील काही मंदिरांची नावं महाराष्ट्रभर चर्चेत आहे.


बटाटा मारुती, डुल्या मारुती, जिलब्या मारुती, भांग्या मारुती, उंट मारुती आणि पत्र्या मारुती अशी या मंदिरांची नावं आहेत. तर आता पुण्यातील हनुमान मंदिरांच्या याच विचित्र नावांमागची कहाणी जाणून घेऊया...


1. जिलब्या मारुती


पुण्यातील तुळशीबागेजवळ असलेले हनुमान मंदिर हे जिलब्या मारुती म्हणून ओळखलं जातं. फार वर्षांपूर्वी या मारुती मंदिराजवळ एका हलवायाचं दुकान होतं. हा हलवाई त्याच्या दुकानात पहिल्या तयार झालेल्या जिलेब्यांचा हार या मारुतीला अर्पण करायचा, त्यामुळेच या मंदिराला जिलब्या मारुती असं नाव पडलं.


2. बटाट्या मारुती


पुण्यातील शनिवार वाडा मैदानातील मंदिराला बटाट्या मारुती म्हणतात. पूर्वी महात्मा फुले मंडई होण्यापूर्वी शनिवार वाड्यासमोरील पटांगणात भाजी बाजार भरायचा. या बाजारात आजूबाजूचे शेतकरी त्यांच्या भाज्या घेऊन विकायला बसायचे. भाजीबरोबरच या बाजारात कांदा-बटाट्याची विक्री केली जायची. काही विक्रेते शनिवार वाड्यासमोरील मारुतीच्या मंदिराच्या शेजारी नियमित बटाटे विक्रीसाठी यायचे, त्यांच्यामुळेच हे मंदिर ‘बटाट्या मारुती’ म्हणून नावाजलं जाऊ लागलं.


3. भांग्या मारुती


शिवाजी रस्त्यावरील रामेश्‍वर चौकात भांग्या मारुती मंदिर आहे. शनिवार वाड्यापासून श्रीमंत दगडूशेठ गणपतीकडे जाताना उजव्या बाजूला हे मंदिर आहे. पूर्वी या मंदिराच्या परिसरात गांजा विकला जायचा, भांग विकली जायची, असं म्हणतात, म्हणून या मंदिराला भांग्या मारुती म्हणतात.


4. डुल्या मारुती


गणेशपेठेतील लक्ष्मी रोडवर असलेल्या डुल्या मंदिराचा प्राचीन इतिहास आहे. हे मंदिर 350 वर्षांपूर्वी स्वामी समर्थांनी बांधल्याचं सांगितलं जातं. पानिपत युद्ध सुरू होतं तेव्हा मराठी मावळे अहमद शाह अब्दालीशी युद्ध करत होते. हे युद्ध इतकं भयंकर होतं, की या मंदिरातील मारुतीलाही युद्धाचे हादरे बसल्याने तो ‘डुलू’ लागला, म्हणूनच याचा ‘डुल्या मारुती’ असं म्हटलं जाऊ लागलं.


5. पत्र्या मारुती


लक्ष्मी रस्त्यावरील शगुन चौकातून रमणबाग शाळेकडे जाताना लागणाऱ्या चौकात उजव्या हाताला हे मारुती मंदिर आहे. पुण्यात ससून रुग्णालयाचं काम सुरू असताना प्रथमच पत्रे आले. रुग्णालयाचं काम पूर्ण झाल्यावर राहिलेले पत्र्याचे तुकडे या मंदिराला वापरण्यात आले. तेव्हापासून हे मंदिर पत्र्या मारुती म्हणून ओळखलं जातं.


6. उंटाड्या मारुती


रास्ता पेठेतील केईएम हॉस्पिटलसमोर पूर्वी पेशव्यांचा उंटांचा काफिला थांबायचा. तिथे नियमित उंटांचा तळ असायचा, या उंटाच्या तळामुळे तिथला मारुती ‘उंटाड्या मारुती’ नावाने ओळखला जातो.


7. खरकट्या मारुती


लक्ष्मी रस्त्यावरील तुळशीबागेत ‘खरकट्या मारुती’ मंदिर आहे. पूर्वी दुसऱ्या गावातून दर्शनासाठी आलेले भाविक, शेतकरी मंदिराच्या परिसरात भाकरी खाण्यासाठी बसत. त्यावरून या मारुतीला ‘खरकट्या मारुती’ नाव पडलं.


8. रड्या मारुती


गुरुवार पेठेत असलेल्या या मारुतीसमोर मृतदेह ठेवून रडायची पूर्वी प्रथा होती, म्हणूनच या मारुतीचं नाव ‘रड्या मारुती’ ठेवण्यात आलं.


9. उंबऱ्या मारुती


उंबराच्या झाडाखाली या मारुतीचं मंदिर असल्याने बुधवार पेठेतील या मारुतीला ‘उंबऱ्या मारुती’ नावाने ओळखलं जातं.


10. दुध्या मारुती


शुक्रवार पेठेत ‘दुध्या मारुती’चं मंदिर आहे. पूर्वी येथील मंदिराच्या परिसरात मोठा गायी-म्हशींचा गोठा होता, येथून दूध-तूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हायचं. त्यावेळी आजूबाजूचे देव पाण्याचे न्हायचे, मात्र येथील मारुतीला गवळी दुधाने न्हावू घालायचा, त्यामुळे या मारुतीला ‘दुध्या मारुती’ नाव पडलं.


मंदिरांची नावं बदलण्याचाही झाला होता प्रयत्न


धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून पुण्यातील मंदिरांची नावे बदलण्याचाही प्रयत्न झाला. मात्र पुणेकरांच्या विरोधामुळे ते शक्य झालं नाही. मंदिरांची नावं पुण्याच्या समृद्ध ऐतिहासिक अस्मितेचा आणि धार्मिक वारशाचा भाग आहेत, त्यामुळे या मंदिरांची नावं तशीच ठेवावीत, असं पुणेकरांचं म्हणणं आहे.


हेही वाचा:


Lord Hanuman Baby Names : रीतम ते रुद्रांक्ष... हनुमान जयंतीला जन्मलेल्या बाळांची ठेवा 'ही' युनिक नावं, मूल होईल हनुमानासारखं बलवान, अर्थासह नावं जाणून घ्या