Gudi Padwa 2024 : गुढीपाडवा हा सण हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो, त्यामुळे या सणाचं महत्त्व अधिक आहे. हिदू कॅलेंडरनुसार, चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा (Gudi Padwa 2024) हा सण साजरा केला जातो. हा सण हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी लोक सोन्याच्या खरेदीला किंवा नवीन वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य देतात.


यंदाचा गुढीपाडवा हा 9 एप्रिल 2024 ला साजरा करण्यात येणार आहे. पण आपण गुढीपाडव्याचा सण का साजरा करतो? या सणामागची कहाणी तुम्हाला माहितीय का? तर जाणून घेऊया.


गुढीपाडवा का साजरा करतात?


सृष्टीची निर्मिती या दिवशी झाली


गुढीपाडवा विशेषतः महाराष्ट्रात साजरा केला जातो. हिंदू धर्मातील पौराणिक कथांनुसार, ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली. त्यामुळे गुढीपाडव्याचा हा सण नवीन वर्षाची सुरुवात म्हणून  ग्राह्य धरला जातो. ब्रम्हदेवाला सृष्टीचा निर्माता समजलं जातं.


भगवान श्रीरामाचा विजय दिन


प्रभू श्रीरामाने रावणावर विजय मिळवला आणि ते अयोध्येत परतले तेव्हा, त्या दिवसापासून गुढीपाडवा साजरा केला जातो, अशी मान्यता आहे. प्रभू श्रीरामाचं अयोध्येत आगमन झालं तेव्हा आनंद साजरा करण्यासाठी लोकांनी आपापल्या घरांवर ध्वज फडकावला होता.


शालीवाहन शक


शालीवाहन नावाच्या राजाने हूणांचा पराभव करून शालीवाहन शक सुरू केला. त्या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस होता.


इतर पौराणिक कथा


गुढीपाडव्याशी संबंधित अनेक पौराणिक कथा आहेत. एका कथेनुसार, या दिवशी भगवान विष्णूंनी मत्स्यावतार धारण करून पृथ्वीला जलप्रलयापासून वाचवलं. तर दुसऱ्या कथेनुसार, गुढीपाडव्याच्या दिवशी हनुमानाने सूर्याला ग्रहणापासून मुक्त केलं.


गुढीपाडव्याचे महत्त्व काय?


गुढीपाडवा सणापासून हिंदूधर्मीयांचं नववर्ष सुरू होतं. चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो. मराठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते.


नवीन कार्याला सुरुवात करण्यासाठी दिवस महत्त्वाचा


गुढीपाडव्याला अनेक लोक नवीन व्यवसाय सुरू करतात, नवीन गोष्टी शिकण्यास सुरुवात करतात आणि नवीन ध्येय ठरवतात.


खरेदीसाठी दिवस शुभ


घरात नवीन वस्तूंची खरेदी या दिवशीच केली जाते. गाडी, सोनं यासारख्या वस्तूंची खरेदी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर केली जाते. गुढीपाडव्याला पर्यावरणीय महत्त्व देखील आहे. या दिवशी लोक निसर्गाचे आभार मानून त्याचे रक्षण करण्याचा संकल्प करतात.


हेही वाचा:


Gudi Padwa 2024 :आला सण गुढीपाडव्याचा... यंदा 'या' मुहूर्तावर गुढी उभारणं ठरेल शुभ; वर्ष जाईल सुख-समृद्धीचं