(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ganeshotsav 2025 : गणपती बाप्पा पुढच्या वर्षी खरंच लवकर येणार, 11 दिवस आधी ऑगस्ट महिन्यातच विराजमान होणार बाप्पा
Ganesh Chaturthi 2025 : पंचागकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2025 मध्ये गणपती 11 दिवस आधी येणार आहेत. ऑगस्ट महिन्यातच बाप्पा विराजमान होतील.
Ganesh Chaturthi 2025 : देशभरात दरवर्षी गणेशोत्सवाची (Ganeshotsav) धूम पाहायला मिळते. नुकताच काल (8 सप्टेंबर 2024) 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' अशी विनवणी करत दीड दिवसाच्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. पण, पुढील वर्षी बाप्पा खरोखरच लवकर येणार आहेत. 2025 मध्ये गणरायाचं आगमन हे 11 दिवस आधी होणार आहे.
गणेश चतुर्थी 2024 कधी? (Ganesh Chaturthi 2025 Date)
पुढील वर्षी श्रीगणेश चतुर्थी 27 ऑगस्ट 2025 रोजी येणार असल्याची माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. यावर्षी गौरी-गणपतीचं विसर्जन सहाव्या दिवशी होत आहे. पुढील वर्षी 2 सप्टेंबर 2025 रोजी गौरी-गणपतींचं विसर्जन होईल. पुढील वर्षी अनंत चतुर्दशी अकराव्या दिवशी, म्हणजे 6 सप्टेंबर 2025 रोजी असेल. त्यामुळे पुढील वर्षी 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या काळात गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
पुढील 11 वर्षांतील गणेश चतुर्थी
■ बुधवार, 27 ऑगस्ट 2025
■ सोमवार, 14 सप्टेंबर 2026
■ शनिवार, 4 सप्टेंबर 2027
■ बुधवार, 23 ऑगस्ट 2028
■ मंगळवार, 11 सप्टेंबर 2029
■ रविवार, 1 सप्टेंबर 2030
■ शनिवार, 20 सप्टेंबर 2031
■ बुधवार, 8 सप्टेंबर 2032
■ रविवार, 28 ऑगस्ट 2033
■ शनिवार, 16 सप्टेंबर 2034
■ बुधवार, 5 सप्टेंबर 2035
गणेश चतुर्थीला चंद्र का पाहू नये?
गणेशाचे आगमन होताना त्यावेळी चंद्रदर्शन करू नये असं धर्मशास्त्रात सांगितलं आहे. गणेश चतुर्थीला चंद्राचं दर्शन हे अशुभ मानलं जातं. त्यामागचं कारणही तसंच आहे.
रागाच्या भरात गणेशाने चंद्राला शाप दिला
पौराणिक कथेनुसार एके दिवशी भगवान गणेश आपले वाहन असलेले मुषक म्हणजे उंदरावर स्वार होऊन फिरायला गेले होते. त्यावेळी अचानक उंदीर अडखळला. ते पाहताच चंद्राला हसू अनावर झाले. चंद्राच्या या कृतीवर गणेश क्रोधित झाले आणि त्यांनी चंद्राला शाप दिला.
भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थीच्या रात्री चंद्र पाहेल त्याच्यासमोर संकट उभं राहील. त्याच्यावर गणेशाची कृपा होणार नाही. तसेच त्याच्यावर खोटे आरोप केले जातील असा शाप गणेशाने दिला.
चतुर्थीला चंद्रदर्शन हे अशुभ
धार्मिक शास्त्रांच्या मान्यतेनुसार गणेश चतुर्थीच्या रात्री चंद्राचे दर्शन करून नये. त्या दिवशी जर तुम्ही चंद्र पाहिला तर तुमच्यावर खोटा आरोप ठेवला जाऊ शकतो किंवा तुमच्यासमोर एखादं संकट उभं राहू शकतं.
चुकून चंद्र दिसला तर काय करावं?
गणेश आगमनाच्या वेळी चुकून जर चंद्र दिसलाच, किंवा अनवधानाने त्याच्याकडे आपण पाहिलंच तर घाबरून जायचं कारण नाही. त्यावरही उपाय सांगितला आहे. चुकून जर चंद्र पाहिला तर भक्ताने गणेशाचे नमन करावं. त्या दिवशी गणपतीच्या मंत्राचा जप करावा किंवा गणेश अथर्वशीर्ष पठण करावं.
गणेशाच्या या शापापासून मुक्ती मिळवण्यासाठी संबंधित व्यक्तीने चतुर्थीचे व्रत ठेवावे असंही शास्त्रात सांगितलं आहे.
हेही वाचा:
Numerology : बाप्पाचा आवडता अंक कोणता? या नंबरशी तुमचंही आहे का काही कनेक्शन?